Monday, August 25, 2025

मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते पेण मधील अनेक पुलांच्या बांधकामाचे भूमिपूजन

मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते पेण मधील अनेक पुलांच्या बांधकामाचे भूमिपूजन

पेणच्या आजी माजी आमदारांच्या पाठपुराव्याने हे शक्य झाले - रविंद्र चव्हाण

पेण (देवा पेरवी)- महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते आज पेण तालुक्यातील भोगावती आणि बाळगंगा नदीवरील विविध ठिकाणच्या पुलांच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले आहे. तालुक्यातील एकुण पाच ठिकाणी ह्या पुलांचे बांधकाम करण्यात येणार असुन बोरगाव, शहरातील भुंडा पूल, अंतोरे, खरोशी, दुरशेत, रावे येथील पुलांचे भूमिपूजन करण्यात आले.

सदर भूमिपूजन कार्यक्रमासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यासोबत माजी मंत्री तथा विद्यमान आमदार रविंद्र पाटील, भाजपचे जिल्हा अध्यक्ष तथा माजी आमदार धैर्यशील पाटील, जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील, ॲड नीलिमा पाटील, माजी नगराध्यक्षा प्रितम पाटील, डी.बी.पाटील, प्रभाकर म्हात्रे, सरपंच दर्शना पाटील आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पेण बोरगांव येथील पेण - खोपोली रस्त्यावर भोगावती नदीवर मोठ्या पुलाचे भूमिपूजन करणे, पेण - बोरगांव रोड इजिमा ५६ भोगावती नदीवर पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन करणे, अंतोरे ते सापोली रस्त्यावर भोगावती नदीवर पुलाचे भूमिपूजन करणे, दुरशेत ते खरोशी दरम्यान बाळगंगा नदीवर मोठ्या पुलाचे भूमिपूजन करणे आणि जोहे - रावे कासारभट पुलाचे भूमिपूजन करणे या पाच कामांचे भूमिपूजन राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.

यावेळी बोलताना मंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले की, भूमिपूजन झालेल्या पुलांचे काम लवकरात लवकर पूर्ण होऊन नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध होतील असे सांगत असतानाच विद्यमान आमदार रविंद्र पाटील आणि माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या पाठ पुराव्यामुळेच हे शक्य झाले असल्याचे सांगितले. तर येथील ग्रामस्थांनी गेली अनेक दशके जी पुलांची कामे झाली नव्हती ती होत असल्याने मोदी सरकारसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण आणि कामाचा पाठपुरावा करणाऱ्या आमदार रविंद्र पाटील यांचे मनोमन आभार मानले.

तसेच पुलांची निर्मिती दोन भागांना जोडण्यासाठी होते, पुलामुळे पाण्याची साठवण करता येईल, ज्या ज्या ठिकाणी पूल होतील तेथे जल संवर्धन केलं जाईल, २८ हजार पाणी टंचाईग्रस्त गावातील देवेंद्र फडणवीस यांनी अहवाल मागवला, नद्यांचे खोलीकरण केले, रायगडात ३ मेट्रिक टन गाळ काढला गेला, हे फक्त ब्रिज नसून तर गावांना पाणी पुरवणारी व्यवस्था आहे, उद्योजकांनी पुढे येऊन हे कार्य पुढे घेऊन गेले पाहिजे, पेण शहर एमएमआरडीए आणून पेण शहराचा विकास तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे झाल्याचेही सांगितले. तर २४ तासापैकी १८ तास काम करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देश महासत्ता कडे घेऊन जायचे असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले. यावेळी विद्यमान आमदार रवींद्र पाटील, माजी आमदार धैर्यशील पाटील, नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >