मुंबई : मुंबई महानगरात सुरु झालेली संपूर्ण स्वच्छता मोहीम ही लोकचळवळीत रुपांतरीत होत असून येत्या रविवारी म्हणजे ३१ डिसेंबर २०२३ रोजी महा स्वच्छता अभियान अर्थात मेगा डीप क्लिनिंग ड्राइव्हच्या रुपात हा उपक्रम मुंबईत एकूण १० ठिकाणी राबवावयाचा आहे, जेणेकरुन त्याची कार्यपद्धती लक्षात घेवून महाराष्ट्र राज्यातील इतर शहरे व स्थानिक स्वराज्य संस्थांना देखील त्यांच्या स्तरावर अंमलबजावणी करता येईल. या महा स्वच्छता अभियानासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यंत्रणेने आवश्यक त्या तयारीनिशी सज्ज रहावे, असे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार मुंबई महानगरात यापुढे दररोज १ हजार किलोमीटर लांबीचे रस्ते नियमितपणे स्वच्छ करुन धुवून काढण्याचे नियोजन आहे. त्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ, पाण्याचे टँकर व इतर संयंत्र नेमावेत. तसेच, कोठेही अनधिकृत बॅनर्स, जाहिरात फलक, पोस्टर्स दिसल्यास त्यांचे निष्कासन करावे, हवेची गुणवत्ता खालावण्यास कारणीभूत ठरणा-या बांधकाम प्रकल्पांवर कठोर कारवाई करावी, असे निर्देशही डॉ. चहल यांनी दिले आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात ३ डिसेंबर २०२३ पासून दरआठवड्यात एक दिवस प्रत्येक परिमंडळातील एका प्रशासकीय विभागात (वॉर्ड) संपूर्ण स्वच्छता मोहीम (डीप क्लिनिंग ड्राइव्ह) राबविण्यात येत आहे. महानगरपालिकेची ही मोहीम महाराष्ट्रभर विस्तारण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलीकडेच केली होती. या पार्श्वभूमीवर, येत्या रविवारी म्हणजे३१ डिसेंबर २०२३ रोजी मुंबईत दहा ठिकाणी महा स्वच्छता अभियान (मेगा डीप क्लिनिंग ड्राइव्ह) राबविण्यात येणार आहे. त्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेवून यथोचित निर्देश देण्यासाठी महानगरपालिका आयुक्त सिंह चहल यांनी सर्व संबंधित खात्यांची आज (दिनांक २८ डिसेंबर २०२३) बैठक घेतली. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्यासह सर्व संबंधित सहआयुक्त, उप आयुक्त, सहायक आयुक्त, खातेप्रमुख बैठकीस उपस्थित होते.
स्वच्छतेची मोहीम प्रशासकीय स्वरुपाची न राहता त्याला लोकचळवळीचे स्वरुप मिळावे म्हणून सर्व लोकप्रतिनिधींसह शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन तरुण, स्काऊट व गाईड, राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी), स्वयंसेवी संस्था, ख्यातनाम व्यक्ती व समाजातील सर्व भागधारक, स्थानिक नागरिक मोहिमेमध्ये सहभागी झाले पाहिजेत, यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, अशी सूचनाही आयुक्तांनी केली.