
लोकसभा २०२४ च्या निवडणुका केव्हाही होवो...परंतु त्याची चर्चा मात्र गेले वर्षभरापासून सुरू झाली आहे. देशाच्या राजकारणात काय होईल, याचा ट्रेलर नुकत्याच पार पडलेल्या चार राज्यांच्या निवडणूक निकालाने समोर आला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार करता राज्यातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांची युती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली निवडणुका लढविल्या जाणार आहेत, तर इंडिया आघाडीची मोट बांधणीचे काम सध्या सुरू आहे. यात किती सूर जुळून येतात की बेसूर आळवले जातात, याचे दर्शनही महाराष्ट्राला घडेल. देशात स्थिर सरकारचा विचार सर्वसामान्य माणसाला हवा असतो. स्थिरतेने प्रगतीकडे वाटचाल करता येते. यामुळे एनडीए आणि इंडिया आघाडी यामध्ये सामान्यांचा कल कुठे असेल याचे सरळ साधे उत्तर सापडू शकते. महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरेंची शिवसेना फार बॅक फुटवर गेलेली आहे. शिवसेनेतील निर्णय दोन राऊत आणि एक देसाई यांच्या सांगण्यावरून होतात. खा. संजय राऊत, शिवसेना सचिव विनायक राऊत आणि खा. अनिल देसाई यांनी सांगायचे आणि मातोश्रीने ऐकायचं असं सध्या सुरू असल्याची चर्चा सेनेत होताना दिसते.
कोकणाने आजवर शिवसेनेची पाठराखण केली. कोकणची जनता शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांसोबत राहिली. कोकणामध्ये लोकसभेच्या दोन जागा आहेत. रायगड मतदारसंघात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे लोकसभेत प्रतिनिधित्व करतात. २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेचे माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचा पराभव करून तटकरे निवडून आले होते. यावेळीही पुन्हा सुनील तटकरे विरुद्ध अनंत गीते असाच लोकसभा निवडणुकीत सामना रंगण्याची शक्यता आहे. अर्थात शिवसेनेने लोकसभा निवडणुकीत आ. भास्कर जाधव यांना निवडणूक रिंगणात उतरविले, तर खा. तटकरे यांच्यासाठी ही निवडणूक अधिक सोपी होऊ शकते, असे राजकीय धुरिणांना वाटते.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी लाटेचा फायदा विद्यमान खासदार शिवसेना सचिव खा. विनायक राऊत यांना झाला. २०१४ व २०१९ या दोन्ही निवडणुकीमध्ये आरएसएस व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करून खा. विनायक राऊत यांना लोकसभेत पाठविले. मात्र, या दोन्ही निवडणुकीतील राजकीय वातावरण आणि स्थिती आज तशी नाही. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून खा. विनायक राऊत यांचे नाव निश्चित झाले आहे. भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसकडून ही जागा कोण लढवणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे!
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपा निवडणूक लढविण्याची शक्यता अधिक आहे. या लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत तीन लाखांच्या जवळपास मते स्वाभिमानच्या उमेदवारीवर माजी खासदार निलेश राणे यांना मिळाली होती. यामुळे या लोकसभा मतदारसंघात तीन लाख मते केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांना व्यक्तिगत मानणारी अधिक भाजपाला मानणारे यामुळे यावेळची लोकसभा निवडणूक खा. विनायक राऊत यांच्यासाठी कठीण आणि अवघड जाणारी आहे. त्यातच उद्योगमंत्री उदय सामंत आणि उद्योजक किरण सामंत यांची राजकीय आणि आर्थिक साथ खा. विनायक राऊत यांना नसल्याने त्याबाबतीतही खा. राऊत यांच्यासाठी मारक ठरणारी आहे.
२०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत फारसे कष्ट न घेता सहज विजयी होता आले होते. त्यातच गेल्या दहा वर्षांत रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार म्हणून लोकोपयोगी कोणतीही कामगिरी नाही. कोणताही उद्योग नाही की, नाव घेऊन सांगता येईल अशी कोणतीही कामगिरी खा. विनायक राऊत यांच्या नावावर नाही. उलट गेली दहा वर्षे कोकणातील प्रत्येक उद्योगाला आणि विकासकामांना विरोध, केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांच्यावर वर्षाचे ३६५ दिवस टीकाटिप्पणी या कामगिरीचा उल्लेख कुणालाही टाळता येणार नाही. गेल्या दहा वर्षांत रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याचे राजकारण पूर्णपणे बदलले आहे. एकसंध असणारी शिवसेना दुभंगली आहे. भाजपा कोकणात मोठ्या ताकदीने उभी आहे. एकीकडे राजकारणातील हे सर्व बदल येणाऱ्या निवडणुकीत खा. विनायक राऊत यांच्यासाठी अधिक धोकादायक आहेत.
भजनांच्या माध्यमातून खा. राऊत यांचा असलेला संपर्क भजनप्रेमींना सुखावणारा असला तरीही मतदानाच्या टक्केवारीत वाढ करणारा तो निश्चितच नाही. याच वास्तवतेत खा. विनायक राऊत यांच्यासमोरील पक्षात बेरजेचे राजकारण झाले आहे. आजच्या घडीला उमेदवार कोण? हा प्रश्न असला तरीही भाजपाकडून निवडून येण्याची क्षमता असलेल्याला उमेदवारी दिली जाईल. भाजपाचे लोकसभा निवडणुकीचे एक बेरजेचे राजकारण त्याचे ‘स्टॅटीस्टीक’ तयार आहे. त्यामुळे या सर्व राजकीय पार्श्वभूमीवर विद्यमान खासदार विनायक राऊत यांच्याबाबतीत मात्र वजाबाकीचे राजकारण असल्याचे स्पष्टपणे दिसते. यामुळेच आगामी लोकसभा निवडणूक भाजपा मित्र पक्षांसाठी अधिक जमेची असल्याचे मानले जाते. राजकारणात नेहमीच बेरजेच्या राजकारणात यश मिळते, ही वस्तुस्थिती कोणालाही नाकारता येणारी नाही.