Monday, July 15, 2024
Homeताज्या घडामोडीबारामतीत हुंड्यासाठी विवाहितेला शेततळ्यात बुडवून मारले

बारामतीत हुंड्यासाठी विवाहितेला शेततळ्यात बुडवून मारले

बारामती : भारतात हुंडा घेणे आणि देणे दोन्हीही कायद्याने गुन्हा आहे. असे असले तरी भारताच्या अनेक भागामध्ये हुंडा परंपरा आजही सुरु आहे. यामुळे अनेक तरुणींनी आपले आयुष्य गमावले आहे. कायद्याने जरी यासाठी कठोर नियम असले तरीही यावर पूर्णपणे आळा घालण्यात आलेला नाही. आता तर महिला खासदार सुप्रिया सुळे यांच्याच मतदार संघातील बारामती तालुक्यात एका विवाहितेला हुंड्यासाठी दोन्ही हात बांधून शेततळ्यात बुडवून मारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेवरुन सगळीकडे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

बारामती तालुक्यातील मासाळवाडी येथील चौघाविरुद्ध पोलिसांनी खुनाचा व हुंडा प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल केला असून पती, सासू, नणंद व नंणदेचा पती या चौघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दौंड तालुक्यातील गिरिम येथील नामदेव बबन करगळ यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली. यात सुरेखा भाऊसाहेब गडदरे असे या दुर्दैवी मयत महिलेचे नाव आहे. लग्नात अपेक्षेप्रमाणे हुंडा मिळाला नसल्याने सासरचे लोक सुरेखाचा शारीरिक आणि मानसिक छळ करत होते, असा आरोप तिच्या माहेरच्यांनी केला आहे. बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलिसांनी याप्रकरणी पती भाऊसाहेब महादेव गडदरे, सासु ठकुबाई महादेव गडदरे नणंद आशा कोकरे व तिचा पती सोनबा कोकरे या चौघां विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

२४ डिसेंबर रोजी मासाळवाडीच्या भगवान गडदरे यांच्या शेतातील शेततळ्यात त्यांची विवाहित मुलगी सुरेखा हिचा मृतदेह आढळून आला. वरील चौघा आरोपींनी तिच्या घराशेजारी असलेल्या शेततळ्यामध्ये सुरेखा हिचे दोन्ही हात बांधून तिला शेततळ्यात बुडवून मारले अशी फिर्याद तिचे वडील करगळ यांनी पोलिसांकडे दिली आहे. त्यावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, इतक्या क्रूरपणे हुंड्यासाठी सुनेला मारणाऱ्या निर्दयी आरोपींना कडक शिक्षा करावी, अशी मृत मुलीच्या कुटुंबाने मागणी केली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -