
सेंच्युरियन: भारत(india) आणि दक्षिण आफ्रिका(south africa) यांच्यात रंगलेल्या पहिला कसोटी सामना(test match) आफ्रिकेने तिसऱ्याच दिवशी जिंकला. आफ्रिकेने हा सामना एक डाव आणि ३२ धावांनी जिंकला. आफ्रिकेच्या गोलंदाजांनी भारताच्या फलंदाजांना दोन्ही डावांत सळो की पळो करून सोडले.
आफ्रिकेच्या गोलंदाजाच्या भेदक माऱ्यासमोर भारताचा दुसरा डाव केवळ १३१ धावांवर संपुष्टात आला. या डावात विराट कोहलीने एकेरी झुंज देण्याचा प्रयत्न केला मात्र तो यशस्वी ठरला नाही आणि भारताचा पराभव झाला. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिका आता १-० अशा आघाडीवर आहे. भारताचे सर्व धुरंधर फलंदाज कसोटी सामन्यात सपशेल अपयशी ठरले.
भारताने पहिल्या डावात केएल राहुलच्या १०१ धावांच्या जोरावर २४५ धावा केल्या होत्या. या डावात इतर सर्व फलंदाज अपयशी ठरले होते. त्यानंतर आफ्रिकेने पहिल्या डावात ४०८ धावांचा डोंगर उभा केला. यात डीन एल्गरने १८५ धावांची खेळी केली. तर डेविड बेडिंगहॅमने ५६ धावांची खेळी केली. मॅक्रो जेन्सनने नाबाद ८४ धावा ठोकल्या. यामुळे आफ्रिकेला चारशेपार धावा करता आल्या.
दुसऱ्या डावात सपशेल अपयश
त्यानंतर तिसऱ्या दिवशी भारताने दुसऱ्या डावास सुरूवात केली. मात्र आफ्रिकेच्या भेदक माऱ्यासमोर भारताच्या फलंदाजांनी लोटांगण घातले. यशस्वी जायसवाल ५ धावा, रोहित शर्मा (०), शुभमन गिल(२६), श्रेयस अय्यर(६), के एल राहुल(४), रवीचंद्रन अश्विन(०), शार्दूल ठाकूर(२), जसप्रीत बुमराह(०), मोहम्मद सिराज(४), प्रसिद्ध कृष्णा(नाबाद ०), अशी भारताची फळी कोलमडली. भारताच्या विराट कोहलीने ७६ धावांची खेळी केली.
यासह दक्षिण आफ्रिकेने हा कसोटी सामना एक डाव आणि ३२ धावांनी जिंकला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.