फॅमिली काऊन्सलिंग: मीनाक्षी जगदाळे
चुका होतात, प्रत्येक व्यक्तीकडून कळत-नकळत, अनावधानाने चुका या होतच असतात. कोणतीही चूक मग ती अगदी मोठी असली तरी एकदा झाली, दोनदा झाली तर ती सगळेच माफ करतात, विसरून जातात. वेळप्रसंगी अशा व्यक्तीला सगळे खंबीरपणे सोबत करतात, आधार देतात, त्याला पाठबळ देतात आणि त्याच्या चुकांचे परिणाम भोगून सुद्धा त्याच्यासोबत राहतात. चुकलेली व्यक्तीसुद्धा सगळ्यांची जाणीव ठेवून, सगळ्यांचे आभार मानून स्वतःला सावरते, पुन्हा नव्याने उभी राहते. भविष्यात परत आपल्याकडून असं घडणार नाही याची काळजी घेते.
अनेकदा आपण बघतो की, काहीजण सातत्याने ठरवून चुकीचं वागतात, चुका करताना दिसतात. इतरांना गृहीत धरून, वेठीला धरून परत परत ठरवून जर कोणी असं वागत असेल तर त्याला अचानक घडलेली चूक आहे किंवा घाईत, रागात, भावनेच्या भरात, गडबडीत घडलेली घटना आहे, असं म्हणता येत नाही किंवा त्याकडे इतरांनी दुर्लक्ष करणं पण योग्य नाही. आपल्या आजूबाजूला, कुटुंबात, समाजात अशी अनेक माणसं असतात जे ठरवून जाणूनबुजून अशा गोष्टी करत असतात. ज्या इतरांसाठी त्रासदायक आहेत, नुकसानकारक आहेत. अशा लोकांना स्वतःला पण त्याचा अनेकदा त्रास होतो, झालेला असतो. पण त्यांच्यात सुधारणा काही होत नसते, त्यांचा स्वभाव बदलत नसतो, सवयी बदलत नसतात. चुकीचं वागणं, खोटं बोलणं, सावरासावर करणं, आपल्या चुकांना इतरांना कारणीभूत धरणं हा अशा लोकांचा जणू गुणधर्मच असतो.
अशा प्रकारचे लोक किंवा अशी मनोवृत्ती असलेले लोक स्वतःच्या चुका तर कधीच मोठ्या मनाने किंवा हिमतीने कबूल करत नाहीत, कधी कोणाची माफी मागत नाहीत किंवा कधी कमीपणा अथवा माघार घेत नाहीत. आपलंच खरं करण्याची वृत्ती, इतरांना वेठीला धरण्याची मानसिकता, हट्टी आणि हेकेखोर पणामुळे अशी लोकं स्वतः चं नुकसान तर करून घेतातच पण त्यांच्या जवळचे, घरातले, सहवासातले लोकपण त्यात विनाकारण भरडले जातात, हे दयनीय आहे. सातत्याने जाणूनबुजून चुकीच्या गोष्टी करत राहणारे, चुकीच्या मार्गावर चालणारे, सर्व तत्त्व आणि नीतीमूल्यांना फाट्यावर मारणे, नीतिमत्ता सोडून वागणारे आणि इतरांना, इतरांच्या सल्ले, सूचना, मार्गदर्शन याला कवडीचीही किंमत न देणारे असे लोक फक्त चुका करून, चुकीचे निर्णय घेऊन, त्याचे परिणाम भोगून शांत बसत नाहीत, तर उलट त्यांच्याशी संबंधित लोकांना बदनाम करून सोडतात. स्वतःच्या व्यक्तिगत, वैयक्तिक आयुष्यात तर ते वाटेल तसे भरकटतात. पण इतरांनाही मनस्ताप देतात. इतरांनापण चुकीच्या गोष्टी स्वीकारायला भाग पाडतात.
मी कसा बरोबर होतो किंवा आहे आणि इतरांमुळे म्हणजेच कुटुंबातील लोक, नातेवाईक, समाज, हाताखालील अथवा सहकर्मचारी, नातेवाईक, मित्र-मैत्रिणी यांच्यामुळे मला कसा त्रास झाला, त्यांच्यामुळे मी कसा चांगला असून पण बरबाद झालो, लोकांनी कसा माझा गैरफायदा घेतला, ते कसे वाईट होते, त्यांनी कसं मला सांभाळून, समजावून घेतलं नाही, इतरांनी कशी मला साथ सोबत दिली नाही, इतरांनी कसा सतत माझ्यावर अन्याय-अत्याचार केला हे सांगून, इतरांची बदनामी करून, दुसऱ्यांना कायम वाईट खलनायक ठरवून स्वतःच्या चुका झाकण्याचा सतत प्रयत्न करत असतात.
आपल्या चुकीवर पांघरून घालण्यासाठी घरातील, नात्यातील, संबंधित, संपर्कातील लोकांची निंदा करणे, त्यांच्याबद्दल वेगवेगळ्या खोट्या अफवा पसरवणे, त्यांच्या चारित्र्यावर ताशेरे ओढणे, चारचौघांत सतत इतरांबद्दल खोटी माहिती पसरवणे अशा लोकांना अंगवळणी पडलेले असते. मी वैयक्तिक चुकलो हे स्वीकारणे, मान्य करणे, त्यावर सगळ्यांना विश्वासात घेणे, झालेल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करणे, त्यातून मार्ग काढणे, त्यासाठी दोन पावले मागे येणे, दुसऱ्याला मोठेपण देणे, त्यांच्या स्वभावात नसते. आपलं म्हणणं खरं करण्यासाठी, मनमानी करण्यासाठी सतत दुसऱ्यावर चिखलफेक करत राहणे, दुसऱ्याला नाव ठेवत राहणे, कुरघोड्या करत राहणे, सतत बदल्याची भावना मनात बाळगणे अशी विकृत मानसिकता या लोकांची असते. आपल्या आयुष्यात जे काही वाईट आहे, चुकीचं आहे, आपल्या मनाविरुद्ध अथवा इच्छेविरुद्ध घडलेलं आहे ते आपणच निर्माण केलेलं आहे, याची जबाबदारी घेऊन त्यात सकारात्मक बदल करण्याऐवजी माझ्या या अवस्थेला बाकीचे कसे जबाबदार आहेत, हे पटवून देण्यात अशा लोकांचा हातखंडा असतो.
आपलं जे चांगलं आहे, जे आपल्याला मिळालेलं आहे त्याचं श्रेय मात्र आपलं आहे, चांगलं जे घडलं ते आपलं कर्तृत्व आहे, पण जे काही वाईट घडलं आहे त्याला इतर लोक कसे जबाबदार आहेत हे पसरवण्यात असे लोक अग्रेसर असतात. आपल्या चुका, चुकीचं वागणं, चुकीचे निर्णय इतरांना लक्षात येऊ नयेत, आपल्याबद्दल सत्य कोणाला समजू नये, आपल्या चुकीच्या खोट्या गोष्टी कोणाच्या लक्षात येऊ नयेत, आपलं दूषित व्यक्तिमत्त्व कोणाला समजू नये म्हणून इतरांची दिशाभूल आणि बुद्धिभेद करण्यात अशी लोकं पारंगत असतात. आपण केलेल्या चुका किंवा आपल्यामुळे इतरांना झालेले नुकसान, त्रास, वेदना, यातना याबद्दल हे लोक कधीच बोलत नाहीत. पण कोणालाच आपली चुकीची बाजू समजू नये, आपल्यातील दोष, कमतरता, अपयश कोणाच्या लक्षात येऊ नये म्हणून बाकीच्यांना दोष देणे, इतरांवर खापर फोडणं, दुसऱ्याला कोसत राहणं, दुसऱ्याबद्दल अपप्रचार करणं यांसारख्या क्लृप्त्या हे लोक लढवतात.
वारंवार त्याच चुका करूनसुद्धा दरवेळी कोणाच्या तरी डोक्यावर त्याचं खापर फोडून, नवीन काल्पनिक कथानक तयार करून, आपल्याला कसं कोणी फसवलं, धोका दिला, गैरफायदा घेतला, आपण कसं मजबूर होतो, हतबल होतो याच्या काल्पनिक कहाण्या सांगून हे लोक वेळ मारून नेण्यात पटाईत होत जातात. अशा लोकांच्या आजूबाजूला, घरात, जवळ असणारे सगळेच तितके चाणाक्ष किंवा हुशार नसतात की, त्यांना अशा वृत्तीचे लोक ओळखू येतील, त्यांचे हेतू लक्षात येतील किंवा ते स्वतःला अशा लोकांपासून सावध करू शकतील. खूप लोकांना आपल्या आजूबाजूला एक तरी अशी त्रासदायक व्यक्ती आहे, जिच्यामुळे आपणपण गोत्यात येऊ शकतो, फसू शकतो किंवा बदनाम होऊ शकतो याची कल्पना सुद्धा नसते. त्यामुळे आपल्याला भेटलेली, जवळची, आपल्याच घरातील, संपर्कातील माणसं जर असं सतत चुकीचं वागत असतील आणि स्वतःचा बचाव करण्यासाठी कायम दुसऱ्याला वाईट ठरवत असतील, दुसऱ्यावर आरोप करत असतील, इतरांच्या नावाने खडे फोडत असतील तर प्रत्येकाने वेळीच सावध होणे अत्यंत आवश्यक आहे.
स्वतःच्या चुकीच्या कृत्यातून इतरांचं नुकसान करून पण जर अशा लोकांना त्या कृत्याची कबुली देता येत नसेल, आपली चूक स्वीकारता येत नसेल, तर अशा व्यक्ती खूप घातक ठरू शकतात. स्वतःला वाचवण्यासाठी, स्वतःचे दोष झाकण्यासाठी हे कोणत्याही हद्दीला जावून कोणाचाही बळी देऊ शकतात, कोणत्याही थराला जाऊन कोणालाही बदनाम करू शकतात. समाजात, कुटुंबात वावरताना स्वतःला सतत जागृत ठेवणे, स्वतःची निरीक्षण शक्ती, आकलन शक्ती वाढवणे, प्रत्येकाच्या बोलण्यातले खरे अर्थ समजून घेणे, वागणे आणि बोलणे यातील फरक लक्षात घेणे अत्यंत
आवश्यक आहे.
[email protected]