ओंजळ: पल्लवी अष्टेकर
अशोक साखळकर काका माझ्या परिचयातले, वय सुमारे ऐंशी वर्षे. सर्वांशी हसत-खेळत वागून, मनमोकळ्या गप्पा करणारे. त्यांचे दिवसभराचे रुटिन ठरलेले असल्यामुळे कंटाळा त्यांच्यापाशी नाही. एकदा साखळकर काकांनी मला त्यांच्या घरी येण्याचे निमंत्रण दिले. मी त्यांच्या घरी गेले, तेव्हा गप्पा करताना मला त्यांच्या टेबलवर अनेक दिवाळी अंक पाहायला मिळाले. त्यात ‘मनोरंजनाचा दिवाळी अंक’ – १९०९, ‘सत्यकथा’ १९२४ व ‘मौज दिवाळी अंक’-१९२४ असे इतके जुने दिवाळी अंक दिसले. ते पाहून मला खूप आश्चर्य वाटले. कारण एवढे दुर्मीळ अंक या काळात सहजासहजी पाहायला मिळत नाहीत. मी साखळकर काकांपाशी याबद्दल चौकशी केली. तेव्हा काका म्हणाले, “हे जुने अंक माझ्या वडिलांनी त्या काळी खरेदी केले होते. ते मी अजून जपून ठेवले आहेत.” खरोखरच इतके जुने अंक कुठे वाचायला मिळणार म्हणून मी काकांची परवानगी घेऊन ते “आठ दिवसांत परत करते” असे सांगून वाचायला घरी घेऊन आले.
‘मनोरंजनाचा दिवाळी अंक’- १९०९ उलगडला आणि मी १९०९ काळात गेल्याचं भासलं. त्या काळातील गोष्टी, लेख, घटना, कविता, समाजसुधारक यांचे साहित्यपुष्पं पाहून मन थक्क झाले. दिवाळी अंकाच्या खिडकीतून रंगभूषा, वेशभूषा मी पाहू लागले. महाराष्ट्रातील त्या काळातील राजकीय, सामाजिक परिस्थिती, लेख, कविता यांनी भरभरून दिलेला हा अंक आहे. या अंकात महाराष्ट्रातील कर्ते पुरुष, प्रसिद्ध डाॅक्टर, प्रसिद्ध वकील, वृत्तपत्रकार, ग्रंथप्रकाशक, संस्थानिक व त्या काळातले राजे, प्रमुख संस्थाचे पदाधिकारी, नाट्यकलेतील प्रसिद्ध व्यक्ती, ग्रंथप्रकाशक या व्यक्ती झळकलेल्या आहेत. काशीनाथ रघुनाथ मित्र हे मनोरंजनचे संपादक व प्रकाशक. संपादकीय पानावर “सत्य संकल्पाचा दाता भगवान। सर्व करी पूर्ण मनोरथ॥” असे सुरुवातीला लिहिले आहे. ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी, तीच जगा उद्धारी’. ‘आमच्या भावी महाराष्ट्र मातांची मानसिक उन्नती करणे हे मनोरंजनाचे ध्येय आहे.’ या अंकाची किंमत एक रुपया आहे. तेव्हाचे वातावरण, स्त्रियांची परिस्थिती याची कल्पना येते.
अंकात त्या काळाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जाहिराती आहेत. त्यातील काही जाहिरातींचा येथे उल्लेख केल्याशिवाय राहवत नाही. ‘केश सुंदर दिसण्यास ते रेशमासारखे मऊ, चमकणारे, नरम व पुष्कळ पाहिजेत. कामिनीया तेलाचा त्यासाठी उपयोग करा.’ खरं तरं १९०९ पासून केसांचा हा विषय न सुटलेला, अजून केस गळण्याची समस्या न सुटलेलीच. यावर रामबाण उपाय अजून सापडलेला नाही, या विषयाला हात न घातलेलाच बरा. ‘डोके फार दुखत असेल, तर ट्रेझोच्या दोन वड्यांची पूड पाण्याबरोबर खावी. लगेच गुण येतो.’ तसेच काही इतर जाहिराती ही आकर्षक वाटतात. जसे – ‘सुरंगी’ अत्तर. अति उंची. सुगंध दूरवर पसरतो. ‘खरे गारेचे चष्मे. किंमत स्वस्त. हे वापरून दृष्टीचे संरक्षण करा.’ आता गारेचे चष्मे म्हणजे नेमके काय या विचारात मी पडले! त्या काळातील कवितांची अभिरूचीसुद्धा अप्रतिम वाटते. ‘करंज्यातला मोदक’ ही कविता सौ. लक्ष्मीबाई टिळक यांची. ती वाचनात आली.
“कां वदे करंजी मोदक कोठे गेला।
कां पापड करिती लाटीविण रूदनाला।
कां पोळ्या म्हणती करा बघू कानवला।
मज नको वाटते कुणास सांगायाला॥
यातून त्या काळातील स्त्रीची संसाराची हौस समजून येते. ज्या उत्स्फूर्ततेने कवींना या कविता सुचायच्या त्यांचे कौतुक वाटते. आधुनिक काळातील कवींचा आशयही सुंदर, अर्थपूर्ण असतो. त्यामुळे ‘कलाकारांतील कला’ न संपणारी आहे याची अनुभूती येते.
बालकवी (श्री त्र्यंबक बाळकृष्ण ठोमरे) यांची ‘आनंदी आनंद गडे’ ही कविता मनावर फुंकर घालते. त्यातील एका कडव्याचा उल्लेख केल्याशिवाय राहावत नाही.
‘स्वार्थाच्या बाजारांत,
किती पामरे रडतात,
त्यांना मोद कसा मिळतो,
सोडूनि स्वार्थ तो जातो.
द्वेष संपला, मत्सर गेला,
आता उरला,
इकडे-तिकडे चोहीकडे,
आनंदी आनंद गडे.’
त्या काळातील समाजसुधारक गोपाळ कृष्ण गोखले, विठ्ठल रामजी शिंदे, लालशंकर उमियाशंकर, धोंडो केशव कर्वे अशा वीसेक समाजसुधारकांचा त्यांच्या फोटोसह उल्लेख आहे. त्यामुळे त्यांच्या सामाजिक सुधारणा जाणून घेऊन हळूहळू सामाजिक परिवर्तन कसे घडत गेले, याची कल्पना येते.
नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येकानेच प्रयत्न करणे आवश्यक आहे व ते टिकवून ठेवण्यासाठी कष्टही घ्यावे लागतात. हे सहज, सुलभ भाषेत मनोरंजनने सांगितले आहे. ‘पत्नीने पतीला, पित्याने कन्येला, बंधूने भगिनीला अगत्याने मनोरंजन वाचावयास द्यावे.’ ‘खरे लोकशिक्षण’, ‘लवकर उठण्याची सवय’, ‘चित्रकला’, ‘भगवद्भक्त तुकाराम’ असे अनेक प्रबोधनात्मक लेख वाचायला छान वाटतात. अंकात प्लेगचा संदर्भ आढळतो, प्लेगमुळे त्या काळी मरण पावलेल्या तरुणांच्या पत्नींना कमी वयात वैधव्य आले. त्यामुळे विधवा विवाहाचा पुरस्कार ही गरज बनली. या अंकात एका वधूवर सुचक मंडळाची जाहिरात आहे. त्यात लिहिलेय की, ‘प्लेगच्या साथीमुळं माणसं प्रवास करायला घाबरतात. त्यामुळं सोयरिक शोधण्यासाठी फिरणं बंद झालयं.’
तत्कालीन परिस्थिती, स्वातंत्र्याची चळवळ, जाती प्रथा, स्वदेशी, सामाजिक व धार्मिक सुधारणा यावर अनेक लेख आहेत. उदा. ‘स्पार्टन लोकांतील स्त्री-शिक्षण’ हा लेख वेगळा वाटला. ग्रीस देशातील लहान-सहान संस्थानात फार प्राचीन काळी वेगवेगळ्या प्रकारच्या राजकीय व सामाजिक संस्था अस्तिवात आल्या होत्या. यात स्त्री-शिक्षणाचे नियमही होते. प्रजा निरोगी व सुदृढ होण्यास मुलांच्या आयाही सुदृढ पाहिजेत, हे मनात आणून स्पार्टन लोकांचा कायदेकार स्पार्टन लायकर्गस याने स्रियांच्या शारीरिक शिक्षणाची देखील सोय केली होती. दहा वर्षांपासून लहान मुलींना सरकारी शिक्षण मिळावे असा त्याने नियम केला. मुलांच्या वर्गाप्रमाणे मुलींचे वर्ग असत. त्यांना धावणे, उड्या मारणे, कुस्ती खेळणे इ. शारीरिक व्यायाम ठरावीक रीतीने करावे लागत.’ असे काही संदर्भ यात येत असत.
आधुनिक काळात अनेक बदल घडले. त्यामुळे अनेक सामाजिक बदल घडले. त्यानुसार दिवाळी अंकांचे स्वरूपही बदलले. स्त्री घरचा उंबरठा ओलांडून कुटुंबासाठी, मुला-बाळांसाठी, आर्थिक स्वातंत्र्यासाठी नोकरी करू लागली. संगणक, मोबाइल या नवीन तंत्रज्ञानाने नवीन जगतात प्रवेश केला. बाल-साहित्य, दिवाळी अंक यांच्या वाचनावर परिणाम झाला. तरीही अनेक शालेय ग्रंथालये, वाचनालये यांच्यासाठी साहित्य-निर्मिती होत आहे. बालक, तरुण पिढी, वृद्ध यांच्या मनोरंजनासाठी, ज्ञानार्जनासाठी नवीन साहित्याची निर्मिती होणं गरजेचं आहे.