Monday, July 15, 2024
Homeसाप्ताहिकरिलॅक्सMarathi Natak : विपर्यासी फार्साचे उत्तम उदाहरण : मर्डरवाले कुलकर्णी

Marathi Natak : विपर्यासी फार्साचे उत्तम उदाहरण : मर्डरवाले कुलकर्णी

  • पाचवा वेद : भालचंद्र कुबल

दैनंदिन जीवनात वेगवेगळ्या अंगाने, वेगवेगळ्या रूपाने हास्य आपल्या वाट्याला येत असतं. हास्यरसातूनच विनोद निर्मिती होत असते… आणि विनोद हे मानवी सुदृढतेचं लक्षण मानलं गेलं आहे. विनोद, मग तो कुठल्याही प्रकारातला असो, अनुभवणाऱ्या प्रत्येकास आवडतो. त्यातही जर तो विपर्यासी प्रकारात सामावणारा असेल तर मग विचारूच नका…! विपर्यासी विनोदाला “लाॅजिक” असावेच असे नाही किंवा ते नसण्यातच विनोद सामावलेला असतो. विपर्यासाला एखादी घटना, व्यक्ती, वेळ, भाषा, वाक्य किंवा एखादा शब्द पुरेसा असतो. मेंदू डोअरकिपरच्या स्वाधीन करून नाटक तेवढे बघणे आणि विनोद एन्जाॅय करणे, एवढेच काय ते प्रेक्षकांच्या हाती उरते.

अशाच विपर्यासी विनोदाचे उत्तम उदाहरण असलेले “मर्डरवाले कुलकर्णी” हे नवे नाटक रंगमंचावर प्रकाशित झाले आहे. नेहमीच्या पठडीतलं एक विनोदी नाटक असे याचे वर्णन बिलकूल करता येणार नाही. कारण दिग्दर्शक संतोष पवार यांनी मूळ नाटकावर आपले दिग्दर्शकीय संस्कार करून जयंत उपाध्ये यांच्या संहितेची अशी काही रंगावृत्ती सादर केलीय की प्रेक्षक दोन सव्वादोन तास अखंडपणे नाटकात गुंतून हसत राहतो. संतोष पवारांची दिग्दर्शकिय मेथडच वेगळी आहे. रंगमंच पात्रांद्वारे सातत हलवत ठेवणे याच दिग्दर्शकाला जमू शकतं. सुरुवातीपासून सर्वच पात्रे जी धावपळ करतात, ती एनर्जी निर्माण करवून अखेरपर्यंत टिकवून ठेवण्याचंही एक “डिरेक्टोरिअल टेक्निक” आहे, जे संतोष पवारांनाच फक्त जमू शकतं.

कुलकर्णी नामक एक प्राध्यापक रस्त्यावर त्याच्या समक्ष झालेला खून पाहतो आणि त्यानंतर त्याच्या पाठी जे शुक्लकाष्ठ लागते ते म्हणजे “मर्डरवाले कुलकर्णी”. खरं तर विनोद नटांच्या अभिनय क्षमतेनुसार कसा फिरवावा, याचा प्रत्यय हे नाटक बघताना येत राहातो. वैभव मांगले हा नव्या पिढीचा चतुरस्त्र रंगकर्मी म्हणून आज स्थिर आहे. अनेक चांगल्या चांगल्या भूमिकांचे या नटाने सोनं केलंय. ही भूमिका देखील त्यांच्या विनोदी भूमिकांपेक्षा थोडी निराळीच म्हणावी लागेल. रंगमंचावरील सतत केलेल्या धावपळीने किती दमछाक होत असेल याचा अंदाज अर्थातच जो ही भूमिका साकारेल त्यालाच कळेल. तीच गोष्ट बाकी कलाकारांची. भार्गवी चिरमुलेंचा एवढा आंगीक अभिनय पाहण्याची माझी तरी पहिलीच वेळ होती. कथाबीजातील एखाद्या गोष्टीचा विपर्यास करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आल्याने रंगमंचावरील त्यांचा वावर विनोद तर निर्माण करतोच; परंतु अभिनय क्षमतेचं एक नवे परिमाण सिद्ध करतो.

