काँग्रेस आणि भाजपा यांच्यातील राजकीय युद्धाचा बिंदू आता कुस्तीगीर संघाची निवडणूक ठरला आहे. या कुस्तीगीर महासंघाची निवडणूक नुकतीच पार पडली. ज्यांच्याविरोधात आंदोलन सुरू आहे, त्यांचेच निकटवर्ती संजय सिंग निवडून आले. त्यामुळे ऑलिम्पिक स्पर्धेतील एकमेव पदक विजेती कुस्तीगीर साक्षी मलिक यांनी कुस्ती सोडत असल्याचे जाहीर केले. तसेच त्यांनी ब्रिजभूषण यांच्यावर पुन्हा एकदा महिला कुस्तीगीरांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला. ब्रिजभूषण हे भाजपाचे नेते आहेत आणि ते भाजपाचे खासदार आहेत. आरोप झाले म्हणून सारी सोशलमाध्यमी पिलावळ त्यांच्यावर आरोप करण्यास मोकळी झाली. ब्रिजभूषण यांना मलिक यांच्या बाजूने आणि ब्रिजभूषण यांचे काहीही म्हणणे ऐकून न घेता त्यांना आरोपी ठरवून मोकळीही झाली आहे. अर्थात हे आरोप मलिक यांनी केले आहेत, त्यासाठी कोणतेही ठोस पुरावे दिलेले नाहीत. मलिक या महान कुस्तीगीर असतील. पण त्यांनी एका पक्षाच्या म्हणजे काँग्रेसच्या नादी लागून भाजपाच्या नेत्यावर आरोप करत सुटणे आणि त्यासाठी कुस्ती सोडत असल्याची नौटंकी करणे हे मलिक यांना इतका महान खेळाडू म्हणून शोभणारे नाही. दुसऱ्या एक कुस्तीपटू बबिता फोगट यांनी तर साक्षी मलिक या काँग्रेस नेत्यांच्या तालावर नाचत भाजपावर आरोप करत आहेत, असा थेट आरोप केला आहे.
संजय सिंग यानी तर मी ब्रिजभूषण यांचा निकटवर्तीय आहे म्हणून काही गुन्हा केला आहे का, असा सवाल विचारला आहे. पण साक्षी मलिक यांचा हा विषयच नाही. मुद्दा राजकारणाचा आहे. येथे काँग्रेसला याच मुद्द्यावरून भाजपाला घेरण्याचे राजकारण करायचे आहे. साक्षी मलिक यांनी ज्या महिला कुस्तीगीरांचे लैंगिक शोषण झाले असल्याचा आरोप केला आहे, त्या कुणीच का पुढे येत नाहीत, असा सवाल आहे. ही काँग्रेसी सवय आहे. पुरावे न देता बेछूट आरोप करत सुटायचे आणि मग न्यायालयाकडून चपराक खायची, ही काँग्रेसी सवय आहे. साक्षी मलिक ही काँग्रेसच्या गोटात असो किंवा नसो, त्यांनी या प्रकरणाचा एकदा सोक्षमोक्ष लावण्यासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला असता तर प्रकरण इतक्या थराला गेले नसते. साक्षी मलिक यांच्या पाठीशी कोणती राजकीय ताकद आहे, ते समोर आले आहे. कारण या साक्षी मलिक यांनी किंवा त्यांचे साथीदार बजरंग पुनिया वगैरेंनी काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांची भेट घेतली आहे. त्यावरून या प्रकरणाच्या मुळाशी कोणत्या प्रकारचे राजकीय मतभेद आहेत, ते दिसतेच.
साक्षी मलिक प्रकरणात काँग्रेसला इतका रस का आणि त्याचे कारण केवळ कुस्तीतील कथित लैंगिक छळाचे आरोप दूर करण्यासाठी आणि कुस्ती क्षेत्र स्वच्छ करण्यासाठी आहे की आपले राजकीय वैमनस्य काढण्यासाठी, या व्यासपीठाचा उपयोग करून घेणे आहे, हे सहज समजते. तीन राज्यांतील निवडणुकांत काँग्रेसचा जो दारूण पराभव झाला, त्यानंतर भाजपा आणि काँग्रेस यांच्यात कमालीचे वैर वाढले आहे. त्यामुळे सरकारविरोधात जो कुणी असेल, त्याला मदत करणे किंवा आंदोलनाला हवा देणे, काँग्रेसचे कर्तव्य झाले आहे. साक्षी मलिक प्रकरणात खरे-खोटे काहीही न पाहता भाजपावर आरोप केले जात आहेत. सोशलमाध्यमी पिलावळ त्यात आपले अकलेचे तारे तोडत आहे.
ब्रिजभूषण यांच्याविरोधात माध्यमांतून ट्रायल सुरू केले असून त्यात भलेभले पत्रकार आपल्या अकलेची भर पाडत आहेत. प्रत्येकाला जणू साक्षी मलिकच्या आसवांचा कळवळा आला आहे. तिच्या आसवांचे मोल वाया जाऊ देणार नाही, अशा राणा भीमदेवी छापाच्या गर्जना केल्या जात आहेत. पण या राजकारणाच्या कर्दमात कुस्तीगीर महासंघ नव्हे; तर सारे क्रीडा क्षेत्रच गुरफटलेले दिसते. अनेक महिला खेळाडूंनी साक्षीची पाठराखण केली आहे, तर एकमेव पी. टी. उषा अशा निघाल्या की, त्यांनी या प्रकरणाने भारत क्रीडाक्षेत्रात बदनाम होत असल्याचा इशारा दिला आहे. काँग्रेस आणि भाजपा यांच्यातील हे राजकारण आहे आणि त्याचा बळी साक्षी मलिक यांच्यासारख्या कुस्तीपटू ठरत आहेत. साक्षीच्या खांद्यावर बंदूक ठेवून या प्रकरणाच्या निमित्ताने काँग्रेसी नेते भाजपाविरोधात गरळ ओकण्याचे आपले राजकीय डाव साधत आहेत.
राहुल गांधी हे नेहमीच पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात बेछूट आरोप करत असतात. त्यांना पुरावे वगैरे काही लागत नाहीत. तेच साक्षी मलिकने केले आहे. तिने कसलेही पुरावे न देता महिला खेळाडूंचे लैंगिक शोषण झाल्याचे आरोप केले आहेत. कुस्तीगीर संघाने दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन सुरू केले आहे. कोणत्याही भाजपाविरोधी आंदोलनात काँग्रेसचा अदृष्य हात कसा असतो, याचे आश्चर्य आता वाटत नाही. कारण निवडणुकीच्या माध्यमातून तर भाजपा आणि मोदी यांना हरवणे अशक्य आहे. याची कधीचीच खात्री काँग्रेसला पटली आहे. त्यामुळे कधी शेतकऱ्यांचे आंदोलन असो की, कधी साक्षी मलिक प्रेरित कुस्तीगीरांचे आंदोलन असो, अशा आंदोलनांना हवा देणे हेच काँग्रेसचे काम होऊन बसले आहे.
लैंगिक शोषण मग ते कुणीही केलेले असो, ते वाईटच आहे. त्याचे समर्थन करता येणार नाही. ते कुणी करूही नये. पण साक्षी मलिकसारख्या नामवंत खेळाडू आरोप करतात तेव्हा त्यामागील हेतू आणि त्यांच्यामागील बोलवते धनी कोण आहेत, हे अगोदर तपासणे क्रमप्राप्त ठरते. साक्षी मलिक प्रकरणात भाजपाने ब्रिजभूषण यांच्यावर कारवाई केली नाही, असे मलिकचे म्हणणे आहे. म्हणजे कुणीही ऊठसूट आरोप करेल आणि कारवाई हवी म्हणून आंदोलन करेल, याला काही अर्थ नाही. त्यात मोदी यांच्याविरोधात आरोप केले की, लगेच त्या इसमाला मग तो कितीही क्षुद्र असो, त्याला डोक्यावर घेऊन नाचायचे हे माध्यमांचे सध्या कर्तव्य ठरले आहे. याही प्रकरणात त्याचे प्रत्यंतर आले आहे. जर खरोखर लैंगिक शोषण झाले असेल, तर मग ती निषेधार्ह बाब आहे. पण त्यासाठी काही ठोस पुरावा तर हवा. केवळ कुणीतरी व्यक्ती आपली राजकीय भडास काढण्यासाठी आरोप करत असेल तर त्यावर विश्वास ठेवता येणार नाही.