Monday, January 12, 2026

Chhagan Bhujbal : जालना जिल्ह्यात दोनशे पिस्तुलांची आयात

Chhagan Bhujbal : जालना जिल्ह्यात दोनशे पिस्तुलांची आयात

मंत्री छगन भुजबळ यांचा दावा, नाव न घेता जरांगेंवर केली टीका

नाशिक : जालना (Jalna) जिल्ह्यात दोनशे पिस्तूलांची आयात झाली आहे, असा दावा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचे नाव न घेता केली. थोडं शिक्षण कमी असलं तरी चालतं पण माणसाने सुसंस्कृत असावे अशी टीकाही भुजबळ यांनी केली. भरवस फाटा येथे मराठा समाजाच्या काळ्या झेंड्यांना सामोरे गेल्यानंतर येवला स्थित संपर्क कार्यालयात भुजबळ बोलत होते.

मंत्री छगन भुजबळ आज त्यांच्या येवला मतदार संघाच्या दौऱ्यावर आले असता मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना भरवस फाट्याजवळ काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध केला. त्यानंतर भुजबळ त्यांच्या येवला संपर्क कार्यालयावर आल्यानंतर त्यांनी माध्यमाशी संवाद साधून जरांगे पाटील यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.

जशी संस्कृती तशी टीका केली जाते. ज्याचे शिक्षण, संस्कृती जशी असेल तसेच ते खालच्या पातळीवर टीका करतात. टीका करायला चांगले शब्द सापडतात ना? चांगल्या शब्दाचा अभ्यास नसेल तर ते तसेच बोलतील. माणसाने सुसंस्कृत असलं पाहिजे. थोडं शिक्षण कमी असले तरी चालतं. कोणाला कसा मान सन्मान द्यावा, यासाठी सुसंस्कृत असणं गरजेचं आहे, असं भुजबळ म्हणाले.

दोनशे बेकायदा पिस्तुलांची आयात जालना जिल्ह्यात झाली आहे, असा दावाही छगन भुजबळ यांनी केला. काही वाळूवाले, काही माफिया आजूबाजूला असतील तर ते तसेच शिकणार अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिली. ओबीसीतच घेईल हा अट्टाहास का ? सरकार जर हा अट्टाहास पूर्ण करायला लागता तर ओबीसीसुद्धा नाराज होतील. मराठा समाज मतदान करणार नाही म्हणत असेल तर, तसे ओबीसीवर अन्याय होईल, मग तेही मतदान करणार नाही, असा इशारा छगन भुजबळ यांनी दिला. सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे. पण ओबीसीला धक्का न लावता दिले पाहिजे. हीच आमची मागणी आहे. पहिल्यापासून आमचे तेच म्हणणे आहे, असंही छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >