सुरक्षा कर्मचारी करतात काय? मासिक तपासणीत चोरी झाल्याचे आले उघडकीस
पुणे : पुणे मेट्रोचे काम मोठ्या वेगात सुरु आहे. त्यामुळे कामासाठी लागणारे आवश्यक साहित्य कामाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आणून ठेवलेले असते. या सामानाची देखरेख आणि देखभाल करण्यासाठी कंपनीने सुरक्षा कर्मचाऱ्यांची नियुक्तीही केलेली आहे. तरीही बालेवाडीतील हिंजवडी ते छत्रपती शिवाजी नगर मेट्रो मार्ग -३ (Pune Metro Line 3) च्या बांधकाम साइटवरून बेस जॅक, फूटप्लेट्स, आडव्या रॉड्स आणि बटरफ्लाय कपलर्ससह बांधकाम साहित्याची चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. या सर्व साहित्याची एकत्रित किंमत ३१ लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. ही घटना १८ नोव्हेंबर ते १९ डिसेंबर २०२३ या कालावधीत घडल्याची नोंद चतुश्रृंगी पोलीस (Chaturshringi Police Station) दप्तरी करण्यात आली आहे. मेट्रो पर्यवेक्षक (सुपरवाझर) रितेश बाळू प्रधान (वय-२५) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. जगताप नगर, थेरगाव येथे राहणारे आणि ताथवडे येथील वॉरियर सिक्युरिटी सर्व्हिसेसमध्ये कार्यरत असलेले प्रधान यांना पुणे मेट्रो लाइन ३ साठी पीएमआर १४, गणराज चौक, बालेवाडी, ते पीएमआर २० खैरेवाडी, गणेशखिंड रोड येथे बांधकाम साहित्याची देखरेख करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
रितेश बाळू प्रधान हे आपल्या कर्तव्याचा एक भाग म्हणून पुणे मेट्रो लाईन ३ वर नियुक्त केलेल्या सुरक्षा रक्षकांच्या कामाचे निरीक्षण करतात. तसेच पुणे येथील गणराज चौक ते खैरेवाडी पर्यंतचे कार्यक्षेत्र त्यांच्या अखत्यारीत येते. मेट्रो कामात असलेल्या वितरीत बांधकाम साहित्याची नियमित मासिक तपासणी अभियंत्यांद्वारे केली जाते. त्यासंदर्भातील आवश्यक माहिती प्रधान यांना तातडीने दिली जाते. दरम्यान, नमूद केलेल्या घटनेमध्ये नियमीत तपासणीमध्ये महत्त्वपूर्ण बांधकाम साहित्य गहाळ असल्याचे आढळून आले. त्यानंतर सदर कारवाई करण्यात आली.
नियमीत तपासणीत साहित्य कमी असल्याचे आढळून आले. त्यानंतर अभियंत्यांकडून इतर सर्वच साहित्याची तपासणी करण्यात आली. या तपासणीत बेस जॅक, फूटप्लेट, आडवा रॉड आणि बटरफ्लाय कपलरसह चोरीच्या वस्तूंची चोरी झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. या सर्व साहित्याची साधारण किंमत ३१ लाख रुपये असल्याचे प्रधान यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. आपल्या अखत्यारीत असलेल्या साहित्याची चोरी झाल्याचे लक्षात येताच प्रदान यांना धक्का बसला. त्यांनी तातडीने चतुश्रृंगी पोलिस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली. चतुश्रृंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पीआय बालाजी पांढरे यांनी तक्रार मिळाल्याची पुष्टी केली आहे. पाढरे यांनी म्हटले आहे की, गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.