Saturday, October 5, 2024
Homeताज्या घडामोडीNagpur News : नागपुरात नाताळच्या आनंदावर विरजण; फुगे फुगवण्याच्या सिलेंडरच्या स्फोटामुळे चिमुकल्याचा...

Nagpur News : नागपुरात नाताळच्या आनंदावर विरजण; फुगे फुगवण्याच्या सिलेंडरच्या स्फोटामुळे चिमुकल्याचा मृत्यू

दोन महिला जखमी

नागपूर : एकीकडे राज्यभरात नाताळचा सण (Christmas) उत्साहाने साजरा केला जात आहे. तर दुसरीकडे नागपुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. काल रात्री साडेआठच्या सुमारास नागपुरात फुगे फुगवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सिलेंडरचा स्फोट (Balloon Cylinder Explosion) झाला. या स्फोटात चार वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला, तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या. नागपुरातील जुन्या व्हीसीए ग्राऊंड परिसरात ही घटना घडली. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सिजान आसिफ शेख असं मृत मुलाचं नाव असून तो चार वर्षांचा होता. तर फरिया हबीब शेख (वय २८ वर्षे), अनमता हबीब शेख (वय २४ वर्षे) अशी या स्फोटात जखमी झालेल्या महिलांची नावं आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ख्रिसमस असल्याने व्हीसीए परिसरातील चर्चसमोर खरेदीसाठी अनेक दुकानं लावण्यात येतात. तिथे गॅस फुगे विकणारा एक व्यक्ती होता. या ठिकाणी बरीच वर्दळ होती. ख्रिसमसच्या सुट्ट्या असल्याने सिजानही व्हीसीए मैदानावर आपल्या मावशीसह आला होता. फुगेवाला दिसताच सिजानने मावशीकडे फुगे घेण्याचा आग्रह केला. त्यानंतर तो फुगे घेण्यासाठी फुगेवाल्याकडे गेला. फुगा फुगवत असताना अचानक सिलेंडरचा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, सिलेंडर उंच हवेत उडला. आग लागल्याने सिजान गंभीर जखमी झाला. तर काही अंतरावर असलेली त्याची मावशीही गंभीर जखमी झाली.

दरम्यान, मोठा आवाज झाल्याने आजूबाजूला असलेली लोकं देखील घाबरली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी सिजान आणि जखमींना मेयो रुग्णालयात दाखल केलं. सिजानला तपासून डॉक्टरांनी त्याला म़ृत घोषित केलं. तर सध्या दोन जखमी महिलांवर उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी सांगितले की, फुगेवाला हा सातत्याने नागपूर शहरात फुगे विकत होता. पण त्याचे नाव अजून समोर आले नाही. तो रविवारी जुन्या व्हीसीएग्राऊंड परिसरात या भागात फुगे विकण्यासाठी येत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तो विविध भागामध्ये फुगे विकत असे. या स्फोटामध्ये फुगेवाला जखमी झालेला नाही. घटनेनंतर त्याने घटनास्थळावरून पळ काढला. आम्ही फुगे विक्रेत्याचा शोध घेत आहोत. पण अद्याप स्फोटाचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -