Thursday, July 25, 2024

सायली…

  • कथा : रमेश तांबे

सायलीचे आज वर्गात अजिबात लक्ष नव्हते. ती मान खाली घालून उदास बसली होती. भूगोलाचा तास सुरू होता. बाई नाईल नदीचे समृद्ध खोरे मुलांना समजवून सांगत होत्या. सायलीच्या समोर पुस्तक होते पण मन मात्र थाऱ्यावर नव्हते. ही गोष्ट बाईंच्या नजरेतून सुटली नाही. त्यांनी साऱ्या वर्गाला नीट लक्ष द्या म्हणून सांगितले. पण सायलीच्या कानावर ही गोष्ट पडलीच नाही. ती तिच्याच तंद्रीत होती. बाईंनी ओळखले नेहमी उत्साही असणारी सायली आज उदास आहे. पण आता सर्व मुलांसमोर नको विचारायला म्हणून त्या काहीच बोलल्या नाहीत. पंधरा-वीस मिनिटांनी तास संपल्याची बेल वाजली आणि बाईंनी हाक मारली; सायली… तिने मान वर करून बाईंकडे पाहिले, तर तिचे लाल डोळे बाईंच्या काळजात धस्स करून गेले. त्या म्हणाल्या,”जरा टीचर रूममध्ये ये” सायली मुकाट्याने उठली आणि बाईंच्या मागे टिचर रूमच्या दिशेने चालू लागली.

साऱ्या वर्गात एकच कुजबूज… काय झाले! सायलीला काय झाले? शेजारच्या मीनलनेदेखील तिला खोदून खोदून विचारले पण सायलीने तिला काहीच पत्ता लागू दिला नव्हता. टीचर रूममधल्या कोपऱ्यातल्या दोन रिकाम्या खुर्च्यांवर पाटीलबाई आणि सायली समोरासमोर बसल्या. दुसरा तास सुरू झाल्याची बेल वाजली होती. त्यामुळे बाकीचे सर्व शिक्षक वर्गावर गेले होते. आता टीचर रूममध्ये फक्त दोघीच होत्या. एका बाजूला सायलीची अतीव काळजी असलेल्या पाटीलबाई अन् दुसऱ्या बाजूला विमनस्क अवस्थेत जगाचं भान नसलेली उदास सायली!

पाटीलबाई म्हणाल्या, “सायली वर बघ अन् सांग काय झालं? तिने तिची मान वर केली. तिच्या डोळ्यांत रडून रडून रक्त उतरले होते. चेहरा उदासीनतेने भरला होता. पण तिच्या तोंडातून शब्द फुटेना. पाटीलबाईंनी तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले आणि मोठ्या मायेने तिला आधार देत म्हणाल्या, “सांग सायली, मला सांग काय झालं?” आणि सायलीचा बांध फुटला. ती ओक्साबोक्सी रडू लागली. आता मात्र पाटीलबाई खुर्चीवरून उठल्या अन् सायलीच्या मागे येऊन तिच्या पाठीवर हात फिरवत म्हणाल्या, “रडू नकोस. सांग मला काय झालं.” सायलीने अश्रू भरल्या डोळ्यांनी पाटीलबाईंकडे पाहिले आणि म्हणाली, “बाई आज माझे आई-बाबा घटस्फोट घेणार आहेत. आजपासून माझं घर तुटलं.” असं म्हणून तिने आवेगाने बाईंना मिठी मारली. पाटीलबाईंनादेखील भडभडून आलं. त्यांच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या. थोड्याच वेळात दोघींनी एकमेकांना सावरले. दोघी आपापल्या खुर्च्यांवर बसल्या. थोडा वेळ शांततेत गेला आणि सायली बोलू लागली…

