वाहनचालकांचे मोठाल्या सूचना फलकांकडे दुर्लक्ष; थेट नो एंट्रीमध्ये प्रवेशामुळे वाहतूक कोंडी
सुधागड -पाली (गौसखान पठाण): नो एन्ट्रीच्या रस्त्याची गुगल मॅपकडे नोंदच नसल्याने तळा येथे आलेल्या भाविक व पर्यटकांना गुगल मॅपने चांगलाच चकवा दिल्याचे दिसून आले. तळ्यातील वाहनचालकांचे मोठाले सूचना फलकही वाहनचालकांकडून दुर्लक्षित झाल्याने थेट नो एंट्रीमध्ये झालेल्या प्रवेशामुळे वाहतूककोंडी वाढली.
अष्टविनायकांपैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या पालीत नाताळच्या सुट्टीनिमित्त बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी तसेच पुढे तळ कोकणात जाण्यासाठी पर्यटक व भाविकांची रेलचेल सुरू आहे. हजारोंच्या संख्येने भाविक व पर्यटक आणि त्यांची वाहने येजा करत आहेत. अनेकजण गुगल मॅप लावून आत येण्याचा व जाण्याचा रस्ता शोधत आहेत. मात्र येथील नो एन्ट्रीच्या रस्त्याची गुगल मॅपला नोंदच नसल्याने अनेक वाहने नो एन्ट्रीमध्ये प्रवेश करतात आणि त्यामुळे वाहतुकीला अडथळा होऊन वाहतूककोंडी झाल्याने नागरिक, पर्यटक व भाविकांची गैरसोय झाल्याचे दिसून आले.
नाताळच्या सुट्ट्या, नवीन वर्षाचे स्वागत, विविध सहली पालीत दाखल होत आहेत. शिवाय येथून पुढे विळे निजामपूर मार्गे माणगाव, महाड, श्रीवर्धन तसेच तळ कोकणात व पुण्याकडे प्रवास करत आहेत. तर तिकडून येणारी वाहने पाली खोपोली राज्य महामार्गारून पुणे मुंबईकडे जात आहेत. या सर्व वाहनांना पालीतील अंतर्गत रस्त्यावरूनच जावे लागते. पालीत प्रवेश करण्यासाठी स्टेट बँक येथून व पाली बाहेर पडण्यासाठी महाकाली मंदिराजवळून असे दोन मार्ग निर्धारित केले आहेत. या ठिकाणी प्रवेश बंद व बाहेर पडण्याची आणि जाण्याचे मोठे फलक देखील लावण्यात आले आहेत. पण गुगलवर प्रवेश बंद असल्याची नोंद मात्र करण्यात आलेली नाही. अनेकजण मार्ग शोधण्यासाठी ऍडव्हान्स तंत्रज्ञानाचा म्हणजेच गुगल मॅपचा वापर करत आहेत. आणि अशावेळी गुगल मॅपवर रस्ता बंद दिसत नसल्याने ही वाहने प्रवेश बंद असलेल्या मार्गावरून जातात आणि त्यांना अडकून पडावे लागते. तसेच या गाड्यांमूळे मोठया प्रमाणात वाहतुक कोंडी होत आहे. महाकाली मंदिराजवळील मार्गावर सिग्नल देखील लावण्यात आला आहे. मात्र सद्यस्थितीत तो बंद आहे.
येथील रस्ते अरुंद व काही ठिकाणी खराब देखील आहेत. शिवाय नो एंन्ट्री मधुन जाणारी वाहने तापदायक ठरतात. यामुळे वाहने अडकून पडून वाहतूक कोंडी जटिल होते. लवकर या नो एंट्री मार्गाची गुगल मॅपवर नोंद करावी जेणेकरून वाहने प्रवेश बंद असलेल्या रस्त्यावर प्रवेशच करणार नाहीत. मात्र पाली नगरपंचायत किंवा पोलीस स्थानक याबाबत काही ठोस भूमिका घेतांना दिसत नाही. –वकील स्वराज मोरे, पाली
प्रवेश बंद असलेल्या रस्त्याची नोंद गुगल मॅप वर करावी यासाठी संबधीत विभागाच्या पुणे कार्यालयात सांगितले आहे. व यासंदर्भात पाठपुरावा देखील करत आहोत. नो एंट्रीचे मोठे फलक लावण्यात आले आहेत. बाह्यवळण मार्ग झाल्यास पाली शहरातील वाहतूक सुरळीत होईल. दोन मुख्य रस्त्यांचे डांबरीकरण केले आहे. काही अनधिकृत बांधकामे हटवून रस्ता रुंदीकरण केले आहे.- प्रणाली सूरज शेळके, नगराध्यक्ष, नगरपंचायत, पाली
गुगल मॅपवर रस्ता बंद असल्याची नोंद करणे ही नगरपंचायत ची जबाबदारी आहे. आमच्याकडून तशी नोंद करता येत नाही. आमचे पोलीस वाहतूक सुरळीत करण्यासाठी नाक्यानाक्यांवर तैनात असतात. वाहन चालकांनी देखील वाहतुकीचे नियम पाळावे व नो एन्ट्रीचे फलक पाहूनच मार्गक्रमण करावे -सरिता चव्हाण, पोलीस निरीक्षक, पाली
बाह्यवळण मार्ग
बलाप गावावरुन थेट बल्लाळेश्वर मंदिराच्या पाठीमागे झाप गावाजवळ बाह्यवळण मार्ग प्रस्तावित आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र शासन यांच्या आखत्यारीत हा मार्ग होणार आहे. राज्यशासनाने सन २०१० या वर्षी या रस्त्याला मान्यता दिली आहे. तसेच त्यावेळी रस्त्यास १८ कोटी तर भूसंपादनासाठी १० कोटींची मंजुरी मिळाली होती. सदरचा मार्ग वाकण पाली खोपोली राज्य महामार्ग ५४८(ए) व पाली पाटणूस राज्यमार्ग ९४ ला जोडला आहे. यासाठी बलाप, पाली, बुरुमाळी व झाप या गावातील एकूण ९ हेक्टर जागा लागणार आहे.
कोंडी सुटेल
गुगल मॅप व नो इन्ट्री असलेल्या मार्गाची नोंद होणे आवश्यक आहे. तसेच पाली शहरातील सर्व रस्ते रुंदिकरण होणे अवघड आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी बाह्यवळण रस्ता काढणे हा एकमेव पर्याय आहे. बाह्यवळण मार्ग लवकर सुरु व्हावा यासाठी फारसे कोणी पाठपुरावा करतांना दिसत नाही. बाह्यवळण मार्ग झाल्यास थेट दोन्ही कडे जाऊ शकणारे प्रवासी व पर्यटक तसेच मोठ्या गाड्या पालीत येणारच नाहीत. त्यामूळे बरीचशी वाहतूक कोंडी कमी होईल.
इतर वाहनांची रेलचेल
मुंबई गोवा महामार्गाची दुरवस्था झाली आहे, तेथे वारंवार वाहतूक कोंडी होते. त्यामुळे मुंबई वरून कोकणाकडे जाणारे प्रवासी पालीतून विळे मार्गे माणगाव वरून किंवा वाकणवरूण पुढे जातात. तर कोकणाकडून येणारी वाहने माणगाव वरुन विळे मार्गे पालीतून खोपोलीमार्गे पुणे-मुंबईकडे जातात. परिणामी पालीत वाहनांची रेलचेल वाढून अधिक वाहतूक कोंडी होते.