Tuesday, April 22, 2025
Homeताज्या घडामोडीकॅन्सरग्रस्त वृद्धांसाठी टाटा हॉस्पिटलचा विशेष विभाग

कॅन्सरग्रस्त वृद्धांसाठी टाटा हॉस्पिटलचा विशेष विभाग

मुंबई : देशभरातील कॅन्सरग्रस्त रुग्णांचा आधारस्तंभ असलेल्या टाटा कॅन्सर रुग्णालयाने ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळ्या जेरिऍट्रिक ओपीडीची निर्मिती केली आहे. यामुळे वयाची साठी ओलांडलेल्या कॅन्सरबाधित रुग्णांवर योग्यवेळी व योग्य पद्धतीने उपचार होण्यास मदत होणार आहे.

कॅन्सर कोणत्या प्रकारचा आहे, तो कोणत्या टप्प्यात आहे, त्याची लक्षणे कोणती आहेत, हे समजून वैद्यकीय उपचार करणे गरजेचे आहे. त्यासाठी टाटा कॅन्सर रुग्णालयाने आजार व्यवस्थापन विभाग (जेरिऍट्रिक ओपीडी) सुरू केला आहे. वयोवृद्ध रुग्णांवर वैद्यकीय उपचार करण्यासाठी असलेल्या या विभागात विशेष प्रशिक्षित डॉक्टरांसह परिचारिकांची टीम आहे.

कॅन्सरवरील उपचारपद्धतीमध्ये देण्यात येणाऱ्या केमोथेरपीसह इतर वैद्यकीय उपचारांची तीव्रता लक्षात घेऊन वैद्यकीय उपचार दिले जातात. इथे फार्माकॉलॉजिस्ट, फिजिओथेरपिस्ट, मानसोपचारतज्ज्ञ, सोशल वर्कर, आहारतज्ज्ञ यांचाही समावेश आहे.

‘यापूर्वी येणाऱ्या प्रत्येक कॅन्सर रुग्णांना उपचार देताना समान पद्धतीचा वापर करण्यात यायचा. लहान मुलांच्या वैद्यकीय गरजा वेगळ्या असतात. त्यामुळे वयोगट आणि आजाराचे स्वरूप लक्षात घेऊन उपचारांना प्रतिसाद देण्याची पद्धत वेगळी असते. ही बाब लक्षात घेता सरसकट ज्येष्ठ नागरिकांना जनरल ओपीडीमध्ये इतर रुग्णांसोबत उपचार का द्यायचे, असा विचार पुढे आला. कॅन्सर झालेल्या वयोवृद्धांना अनेकदा उपचारांची काय गरज आहे, असा सूरही आळवला जातो. त्यांच्यावर कोणते वैद्यकीय उपचार करायचे, हा निर्णय अनेकदा त्यांच्या मुलांकडून वा त्यांच्या नातेवाईकांकडून घेतला जातो. या वयोगटातील रुग्णांच्या मनामध्येही आता जगून काय करायचे, अशी भावना असते.

भावनिक, आर्थिक टप्प्यातील सर्व अडथळे पार करून कॅन्सरग्रस्त वयोवृद्धांना उत्तम वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी टाटामध्ये सुरू करण्यात आलेले ज्येष्ठांसाठीचे मदत केंद्र उपयुक्त ठरले’, असा विश्वास टाटा कॅन्सर रुग्णालयाचे संचालक (वैद्यकीय शिक्षण) डॉ. श्रीपाद बाणावली यांनी माहिती देताना व्यक्त केला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -