
मनसे नेते संदीप देशपांडेंनी लगावला उद्धव ठाकरेंना जोरदार टोला
राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येण्यावरही दिली प्रतिक्रिया
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी नुकतीच वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांच्या वारंवार होणार्या भेटींमुळे दोन्ही नेते एकत्र येणार की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली. यावर आज मनसेचे नेत संदीप देशपांडे (Sandip Deshpande) यांनी मत व्यक्त केलं आहे. यावेळी त्यांनी 'आताचे मुख्यमंत्री भेटतात, आधीचे मुख्यमंत्री भेटत नव्हते', असा जोरदार टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) लगावला आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले की, "मुळात विषय असा आहे की, आताचे मुख्यमंत्री येऊन भेटतात तरी, आधीचे जे मुख्यमंत्री होते, ते कोणाला भेटायचेच नाही. जे काही महाराष्ट्राचे प्रश्न असतील, जनतेचे प्रश्न असतील, ते सन्माननीय राज ठाकरे मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जातात. त्याच्यावर सकारात्मक प्रतिसाद मिळतो, मार्ग निघतो. शेवटी जनतेचे प्रश्न मांडण्यासाठीच आपण सर्वजण राजकारणात आहोत", अशी प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी दिली आहे.
एकनाथ शिंदे व राज ठाकरे एकत्र येणार का या प्रश्नावर मत व्यक्त करताना संदीप देशपांडे म्हणाले की, "महाराष्ट्राच्या प्रश्नांसाठी महाराष्ट्रातील दोन मोठे नेते, एकमेकांना भेटत असतील, तर त्यात वावगं काहीच नाही. आता लोकसभा, विधनसभा निवडणुका आहेत, त्याबाबत चर्चा झाली असेल, तर त्यात काहीच चुकीचं नाही."
पुढे ते म्हणाले, "राजकारणात कधी काय होईल? हे काही आज सांगता येणार नाही. २०२४ च्या पोटात काय दडलंय? हे कोणाला माहीत. पण यासंदर्भातील जो काही निर्णय असेल, तो राज ठाकरे योग्य वेळी घेतील. तो महाराष्ट्राच्या हिताचा असेल, हिंदुत्वाच्या हिताचा असेल आणि मराठी माणसाच्या हिताचा असेल", असं संदीप देशपांडे म्हणाले.