Monday, July 15, 2024
Homeसाप्ताहिककोलाजगेले ते वर्ष...

गेले ते वर्ष…

  • प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ

रात्रीमागून दिवस येतोच त्याप्रमाणे या वर्षात काही सकारात्मक घटना घडल्या, तर काही नकोशा घटनाही घडल्या. पण काही गोष्टी आपल्या हाताबाहेर असतात. येणाऱ्या नूतन वर्षात आशादायी ठरण्यासाठी नेेमके काय करता येईल याचा मागोवा घेत आनंदाचा नवा संकल्प करत यंदाच्या वर्षातील सुखद-दुःखद घटनांचा घेतलेला आढावा…

अंधार कितीही दाटला तरी सूर्य उगवतोच! अंधाराला गिळून टाकतो. होय, पण केव्हातरी अंधार पडणारच; याचाही विचार उजेडात असतानाच करायला हवा, तरच तो अंधार आपल्याला कायमचे गिळून टाकणार नाही.

आता अंधार कोणता तर या वर्षात झालेल्या वाईट घटनांचा!या वर्षाची सुरुवात रशिया आणि युक्रेनच्या युद्धाने झाली. अनेक प्रियजन मारले गेले. मालमत्तेचे नुकसान झाले. राजकीय अशांतता पसरली. युरोपीय देशांना मंदीचा फटका बसला, तेलाच्या किमती वाढल्या, चलनवाढही झाली ज्याची झळ जगभरात पसरली.

अमेरिकेतील चक्रीवादळ, कॅलिफोर्नियात आलेला पूर, टर्की आणि सीरियाला बसलेला भूकंपाचा हादरा, भारतातील चेन्नईमधील चक्रीवादळ असे काही न भरून येण्यासारखे जबरदस्त नुकसान झाले. ‘हवामान बदल’ हा मुख्यत्वे मानवनिर्मित आहे. वाढते प्रदूषण यामुळे आजारपण वाढते आहे. वृक्षतोडीमुळे प्राणवायू घटत चालला आहे, त्यामुळे शारीरिक आणि मानसिक अस्वस्थता वाढत आहे. भारत ‘क्रिकेट विश्वचषक फायनल’मध्ये पराभूत झाला, ही गोष्ट सुद्धा भारतीयांच्या मनाला दुःख देऊन गेली.

खरं तर आणखीही खूप साऱ्या गोष्टी आहेत. काही गोष्टींना आपण आळा घालू शकतो. काही गोष्टी आपल्या हाताबाहेर आहेत पण या वर्षी काय सकारात्मक घडले तेही पाहूया –

भारताच्या चांद्रमोहिमेने जगभरात भारताची मान उंचावली आहे. चंद्राच्या दक्षिण भागात चांद्रयान उतरवणारा भारत पहिला देश ठरला आहे.

मुंबई-दिल्ली एक्स्प्रेस रस्त्याचा काही भाग आणि मैसूर-बंगळूरु रस्ता चालू झाल्यामुळे महत्त्वाची शहरे जोडली गेली आहेत, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात वेळेची बचतही होणार आहे. भारताला अत्यंत मानाचे समजले जाणारे, दोन ऑस्कर पुरस्कार मिळाले आहेत. बेस्ट डॉक्युमेंट्री शार्ट फिल्म या ऑस्कर पुरस्काराच्या श्रेणीतून भारताच्या ‘द एलिफंट व्हिस्परर्स’साठी आणि ‘आरआरआर’ या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग यासाठी ऑस्कर पुरस्कार मिळाले आहेत.

AI आणि chat GPT हे तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे अनेक क्षेत्रात फायदा होणार आहे. पण तरीही या अद्भुत तंत्रज्ञानामुळे एका भयावह मानसिकतेतून आपण जात आहोत. इथे मला एक छोटेसे उदाहरण द्यायला आवडेल की, एक काडेपेटी जर आपल्या हातात आहे, तर आपण देवापुढे एक दिवा लावू शकतो किंवा कोणाचे घर जाळण्यासाठी आग लावू शकतो. हे तंत्रज्ञान तसेच आहे. याचा योग्य उपयोग केला, तर आपण आपल्या देशाची निश्चितपणे खूप प्रगती करू शकतो.

भारताला संसदेची नवीन इमारत मिळाली, जे ठिकाण खूपच आकर्षक आहे. भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनला, या घटनेला चांगल्या की वाईट घटनेसाठी मान्यता द्यावी बरे, हे आपणच ठरवावे.

तर अशा सुखद आणि दुःखद घटनांचा मागोवा घेत नेमकेपणाने काय करता येईल? याचा विचार आपण केला पाहिजे, कारण नवीन येणारे वर्ष नेहमीच आशादायी असते!

देशाने काय करायचे याचा विचार करण्यासाठी आपल्याकडे नेतेमंडळी आहेत, शास्त्रज्ञ आहेत; परंतु आपण नेमके काय करायला हवे होते आणि केले नाही याचा विचार सरत्या वर्षाला निरोप देताना प्रत्येकाने केला पाहिजे. राहिलेले संकल्प पूर्ण केले पाहिजेत. ते का पूर्ण झाले नाहीत? याचाही विचार केला पाहिजे. साप जसा सहजच कात टाकून सळसळतो, तरुण होतो त्याचप्रमाणे आपणसुद्धा सरत्या वर्षाला निरोप देऊन दुःखाची, अशुभतेची, भीतीची, अस्वस्थतेची कात टाकून नव्या जोमाने, मनाने तरुण होऊन, कार्यक्षम होऊ या. ‘जो हुआ सो हुआ’ असे म्हणत कोऱ्या पुस्तकाचे नवीन पान उलटू या, चला नवीन वर्षाचे स्वागत करू या! अंधाराची, पराभवाची, दुःखाची रात्र सरली आहे आणि उत्साहाची, आनंदाची, परिवर्तनाची नवीन पहाट उगवत आहे, त्याचे स्वागत करू या!

pratibha.saraph@ gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -