श्रीराम मंदिर उभे राहात असताना…

Share

विजय रोकडे

अयोध्येतील श्रीरामाच्या जन्मभूमीवर मंदिर उभे करण्याचा संकल्प भाजपाने १९८८ मध्येच सोडला होता. त्यासाठीचा ठराव या पक्षाने केला होता. आता लवकरच श्रीराम मंदिराचे लोकार्पण होत आहे. संकल्प प्रत्यक्षात येत असल्याने, या दिवसाचे संपूर्ण श्रेयही भाजपाचेच. म्हणूनच २०२४ च्या निवडणुकीत श्रीराम मंदिराची उभारणी हा भाजपाचा प्रचाराचा मुख्य मुद्दा राहिला, तर आश्चर्य वाटणार नाही.अयोध्या येथील श्रीराम मंदिराचा उद्घाटन सोहळा लवकरच संपन्न होणार आहे. अर्थातच तो भव्य सोहळा असेल, ज्यामध्ये भारतासह जगभरांतून लाखो भाविक उपस्थित राहतील, अशी अपेक्षा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या समारंभाच्या अध्यक्षस्थानी असतील. धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर या मंदिराचे लोकार्पण करण्यात येईल. अयोध्या येथील श्रीराम मंदिराचा उद्घाटन सोहळा हा जगभरातील हिंदूंसाठी अभिमानाचा, गौरवाचा क्षण असणार आहे.

अनेक शतकांच्या प्रतीक्षेनंतर श्रीरामाच्या जन्मस्थळी उभे राहात असलेले मंदिर हे अनेक पिढ्यांनी पाहिलेले स्वप्न अखेर साकार करणारे आहे. म्हणूनच कोट्यवधी हिंदू त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा एक ऐतिहासिक क्षण असून त्याचे अनेक वर्षे स्मरण केले जाईल. हिंदूंची श्रद्धा आणि भक्ती याचा तो दाखला आहे. भाजपाने ‘मंदिर वही बनायेंगे’ हा नारा दिला होता आणि भाजपाच्याच कार्यकाळात तो प्रत्यक्षात येत आहे. म्हणूनच २०२४ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये श्रीराम मंदिराची उभारणी भाजपाच्या प्रचाराचा प्रमुख मुद्दा राहील, यात कोणतीही शंका नाही. पंतप्रधान मोदी यांची मंदिराच्या उभारणीतील भूमिका निर्णायक ठरली आहे. हे मंदिर केवळ श्रीरामाचे मंदिर म्हणून ओळखले जाणार नाही, तर हिंदूंची अस्मिता आणि भावना यांचे प्रतीक ठरणार आहे. म्हणूनच अयोध्या येथील श्रीराम मंदिराचे महत्त्व अनन्यसाधारण असेल. भारतात, विशेषतः उत्तर भारतातील हिंदी भाषिक राज्यांमधील हिंदू मतदारांवर याचा सकारात्मक परिणाम होणार आहे. भाजपाचा तो प्रमुख जनाधारही आहे. त्याचवेळी सांस्कृतिक आणि आध्यात्मिक पातळीवर नवे संदर्भ प्रस्थापित होऊन दक्षिणेकडील राज्यांमधील मतदारांनाही तो आकर्षित करू शकतो.

श्रीराम मंदिर आंदोलनाने स्वातंत्र्योत्तर भारताच्या राजकारणात मूलभूत परिवर्तन केले. राजकीय वनवास संपवून भाजपाला एकहाती सत्ता देण्याचे काम या आंदोलनाने केले. त्याचबरोबर हिंदुत्वाचा मुद्दा जाती-पातीच्या पलीकडे जात संपूर्ण हिंदूंना एक करणारा ठरला. लालकृष्ण अडवाणी यांनी काढलेल्या देशव्यापी रथयात्रेनंतर भाजपाचा जनाधार वाढत गेला. लोकसभेच्या दोन जागा ते २०१९ मध्ये सर्वाधिक ३०३ जागा जिंकत स्वबळावर केंद्रात स्थापन केलेले सरकार असा विक्रमही भाजपाने केला. आता २०२४ मध्ये सलग तिसऱ्यांदा विजयी होत भाजपा केंद्रात सरकार स्थापन करेल, असे संकेत मिळत आहेत. भाजपाचा हा प्रवास थक्क करणारा आहे. राम जन्मभूमी आंदोलन म्हणजे हिंदू राष्ट्रवादाची प्रमुख चळवळ ठरली. अयोध्येतील श्रीरामाच्या जन्मस्थळी बाबरने अनधिकृत बांधकाम उभारले होते. त्या जागेवर मंदिर उभे करण्यासाठी हे आंदोलन होते. बाबराने उभारलेला ढाचा १९९२ मध्ये पाडण्यात आला. लाखो कारसेवकांनी केलेले हे उत्स्फूर्त आंदोलन होते. श्रीराम मंदिर आंदोलन उभारणाऱ्या भाजपाने १९८४ च्या लोकसभा निवडणुकीत दोन जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर मात्र प्रत्येक लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या जागा वाढत गेल्या. १९९६ च्या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणूनही भाजपा उदयाला आला. मात्र त्यावेळी अन्य पक्षांच्या मदतीने स्थापन केलेले भाजपाचे सरकार १३ दिवसांमध्ये कोसळले.

१९९८ मध्ये भाजपा पहिल्यांदाच केंद्रात सत्तेवर आला. २००४ मध्ये पक्षाने सत्ता गमावली; परंतु २०१४ मध्ये प्रचंड विजय मिळवून केंद्रात स्वबळावर स्थिर सरकार स्थापन केले. तेव्हापासून केंद्रातील भाजपाची सत्ता अबाधित आहे. २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने मंदिर उभारणीच्या बाजूने निर्णय दिला. भाजपाच्या या वाटचालीत श्रीराम मंदिर आंदोलनाचा मोठा वाटा आहे. या मंदिराची निर्मिती ही पक्षाची प्रदीर्घ काळापासूनची मागणी होती. म्हणूनच ते प्रत्यक्षात येणे हा भाजपाचाच वैचारिक विजय मानला जातो. १९८८ मध्ये पक्षाने मंदिराच्या उभारणीचा ठराव मंजूर केला होता. तेव्हापासून श्रीराम मंदिर हा भाजपाच्या प्रचारातला हुकमी मुद्दा राहिला. २०१४ च्या जाहीरनाम्यातही त्याचा उल्लेख करण्यात आला होता. अयोध्या येथील श्रीराम मंदिराचा इतिहास हा भारतीय राजकारणातील दीर्घकालीन आणि वादग्रस्त मुद्दा म्हणून ओळखला जात होता. रामायणानुसार श्रीराम यांचा जन्म अयोध्येत झाला होता. ज्या ठिकाणी मंदिर उभे राहिले आहे, तेच त्यांचे जन्मस्थान असल्याचे मानले जाते. तथापि, बाबराने सोळाव्या शतकात या ठिकाणी वादग्रस्त ढाचा उभारला. १९८४ मध्ये विश्व हिंदू परिषदेने श्रीराम मंदिरासाठी आंदोलनाची हाक दिली. १९९० च्या सुरुवातीला त्याला खऱ्या अर्थाने गती आली. ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरने उभारलेला अनधिकृत ढाचा उत्स्फूर्त आंदोलनात पाडला गेला. तथापि, हा ढाचा पाडल्यानंतरच कायदेशीर लढाईला वेग आला. अनेक दशके ती सुरू होती.

नोव्हेंबर २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने विवादास्पद जागेचा ताबा श्रीराम मंदिर ट्रस्टकडे सोपवण्याचे आदेश दिले. ऑगस्ट २०२० मध्ये मंदिराचे बांधकाम सुरू झाले आणि आता जानेवारी महिन्यात त्याचे लोकार्पणही होत आहे. अयोध्या हे उत्तर प्रदेशमधील फैजाबादच्या पूर्वेस असलेले शहर. आता फैजाबादचेच नामकरण अयोध्या असे करण्यात आले आहे. हिंदूंच्या महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांपैकी एक म्हणूनही अयोध्येची ओळख आहे. शतकानुशतके या मंदिरासंबंधी वाद सुरू होता. १५२८ मध्ये बाबरने अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमीवर अनधिकृत ढाचा उभारला. या जागेच्या मालकी हक्कावरून पहिला न्यायालयीन खटला दाखल झाला तो १८८५ मध्ये. १९४९ मध्ये बाबरी ढाच्यात श्रीरामाची मूर्ती ठेवण्यात आली. त्यावेळी ढाच्याला टाळे लागले आणि त्यात सर्वांनाच प्रवेश नाकारण्यात आला. विश्व हिंदू परिषदेने १९८९ मध्ये मंदिराच्या उभारणीसाठी आंदोलन हाती घेतले. लाखो कारसेवकांनी एकत्र येत बाबरने उभारलेला ढाचा जमीनदोस्त केला. सर्वोच्च न्यायालयाने विवादास्पद जागेचा ताबा सरकारने घ्यावा, असे आदेश दिले. अलाहाबाद उच्च न्यायालयाने २००२ मध्ये एका आदेशान्वये याचे तीन भागांत वाटप केले. सर्वोच्च न्यायालयाने २०१९ मध्ये ऐतिहासिक निवाडा देत श्रीराम मंदिराच्या बाजूने निर्णय दिला. त्यानंतर मंदिराच्या बांधकामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली.

सत्ताधारी भाजपाने श्रीराम मंदिर आंदोलन उभारले. मंदिराचा प्रवास हा भारतातील धर्म आणि राजकारण यांच्यातील संबंध स्पष्टपणे सांगतो. हिंदू सहिष्णू आहे, हे अधोरेखित करणारे हे मंदिर आहे. निधर्मवादाच्या नावाखाली विशिष्ट धर्माचे लांगुलचालन कसे केले जाते, हेही याच कालावधीत दिसून आले. एकगठ्ठा मतांसाठी तुष्टीकरण करण्याची प्रथा भाजपाने हद्दपार केली. सोळाव्या शतकात बाबरने राम जन्मभूमीवर अनधिकृत ढाचा उभारला. मात्र, हिंदूंना त्यांच्या आराध्यदैवताच्या जन्मस्थानी मंदिर उभे होण्यासाठी २०२४ पर्यंत वाट पाहावी लागली. भाजपाने यासाठीची राजकीय इच्छाशक्ती दाखवल्यानेच ते प्रत्यक्षात येत असेल, तर त्याचे संपूर्ण श्रेय घेण्याचा अधिकारही भाजपाला राहतो.

२०२४ च्या निवडणुकीमध्ये श्रीराम मंदिराची उभारणी हा भाजपाच्या प्रचाराचा केंद्रबिंदू राहिला, तर त्यात कोणतेही आश्चर्य वाटणार नाही, ते त्यामुळेच. धर्मनिरपेक्ष राष्ट्रामध्ये बहुसंख्य हिंदूंच्या आस्थेविषयी ममत्व दाखवून हे मंदिर उभे करणे, हे प्रचंड अवघड काम भाजपाने प्रत्यक्षात आणून दाखवले आहे. आता उत्तर प्रदेशात धार्मिक पर्यटनाला चालना मिळत आहे. अयोध्या येथील श्रीराम मंदिराला जगभरातून लाखो यात्रेकरू भेट देतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. पर्यटनाला चालना मिळाल्याने अर्थकारणाला गती मिळेल, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत. काशी येथील श्री विश्वनाथ कॉरिडॉरच्या उद्घाटनानंतर दर महिन्याला सुमारे ६० लाख भाविक तेथे भेट देतात. धार्मिक सणांमध्ये ही संख्या वाढते. पर्यटकांच्या संख्येत वाढ झाल्याने स्थानिक अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम झाला आहे. हॉटेल, रेस्टॉरंट आणि अन्य व्यवसायांच्या महसुलात लक्षणीय वाढ झाली आहे. स्थानिक रहिवाशांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. अयोध्येतही काशीची पुनरावृत्ती होईल, असे मानले जाते.

Recent Posts

कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात चार मराठी चित्रपट प्रदर्शित होणार

मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…

30 minutes ago

Summer Food Alert : उन्हाळ्यात शरीराची उष्णता वाढवणारे ‘हे’ पदार्थ टाळा

मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…

39 minutes ago

Health Tips: कडक उन्हामुळे चक्कर येत असेल तर हे पेय प्या!

तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…

48 minutes ago

प्रसिद्ध डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी महिलेला पोलीस कोठडी

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…

1 hour ago

Central Railway News : मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; बदलापुरातील फलाट क्रमांक १ कायमस्वरूपी बंद!

बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…

2 hours ago

संग्राम थोपटे २२ एप्रिल रोजी भाजपात प्रवेश करणार, काँग्रेसला दिली सोडचिठ्ठी

पुणे : माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे आणखी एक माजी आमदार महायुतीच्या वाटेवर…

2 hours ago