हलकं-फुलकं: राजश्री वटे
कोणाला आधी माहीत होते कां की, या दोघी… सुलोचना!! इतकं नेत्रदीपक यश गाठणार आहेत… एकीचा भारदस्त आवाज, तर दुसरीचं भारदस्त शालीन सौंदर्य! एक गायिका सुलोचना चव्हाण… दुसरी नायिका सुलोचना लाटकर!
देव जरी मज कधी भेटला (सुलोचना दीदींचे गाणे), तर त्याला हेच विचारणार आहे मी की, या दोन सारख्या नावाच्या दोघीजणींना तू कलेचं भरभरून वरदान दिलंस, दोघी कलाकाराचं आयुष्य भरपूर व भरभरून जगल्या. दोघींनी मराठी सिनेसृष्टीवर राज्य केलं. मराठी रसिकांना मिळालेला सुरमयी सौंदर्याचा खजिनाच गवसला होता जणू!! एकीने चाहत्यांना लावणीतलं अर्थपूर्ण सौंदर्याची ओळख आवाजातल्या नजाकतीमधून करून दिली… तर दुसरीने शालीन, खानदानी, सात्त्विक, सोज्वळ सौंदर्याची ओळख आपल्या अभिनयातून सिनेरसिकांपर्यंत पोहोचवली!
किती साम्य ते दोघींमध्ये… केसांचं वळणसुद्धा सारखं नागमोडी… दोन्ही खांद्यावर पदराची शान… नावापासून दिसण्यापर्यंत एक खानदानी प्रवाह जणू!! आयुष्याची देणगी म्हणजे दोघींनाही सहस्रचंद्र दर्शन घडावे, हेही भाग्य नसे थोडके आणि आश्चर्य म्हणजे दोघींनाही ‘पद्मश्री’ देऊन गौरवण्यात यावे… अहाहा…! हा आपल्या मराठी माणसाचा अभिमान!
मराठी अनेक हळुवार गाणी सुलोचना दीदींवर चित्रित झाली आहेत. पण… ‘नन्ही कली सोने चली, हवा धिरे आना…’ किती गोंडस गाणं! केशरी रंगाचं बाळसेदार गोड फळांच्या राजाचे आगमन होते तेव्हा ‘आला गं… बाई आला गं…’ हे सुलोचनाबाईंचं गाणं ‘आंबा जिभेवर आणि गाणं ओठावर’ अशी स्थिती होते. ‘पाडाला पिकलाय आंबा… निट बघ…’ असा खणखणीत आवाज होणे नाही… तसेच असे सात्त्विक सौंदर्य दिसणे नाही!
हे जुळं कलेचं सौंदर्य लोप पावलं… सहा महिन्यांच्या अंतराने… पण मराठी माणसाच्या तनामनात ते जिवंत राहाणार आहे… तुटली गं स्वप्नमाळ… या आजीवन मराठी रसिकांवर राज्य करणाऱ्या या सम्राज्ञीना मानाचा मुजरा…
एक सुलोचना बाई (चव्हाण)🎼🎼, दुसरी सुलोचना दीदी (लाटकर).🎬..