दी लेडी बॉस: अर्चना सोंडे
आज ३१ डिसेंबर. वर्षाचा अखेरचा दिवस. सरत्या वर्षाला खाऊन – पिऊन, हसत – गात निरोप देण्याची पाश्चात्यांची पद्धत. आता जगभरच्या संस्कृतीनेही ही पद्धत अंगीकारली आहे. या दिवशी मांसाहाराला भरपूर मागणी असते. त्यात चिकन बिर्याणी वा मटण बिर्याणी म्हणजे सोन्याहून पिवळंच जणू. हैदराबादमध्ये अंजुमच्या बिर्याणीला तोड नाही. अवघ्या ८० रुपयांपासून सुरू झालेल्या बिर्याणीचा व्यवसाय आता दरमहा लाख रुपयांची उलाढाल करीत आहे. यामागची प्रणेता आहे नाज अंजुम.
२०१० मध्ये लग्नानंतर नाज अंजुम हैदराबादला आली. व्यवसायाने ती टेक्स्टाइल इंजिनीयर, पण काही वैयक्तिक कारणांमुळे तिला त्यामध्ये करिअर करता आले नाही. मात्र, पाककला हे तिचं नेहमीच पहिलं प्रेम होतं. त्यामुळे हैदराबादला आल्यावर ती आपल्या पहिल्या प्रेमाकडे अर्थात पाककलेकडे वळली. प्रसिद्ध सेलिब्रिटी शेफ संजीव कपूर यांच्या क्लासेसमध्ये तिने स्वयंपाकाचे धडे गिरविले. तिच्या हाताला मुळात चव होतीच, पण पाककलेच्या वर्गाने तिच्या स्वयंपाकाला एक अनोखी चव लाभली. तिचे शेजारी तिच्या पाककलेवर मोहीत झाले. स्वत:च्या घरापासून दूर नोकरीनिमित्ताने आलेले अनेक नोकरदार तरुण अंजुमच्या इमारतीत राहायचे. अंजुम पाककलेसाठी प्रसिद्ध होती. त्यातील काही तरुणांनी अंजुम दीदीला टिफिन सेवा सुरू करण्याची विनंती केली. त्यांच्या आग्रहामुळे अंजुमने टिफिन सेवा सुरू केली आणि ‘अंजुम्स किचन’चा जन्म झाला. एखाद्या महिलेच्या मालकीचा असणारा हैदराबादमधील हा बहुधा पहिलाच क्लाउड किचन होता.
२०१६ ची रमजान ईद होती. या ईदला अंजुमने ‘डबल का मिठा’ नावाची एक चवदार हैदराबादी मिठाई बनवली, सोबत ‘लौकी हलवा’ देखील बनविला. ही मिठाई तिने आपल्या दिराच्या रेस्टॉरंटमध्ये विकण्यास ठेवली. या दोन्ही मिठाई लगोलग विकल्या देखील गेल्या. मिठाईच्या विक्रीमुळे अंजुमला हुरूप आला. त्यानंतर काही दिवसांतच अंजुमला एका घरगुती समारंभासाठी ‘मटण दम बिर्याणीची’ ऑर्डर मिळाली. या बिर्याणीची चव चाखलेल्या पाहुण्यांनी देखील स्वत:च्या घरासाठी बिर्याणीच्या ऑर्डर्स दिल्या. आपल्या पहिल्या बिर्याणीच्या ऑर्डरला अंजुमला ८० रुपये खर्च आला, ते देखील भाज्या आणण्यासाठी तिने वापरले होते. अशा प्रकारे ती हैदराबादमधील पहिली होम शेफ ठरली. हळूहळू अंजुमचा व्यवसाय मौखिक प्रसिद्धीमुळे बहरू लागला. सोबतच फेसबुकचा पण तिने व्यवसाय प्रसिद्धीसाठी वापर केला.
सध्या तिच्याकडे दररोज सुमारे २५ – ५० ऑर्डर असतात, ज्यात दररोज टिफिन आणि बिर्याणीचा समावेश असतो. तिला पार्टी ऑर्डर्स आणि मिठाईच्या ऑर्डर्स देखील मिळतात. अंजुम कोणतीही मार्केटिंग करीत नाही. सुरुवातीला स्वयंपाक करण्यापासून ते जेवण पोहोचविण्यापर्यंत सर्व कामे ती स्वतःच करायची. मात्र, ऑर्डर्सचा पसारा वाढला म्हणून तिने दोन डिलिव्हरी बॉईज आणि जेवण तयार करण्यासाठी मदतीला एक बाईस नोकरीवर ठेवले.
तिचा दिवस पहाटे ४.३० वाजता सकाळच्या नमाजने सुरू होतो. त्यानंतर ती सकाळी ६ वाजता तिच्या तीन मुलांसाठी नाश्ता बनविते. मुले शाळेत गेल्यानंतर, ती तिच्या रोजच्या ऑर्डरसाठी सकाळी ९ वाजता स्वयंपाकघरात प्रवेश करते. अंजुमचे पती रोज सकाळी मांस आणि भाज्या घेऊन येतात. तिची मदतनीस सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत भाज्या चिरणे, मांस कापणे, मसाले वाटणे आदी कामे करते. ते पूर्ण झाल्यावर अंजुम स्वतः आमटी, भात आणि चपात्या बनविण्यावर लक्ष केंद्रित करते. दुपारी २ वाजेपर्यंत दोन डिलिव्हरी बॉईज संपूर्ण शहरात सर्व ऑर्डर्स पोहोचवितात. दुपारच्या जेवणानंतर, ती तिच्या संध्याकाळच्या ऑर्डर्सवर काम करू लागते. या ऑर्डर्स मुख्यतः पार्ट्यांसाठी असतात. त्यात स्टार्टर्स, बिर्याणी, चिकन करी आणि मिठाई यांचा समावेश असतो. अंजुम आठवड्यातून सुमारे ४ वेळा पार्टी ऑर्डर स्वीकारते. या ऑर्डर्स संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत ती पुन्हा डिलिव्हरी बॉईजद्वारे पाठविते.
आज अत्यंत स्पर्धात्मक असलेल्या क्लाउड किचन व्यवसायात अंजुमला टिकून राहण्यास कारणीभूत ठरले ते तिचे सततचे नवनवीन प्रयोग. जेव्हा तिला समजले की लोकांना बिर्याणीच्या पलीकडे काहीतरी हवे आहे, तेव्हा तिने ‘इफ्तार थाळी फॉर वन’ सादर केली, ज्यामध्ये दही वडा, हलीम, स्टार्टर्स, फळे आणि खजूर यांचा समावेश आहे. लोकांची अपेक्षा लक्षात घेऊन दर काही महिन्यांनी ती काहीतरी नवीन सादर करते. तिने इफ्तार थाळीपासून सुरुवात केली, जी लोकांना खूप आवडली. कोविड – १९च्या लाटे दरम्यान, लोक लग्नाला उपस्थित राहू शकत नव्हते आणि ते जेवण चुकवायचे, हे ध्यानात घेऊन तिने ‘जश्न – ए – दावत’ सुरू केले. जे लग्नाचे जेवण होते. यात एका ट्रेमध्ये एका व्यक्तीसाठी जेवण दिले जायचे. तिने हिवाळ्यात पंजिरी के लड्डू, गोंड के लड्डू यांसारखे मिष्टान्न देखील सादर केले. तिला कोविड – १९ लॉकडाऊन दरम्यान जेवण देण्यासाठी सरकारकडून परवानगी मिळाली आणि तिने ५०० हून अधिक लोकांना जेवण दिले.
तिच्या रोजच्या टिफिनमध्ये एक सेट मेनू असतो, ज्यामध्ये ती काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करते, जसे की मिर्ची (मिरची) भजी, पकोडे, कस्टर्ड आणि बरेच काही. दररोज दुपारचे आणि रात्रीच्या जेवणासाठी अनेक जण तिच्याकडून टिफिन घेतात.
अंजुम तिच्या ग्राहकांचा, विशेषत: ऑर्डर देणाऱ्या वृद्ध पुरुष आणि स्त्रियांबद्दल विचार करते. त्यांना काहीतरी वेगळे देण्याचा प्रयत्न करते. या ज्येष्ठ नागरिकांपैकी अनेक मधुमेही आहेत, पण त्यांना मिठाई आवडते म्हणून अंजुम त्यांना कस्टर्डसारखी कमी साखर घालून बनविलेली मिठाई देते. अंजुमची बेस्ट सेलर मटण बिर्याणी आहे, ही बिर्याणी ६ – ८ लोकांना सहज पुरते. कारण तिच्या बिर्याणीमध्ये मटण आणि तांदूळ समान प्रमाणात वापरले जातात. अंजुमने बनविलेले ‘डबल का मिठा’ आणि ‘चिकन टिक्का’ हे पक्वान्न सुद्धा लोकप्रिय आहेत. अंजुम परदेशात राहणाऱ्या लोकांसाठी ऑनलाइन कुकिंग क्लासेस सुद्धा घेते.
आपल्या यशाचे श्रेय कठोर परिश्रमाला देत अंजुम म्हणते की, ‘‘जर आपल्याला स्वतःसाठी नाव कमवायचे असेल, तर आपल्याला त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. मी सुरुवात केल्यापासून मला चांगल्या ऑर्डर्स मिळत गेल्या. माझ्या कुटुंबाच्या मदतीशिवाय हा सगळा व्याप सांभाळणे निव्वळ अशक्य होते. धडपडत राहा आणि तुमचे १०० टक्के द्या. सराव माणसाला परिपूर्ण बनवितो. जोपर्यंत तुम्ही सर्वोत्कृष्ट होत नाही, तोपर्यंत ते चालू ठेवा. पैशासाठी काम करू नका. मी माझ्या टिफिन्सवर प्रयोग केला आणि आज मी कुठे आहे ते पाहा. जर तुम्ही तुमचे लक्ष ध्येयावर ठेवले आणि तुम्ही जे करता त्याचा आनंद घेतला, तर तुम्ही देखील ते करू शकता.’’ ८० रुपयांपासून सुरुवात केलेली अंजुम आज महिन्याला १ लाख रुपयांहून अधिक कमाविते. हैदराबादला गेल्यास या लेडी बॉसच्या हाताची चव चाखलीच पाहिजे.