भरून आलेलं आकाश पाऊस पडल्यावर जसं मोकळं होतं, तसं सायलीचं मन आता मोकळं झालं होतं. आता सायली बऱ्यापैकी सावरली होती. ती सांगू लागली. गेली दोन वर्षे आई-बाबांची भांडणं सुरू आहेत. घराला नुसतं रणभूमीचं स्वरूप आलंय. चिडणं, रागावणं, रुसणं, आरडाओरडी, मारझोड रोजचीच. जिणं मुश्कील झालंय आमचं. मी आणि माझा भाऊ दोघेही जीव मुठीत धरून राहतो आणि आज तर वीजच पडली आमच्यावर. आईने घटस्फोटासाठी वकीलातर्फे नोटीस पाठवलीय बाबांना. आता ते दोघे वेगळे होणार आणि आम्ही…! आमचा विचार कोणीच करत नाही. कसं समजवायचं या मोठ्या माणसांना!

सायली भरभरून बोलत होती. पाटीलबाई ऐकत होत्या. ऐकता ऐकता त्यांचे डोळे भरून आले होते. सायलीचं बोलणं संपलं तरी पाटीलबाईंची नजर शून्यात! कोणास ठाऊक त्या कुठल्या तंद्रीत होत्या. शेवटी सायलीने, “बाई काय झालं?” असं विचारलं, तर पाटीलबाईच रडू लागल्या. त्यांनी पदराने आपला चेहरा झाकून घेतला आणि फुंदून फुंदून रडू लागल्या. आज त्यांच्या जखमेवरची खपली निघाली होती. अशी जखम की जी कधीही बरी न होणारी! बाहेरून सुकलेली वाटली तरी आतून भळभळणारी. पाटीलबाई शून्यात बघत बोलू लागल्या, “तो पंधरा वर्षांपूर्वीचा काळ. नवं घर, दोघांनाही सरकारी नोकरी, एक हुशार आणि चांगली मुलगी, त्रिकोणी कुटुंब. कोणालाही हेवा वाटावा असे. पण का कुणास ठाऊक. संशयाचं बीज माझ्या मनात रुजलं, वाढलं आणि एका सुखी संसाराला तडे गेले. वाद इतके विकोपाला जाऊ लागले की कित्येक वेळा आम्ही सारे उपाशीच झोपत असू. हा वाद, ही भांडणं असाह्य होऊन आमच्या एकुलत्या एक हुशार मुलीनं स्वतःचं जीवनच संपून टाकलं आणि आई-बाबांना आयुष्यभराचा एक धडा शिकवून गेली पोर! आम्ही घटस्फोट नाही घेतला. पण मुलीच्या आत्महत्येने आमचे जीवन निरस बनून गेलं. खरंच मी अशी का वागले? मी माझ्या मुलीचं मन का ओळखू शकले नाही. माझ्यामुळेच आमच्या सोनीनं जीवन संपवलं” असं म्हणून त्या आणखीनच रडू लागल्या.

सायलीला कळेना काय करावे. बाईंना सावरण्याची आता तिची वेळ होती. ती बाईंच्या खुर्चीजवळ गेली आणि त्यांच्या समोर गुडघ्यावर उभी राहिली. बाईंच्या चेहऱ्यावर मायेने हात फिरवत आपल्या रुमालाने त्यांचे डोळे पुसत ती बाईंना म्हणाली, “बाई जाऊ द्या, जे घडायचे ते घडले. आता आपल्या हातात काय आहे. कोण चूक कोण बरोबर यावर वाद घालून काय उपयोग? पण आपल्या मुलांचा यात दोष काय हा विचार कोणीच कसा करत नाही! पाटीलबाई, तुमच्या मुलीने आत्महत्या केली म्हणून तुम्ही एक झालात. आता माझ्या आई-बाबांनी एकत्र राहावं म्हणून मीही तुमच्या मुलीसारखीच…! ” पाटीलबाईंनी जोरात हंबरडा फोडला अन् ओरडल्या, “नाही सायली… नाही सायली” आणि त्यांनी सायलीला घट्ट मिठी मारली!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -