पेण : पेण तालुक्यातील उंबर्डे गावचे सरपंच महेश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्काराने अहमदनगर येथे सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातील सर्व सरपंचाच्या न्याय हक्कासाठी कार्यरत असलेली राज्यातील नोंदणीकृत संघटना स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश यांनी राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी महेश पाटील सरपंच ग्रुप ग्रामपंचायत उंबर्डे, पेण, रायगड यांना माऊली संकुल सभागृह अहमदनगर येथे सन्मानित करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर बाबासाहेब पावसे, रोहीत संजय पवार, सुजाता कासार, रविंद्र पावसे, लक्ष्मण पाटील गुरुजी, रामभाऊ ठाकुर, मनोज पाटील, विजय भोईर, मुकेश पाटील, विश्वनाथ माळी, कल्पेश मोकल, निलेश पाटील, विनायक पाटील, मनोज पाटील, वसंत म्हाञे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बाबासाहेब पावसे यांनी सांगितले की, सर्व सरपंच यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे. ग्रामीण भागाच्या विकासाचा ध्यास घेऊन आपण गावचा विकास करण्यासाठी प्रशासन तसेच ग्रामस्थांच्या मदतीने आपल्या गावात ग्रामपंचायतच्या माध्यमातून विविध योजनांच्या सहाय्याने सर्वसामान्य जनतेसाठी विविध विकास कामे करून तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात नाव लौकिक मिळविला आहे. आपल्या या कार्याचा गौरव व्हावा म्हणून स्वराज्य सरपंच सेवा संघाच्या वतीने आपणास आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आपण आपल्या पुढील काळातही असे सामाजिक व गाव हिताची कामे करण्यासाठी ईश्वर शक्ती देवो. पुढील भावी कार्यास सरपंच सेवा संघाच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.