पिटर मॅकग्रा या मानसशास्त्रज्ञाच्या मते “विनोद तेव्हाच घडतो जेव्हा एखादी गोष्ट चुकीची, अस्वस्थ किंवा धमकावणारी दिसते; परंतु त्याच वेळी ते ठीक, स्वीकार्य किंवा सुरक्षित वाटते.” विनोदाबाबत अनेक सिद्धांत आहेत. पैकी व्यंगात्मक विनोदाभोवती आपली बरीचशी कथानके रेंगाळताना दिसतात. सामाजिक आशयाचा वापर परस्पर संवादात घडवून त्याद्वारे निर्मिलेला विनोद अत्यंत संयत असावा लागतो. विनोदाचे मूळच सामाजिक घडामोडींशी संलग्न असल्याकारणाने, तो पसरट किंवा अभिरुचीहीन होण्याची शक्यता असते; परंतु सर्व सामाजिक स्तरातील, वयोगटातील वा भाषिक वैविध्यावर मात करणारा मनोरंजनाचा हुकमी एक्का हा विनोदच आहे. मानसशास्त्रीय संशोधनानुसार ९० टक्के भारतीय पुरुषांमधे आणि ८१ टक्के स्त्रियांमध्ये विनोदाचे प्रमाण आढळते ते त्यातील प्रामाणिकपणा या गुणधर्मामुळे. पुरुषांमधला विनोदी स्वभाव हा अतर्क्य प्रामाणिकपणाकडे झुकलेला असतो. तर स्त्रियांचा संवेदनशील प्रामाणिकतेकडे, या सर्व सिद्धांताचे रसायन म्हणजे “मर्डरवाले कुलकर्णी” आहे. मर्डर पाहिलेले घाबरे-घुबरे कुलकर्णी घरात शिरताच जे दृष्य वर्णन सादर करतात, तिथेच नवरा बायकोमधील अतर्क्य संवादास सुरुवात होते. एखाद्या गंभीर घटनेचे वर्णन कुलकर्णी करत असतानाच मध्येच शंका विचारण्याचा प्रामाणिकपणा कुलकर्णी करत राहतात आणि विनोद निर्मितीची चक्की सुरू होते. हे दळण कमी पडतंय असं वाटत असतानाच चॅनल रिपोर्टर कुलकर्णींचा “बाईट” घ्यायला येते. ती जाते न जाते तोच हवालदार मानमोडे “इन्व्हिस्टीशन”साठी हजर होतो. तो जाताच खरा खुनी शऱ्या आपल्या एकुलत्या एक साक्षीदाराला मारायला दाखल होतो. यात कुठे जरा उसंत मिळते तोच शऱ्याची डान्सबारमधील प्रेयसी त्याला शोधत शोधत कुलकर्ण्यांच्या फ्लॅटवर येते. या पात्रांच्या येण्याजाण्यामागे काय लाॅजिक आहे ? तर काहीही लाॅजिक नसणं हेच त्यामागचं लाॅजिक आहे. केवळ चॅनल अँकरने घेतलेली मुलाखत व्हायरल होऊन कुलकर्णींच्या घरापर्यंत पोचण्याचं अतर्क्य लाॅजिक शोधत बसायचं नसतं, ते एन्जाॅय करत आपण फक्त हसायचं असतं.

निमिष कुलकर्णी, सुकन्या काळण आणि विकास चव्हाण हे तिघे मांगले-चिरमुले जोडीला अतिशय सुंदर साथ देतात. सुकन्या काळण तर दोन भूमिका करतात. दुसऱ्या अंकातील लावणी सुद्धा त्यानी मस्त रंगवलीय. बाकी शऱ्या आणि हवालदार मानमोडेच्या भूमिकेला संतोष पवार टच आहेच. उदाहरणार्थ सावधान म्हटल्यावर विश्राम होणं किंवा नेमक्या उलट आज्ञा पाळणं, हे लेखकाने संहितेमध्ये नक्कीच लिहिलेलं नसणार. अशा असंख्य जागा दिग्दर्शकाने संपूर्ण नाटकात पेरल्या आहेत. त्यामुळे त्यातून उगवलेल्या बंपर विनोदाचं पीक पैसे वसूल करून जातं.

आशुतोष वाघमारे हा अत्यंत टॅलेंटेड संगीतकार, केवळ जनसंपर्कात कमी पडल्याने मागे राहिला असावा. त्याच्या अनेक प्रायोगिक नाट्याकृती माझ्या पहाण्यात आल्या आहेत. मुंबई विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागासाठी विद्यार्थ्यांकडून करवून घेतलेल्या द. मा. मिरासदारांच्या “मी लाडाची मैना तुमची”मधल्या लावण्यांच्या बहारदार चालींची आठवण इथेही आल्यावाचून राहात नाही. वैभव मांगले सारख्या नटाला अधोरेखित करायला त्यांच्याकडून संवाद गाऊन घेण्याची गंमतही या नाटकातील विनोदाचा एक भाग होऊन गेलाय. त्यामुळे कॅची नाव असलेलं टायटल साँग असो वा लावणी नाटकाच्या संगीताला साजेसेच ठरले आहे. बाकी नेपथ्यात संदेश बेंद्रे आणि प्रकाश योजनेत रवी-रसिक कुठेही कमी पडलेले नाहीत. निवेदिता सराफ, मयुरी मांगले आणि दिलीप जाधव यां निर्मात्यांनी रंगमंचावर आणलेला विपर्यासी थाटाचा फार्स प्रेक्षकांची वाहवा मिळवून जाईल यात शंकाच नाही..!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -