मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँकेला(reserve bank of india) मंगळवारी धमकीचा मेल मिळाला. यात आरबीआय गर्व्हनर शक्तिकांत दास आणि केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारमण यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
मेलमध्ये म्हटले आहे की मुंबईत आरबीआय कार्यालये, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकसहित ११ ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आले आहे. ईमेलच्या माध्यमातून आरबीआय गर्व्हनर शक्तिकांत दास आणि कॅबिनेट मंत्री निर्मला सीतारमण यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे.
काय लिहिलेय धमकीच्या ईमेलमध्ये?
या धमकीच्या ईमेलमध्ये मुंबईत ११ ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची माहिती आहे. ईमेलमध्ये म्हटले गेले की हे स्फोट मंगळवारी दुपारी दीड वाजता होणार होते. यानंतर एकच कल्लोळ झाला. पोलिसांनी सगळीकडे तपास केला मात्र काहीच संशयास्पद आढळले नाही. या संबंधामध्ये मुंबईच्या एमआरए मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत तपास सुरू केला आहे.