बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले… या उक्तीचा प्रत्यय पुन्हा पुन्हा आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात प्रभावी नेते आधीच ठरले आहेत. त्यांनी याबाबत जगातील सर्वच नेत्यांना कधीच मागे टाकले आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोशल मीडियावर देखील प्रभावी आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांचा जगभरातला दबदबा आणि लोकप्रियता सतत वाढत असल्याचे दिसून येत आहे. यावेळेचे कारण म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या यूट्यूब चॅनेलने व्ह्यूज आणि सब्सक्रायबरच्या बाबतीत भारत आणि जगातील इतर नेत्यांच्या यूट्यूब चॅनेलना सहज मागे टाकले आहे. ‘यूट्यूब’वरील नरेंद्र मोदी यांची एक पोस्ट पाहणाऱ्यांची संख्या नुकतीच २ कोटींवर पोहोचली व हा विक्रम करणारे मोदी हे जगातील पहिले व एकमेव नेते ठरले आहेत. म्हणजेच पंतप्रधान मोदी यांच्या नियमित ‘सबस्क्रायबर्स’ची म्हणजे पाठीराख्यांची संख्या विक्रमी २ कोटींवर (२० दशलक्ष) पोहोचली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता जगात सर्वाधिक लोकप्रिय नेते आहेत. मोदी हे १० वर्षांपूर्वी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी अनेक गोष्टींच्या बाबतीत जगात आपली वेगळी अशी छाप सोडली आहे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रभाव कायम राहिला आहे.
हे काही सहज झालेले नाही. मोदी यांची खास बात म्हणजे ते नवे तंत्रज्ञान आणि नवनव्या गोष्टी लवकरात लवकर आत्मसात करतात व त्याचा नियमितपणे वापरही त्वरित सुरू करतात. त्यामुळे बदलत्या काळाबरोबर किंवा नव्या, आधुनिक युगासोबत ते लगेच स्वतःला जुळवून घेतात. किंबहुना हेच त्यांचे वेगळेपण आहे आणि हीच त्यांची खासियत असल्याने जुन्या जाणत्या लोकांबरोबरच अगदी नव्या, किशोरवयीन म्हणा कॉलेजचे विद्यार्थी, तसेच तरुण – तरुणींमध्ये त्यांची क्रेझ दिवसागणिक वाढताना दिसत आहे. पंतप्रधान मोदी हे नेहमीच डिजिटल युगाला प्रोत्साहन देताना दिसतात. त्यांची गणना अशा नेत्यांमध्ये केली जाते ज्यांनी डिजिटल लेन्सद्वारे राजकारणाचे जग पहिले आहे. याच प्रमुख कारणामुळे आज त्याचे यूट्यूब चॅनेल जगातील इतर कोणत्याही नेत्याच्या यूट्यूब चॅनेलपेक्षा अधिक सबस्क्रायबर्स असलेले चॅनेल बनले आहे.
सध्या नरेंद्र मोदी यांच्या चॅनलचे २ कोटींहून अधिक सदस्य आहेत. पीएम चॅनेलची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्यावर अपलोड केलेले व्हीडिओ हे सर्वसामान्यांपासून ते श्रीमंत, अतिश्रीमंत किंवा कोणत्याही जाती-धर्माच्या अशा सर्वच लोकांना खूप आवडतात. ते व्हीडिओ व त्यातील माहिती त्यांना वास्तववादी भासतात आणि म्हणूनच आपलेसे वाटतात. याच गोष्टीमुळे अनेकदा त्यांच्या एखाद्या व्हीडिओला काही सेकंदात लाखो व्ह्यूज मिळतात आणि त्याची विविध पातळ्यांवर सर्वत्र चर्चा होऊन त्या व्हीडिओच्या चाहत्यांच्या संख्येत साहजिकच वाढ होत जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी जगभरातील लोकप्रिय नेत्यांच्या यादीत आघाडीवर असल्यामुळेच विविध समाजमाध्यमांवर मोदींना फॉलो करणाऱ्या आणि सबस्क्राइब करणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत चालली आहे. आतापर्यंत त्यांच्या ‘यूट्यूब’ खात्यावरील विविध पोस्टर्संना ४५० कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. अशा प्रकारे मोदी हे यूट्यूबवर देखील जागतिक नेत्यांच्या यादीत पहिल्या स्थानावर पोहोचले आहेत. या महिनाभरात मोदींच्या ‘यूट्यूब’ चॅनेलला एकूण २२.४ कोटी व्ह्यूज मिळाले असून हाही एक प्रकारचा विक्रमच आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये मोदींच्या चॅनेलच्या सदस्यांची संख्या १ कोटींच्या पुढे गेली होती. विशेष म्हणजे मोदींनी २००७ मध्ये त्यांचे ‘यूट्यूब’ चॅनेल सुरू केले होते, तेव्हा ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. म्हणजेच मोदी हे गेल्या १५ वर्षांपासून यूट्यूबच्या माध्यमातून देश आणि जगाशी जोडले गेले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकप्रियतेच्या बाबतीत भारतातच नाही तर जगात पहिल्या स्थानावर आहेत. या वर्षी देशातील मुंबई, दिल्ली यांसारख्या प्रमुख शहरांत G-२० शिखर परिषदेचे यजमानपद भारताने भूषविले व एकप्रकारे हा देशाचा गौवरच होता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या जागतिक शिखर परिषदेचे यशस्वीपणे आयोजन केले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक वेगळी ओळख आणि विशेष पैलू संपूर्ण जगाने पाहिला. तसेच या वर्षाच्या अखेरीस झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने तीन राज्यांमध्ये सत्ता मिळवली आहे. निवडणुकांतील या यशाचे सर्व श्रेय हे पंतप्रधान मोदींनाच जाते. कारण या निवडणुकीमध्ये भाजपातर्फे मोदी यांचाच चेहराच प्रमुख होता. त्यांनीच या राज्यांमध्ये जाहीर सभा, रोड शो आदींमध्ये सहभागी होत विरोधकांच्या प्रचारांतील सर्व मुद्दे खोडून काढत त्यांना चारमुंड्या चीत केले. मोदींच्या या झंझावातामुळे मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपाने जोरदार विजय मिळवला.
नरेंद्र मोदी यांनी मॉर्निंग कन्सल्टच्या मान्यता रेटिंगमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. ते जगातील सर्वात लोकप्रिय नेते ठरले आहेत. यूट्यूब व्यतिरिक्त इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खूप मोठे चाहते आहेत. पीएम मोदींचे X (पूर्वीचे ट्विटर) अकाऊंटवर ९४ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. इंस्टाग्रामवर ८२.७ मिलियन फॉलोअर्स आहेत. फेसबुकवर ४८ मिलियन फॉलोअर्स आहेत. मोदींच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर १२.६ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीतील राहुल गांधींसह तमाम प्रमुख नेत्यांच्या ‘यूट्यूब’ पाठीराख्यांची संख्या त्यापेक्षा कितीतरी कमी असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. त्यामुळे मोदी यांच्या लोकप्रियतेच्या या विषाल गगनभरारीपुढे ‘इंडिया’ नामक अहंकारी विरोधकांची आघाडी मोदींसमोर किती खुजी आहे, हे दिसून येते आणि देशात नव्हे तर जगात सर्वात भारी, नरेंद्र मोदी, असेच म्हणावे लागेल.