
- गोलमाल : महेश पांचाळ
कॉर्पोरेट गिफ्टिंग कंपनी चालवणाऱ्या नूतन आयरे या अंधेरी पश्चिम येथील रहिवासी. ५० वर्षीय आयरे या तिच्या मैत्रीण जावकर यांच्या ओळखीतून श्वेता बडगुजर हिला पहिल्यांदा यावर्षीच्या जानेवारी महिन्यात भेटल्या होत्या. तसेच जावकर आणि आयरे यांची मैत्री २०१४ पासून होती. बडगुजरने आपण मुंबई सत्र न्यायालयात सरकारी वकील असल्याचे सांगितले होते. तसेच, तिचा भाऊ सीमाशुल्क विभागाचा वरिष्ठ अधिकारी असून तिच्या भावाचा प्रभाव वापरून सीमाशुल्क विभागाच्या लिलावातून 'जप्त केलेले' स्वस्त दरात सोने खरेदी करण्यास मदत करू शकते असेही सांगितले. त्यानंतर तिने तिचे दागिने विकले आणि पैसे बडगुजरकडे दिले.
बडगुजर हिने सुरुवातीला पैसे परत केले. त्यातून आयरेला थोडा नफा झाला होता, ज्यामुळे तिचा बडगुजरवरील विश्वास वाढला होता. आयरेचा विश्वास संपादन केल्यानंतर, बडगुजर हिने तिला सांगितले की, सीमाशुल्क विभाग प्रत्येकी १० किलो सोन्याच्या तीन विटांचा १५ कोटी रुपयांना लिलाव लवकरच होणार आहे. जे सोने बाजारभावापेक्षा स्वस्त असणार आहे. मात्र, रोख रक्कम दिली तरच ते या लिलाव प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे, असे बडगुजरने आयरेला सांगितले.
बडगुजर आणि जावकर यांच्या सांगण्यावरून, आयरेने तिच्या सहा मित्रांना आणि नातेवाइकांना सोन्याच्या विटा खरेदी करण्यासाठी तयार केले आणि बडगुजरकडे पैसे दिले. जानेवारी ते सप्टेंबर २०२३ दरम्यान आयरे आणि इतर सहा जणांनी मिळून बडगुजरकडे ९ कोटी ८६ लाख रुपये एवढी मोठी रक्कम दिली होती. मात्र, या सहा जणांना दोन-तीन महिने उलटून गेल्यानंतरही सोने अथवा पैसे मिळाले नाहीत. “सुरुवातीला, बडगुजर हिने परतफेड करण्यासाठी वेळ मागितला. पण नंतर तिला पैशाबद्दल विचारले असता तिने धमकी देण्यास सुरुवात केली, असे आयरे हिचे म्हणणे आहे. ती तिच्या मुलीसह आत्महत्या करेल आणि सुसाइड नोटमध्ये तुम्हाला जबाबदार धरेल. तसेच आपला पोलीस अधिकाऱ्यांमध्ये मजबूत प्रभाव असल्याने ड्रग्ज किंवा इतर पोलीस केसेसमध्ये अडकवण्याची धमकी देखील बडगुजर हिने दिली,” असे आयरे यांनी पोलीस तक्रारीमध्ये म्हटले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला तेव्हा, बडगुजर हिने मुंबई सत्र न्यायालयात सरकारी वकील असल्याची बतावणी केली होती. तसेच तिने कविता दीपक देसाई आणि स्मिता दीपक देसाई यांसारख्या उपनामांचा वापर करून अशाच प्रकारे अनेक लोकांची फसवणूक केल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. ज्यांनी आयरे सोबत ओळख करून दिली, त्या जावकर हिचाही फसवणूक प्रकरणात सहभाग असल्याची बाब पुढे आली आहे. डीएननगर पोलीस ठाण्यात ऑक्टोबरमध्ये बडगुजर, अक्षय देसाई, दर्शन देसाई आणि स्वाती जावकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी १५ डिसेंबर रोजी बडगुजर हिला अटक केली. इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
maheshom108@ gmail.com