कामावरुन काढून टाकल्याच्या रागामुळे दोन कर्मचार्यांची धक्कादायक कृती
गांधीनगर : कामाच्या ठिकाणी आपल्या बॉसला शिव्या देणारे कितीतरी जण आपण पाहिले आहेत. बॉसचा जाच त्यांना नको झालेला असतो. पण याच बॉसने आपल्याला कामावरुन काढून टाकलं तर? त्यामुळे बॉसची मर्जी राखणं गरजेचं होऊन बसतं. पण या सगळ्याला छेद देणारा एक धक्कादायक प्रकार गुजरातच्या एका सॉफ्टवेअर कंपनीमधून समोर आला आहे. कामावरुन काढून टाकल्याच्या रागामुळे बॉसचा बदला घेण्यासाठी दोन कर्मचार्यांनी बॉससोबत केलेला प्रकार हादरवणारा आहे.
गुजरातमध्ये एका कंपनीत बॉसच्या जाचाला कंटाळून दोन कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडली. मात्र, त्यानंतर त्या बॉसचा विचार सोडून देऊन ते शांत बसले नाहीत. तर त्यांनी बॉसचं जिणं हराम करायचं ठरवलं. या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या माजी बॉसला हनीट्रॅपमध्ये फसवून त्याचे न्यूड फोटो ऑफीस आणि त्याच्या पत्नीसह अनेकांना फॉरवर्ड केले. अखेर पीडित बॉसने पोलिसात तक्रार दिली आणि हे संपूर्ण प्रकरण उजेडात आले. या घटनेची सर्वत्र चर्चा होत आहे.
नेमका कसा रचला हनीट्रॅप?
पीडित बॉस एका सॉफ्टवेअर कंपनीचा प्रमोटर आहे. त्याला वैतागून कंपनी सोडणाऱ्यांमध्ये एक महिला कर्मचारी आणि एक पुरुष कर्मचाऱ्याचा समावेश आहे. त्यांनी इंस्टाग्रामवर एक फेक फिमेल अकाउंट बनवलं आणि त्यांच्या बॉसला फ्रेंड बनवून चॅटिंग सुरू केली. मुलगी असल्याचं भासवून हे दोघे त्याच्याशी चॅटिंग करत राहिले. हळूहळू त्याच्यासोबत मैत्री वाढवली आणि नंतर त्याच्यासोबत अश्लील गप्पा मारणे सुरु केले. काही न्यूड फोटो देखील पॉर्न वेबसाईटवरून डाउनलोड करून पाठवून दिले. यानंतर त्या बॉसकडे देखील न्यूड फोटो मागितले आणि त्यानेही काही न्यूड फोटोज पाठवले. यानंतर या अकाउंटवरून चॅटिंग करणं बंद झालं.
काही दिवसांनंतर या दोन कर्मचाऱ्यांनी न्यूड फोटो आणि सेक्स चॅटचे स्क्रीनशॉट्स त्यांच्या बॉसला इमेल केले. हे पाहताच तो अवाक झाला. यानंतर सप्टेंबर महिन्यात त्याच्या ऑफिसातील एचआर डिपार्टमेंटला देखील हे फोटो आणि सेक्स चॅटच्या प्रिंट पाठवण्यात आल्या. इतक्यावरच हे थांबलं नाही तर त्याच्या बायकोला देखील हे सर्व पाठवण्यात आलं. या माजी बॉसला शिव्या आणि धमक्या देणारे ईमेल देखील पाठवण्यात आले. तीन महिन्यांपर्यंत बॉसला हा त्रास दिला जात होता. अखेर त्याने दहा दिवसांपूर्वी सायबर क्राइम पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी आयपी अॅड्रेसच्या माध्यमातून या दोघांना शोधून काढलं.
एसीपी हार्दिक मकाडिया यांनी सांगितलं की दोघांना सीआरपीसीचे कलम ४१ (अ) अंतर्गत नोटीस पाठवण्यात आली. या कलमांतर्गत अटक करण्यापूर्वी नोटीस पाठवली जाते. मात्र तक्रारकर्ता या प्रकरणाला पुढे नेऊ इच्छीत नाहीत.