- प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ
कोणताही कार्यक्रम ठरण्याआधी, कार्यक्रम चालू असताना आणि कार्यक्रम झाल्यावर संस्थांमध्ये खडाजंगी होतेच. अनेक कारणांमुळे आता सुज्ञ रसिकांनी कार्यक्रमांकडेच पाठ फिरवली आहे. भारताची लोकसंख्या वाढत आहे. पण कार्यक्रम पाहण्यासाठी येणाऱ्यांची संख्या मात्र मोठ्या प्रमाणात घटत आहे.
महिला मंडळांच्या कार्यकारिणीची बैठक. ‘अतिविशाल महिला मंडळ’ असे ज्याचे नामकरण व्हावे, अशा काही शरीर प्रकृतीने सुदृढ असलेल्या महिला. “नवरात्रीसाठी आपल्याला नऊ कार्यक्रम करायचे आहेत, तर कार्यक्रम ठरवूया.” – अध्यक्ष.
“मी सुचवू का?” -उपाध्यक्ष.
“नेहमी सगळं तुम्हीच सुचवता.” – खजिनदार.
“मग तुम्ही सुचवा की, आम्ही विचार करतो.”
“आम्ही जे सुचवतो त्यावर तुम्ही फक्त विचार करता आणि तुम्ही जे सुचविता त्यांनाच कार्यक्रमाला बोलवले जाते.” कार्यकारिणी पहिला सदस्य.
“तुम्हाला योग्य वक्ते कळत नाहीत.” उपाध्यक्ष.
“तुम्हाला काय कळतंय, माहिताय… गेल्या बुधवारच्या कार्यक्रमात त्या नाटूबाईंना बोलवले होते. तोंडातल्या तोंडात बोलत होत्या. शेवटपर्यंत काही कळले नाही की त्यांना दिलेला विषय कोणता होता…” कार्यकारिणी दुसरा सदस्य.
“अहो, पण बाईंचा परिचय कसला भारीभक्कम होता. आता त्यांना बोलता येत नाही हे कसे परिचयावरून कळणार?” उपाध्यक्ष.
“त्या नाटूबाई म्हणजे तुमच्या मावसबहीण ना… त्या कशा बोलतात हे तुम्हाला लहानपणापासूनच माहीत असणार ना…?
“हं म्हणजे…” अस्वस्थ होत उपाध्यक्ष.
“तुम्ही आम्हाला शेवटपर्यंत कळू दिलं नाही की त्या तुमच्या नातेवाईक आहेत म्हणून… असेच कोणीतरी नातेवाईक, ओळखीचे घेऊन येता, संघटनेचे पैसे आहेत ते आपल्याच माणसाला मिळवून देता… आणि वरतून आमचा कार्यक्रमाला यायचा-जायचा रिक्षाचा खर्च वाया जातो. वेळ वाया जातो ते आणखी वेगळंच…” कार्यकारिणी तिसरा सदस्य.
“बस करा आता… कशासाठी जमलोय आणि काय बोलताय तुम्ही?” अध्यक्ष.
***
हा एक छोटासा संवाद होता कार्यक्रमाच्या निमित्ताने. असे असंख्य कार्यक्रम प्रत्येक संस्थेत होत राहतात. त्यानिमित्ताने चर्चा होतात, वक्ता बोलवला जातो, त्या वक्त्याला मानधन दिले जाते. वक्ता म्हणून ज्याला बोलवले जाते तो सहसा कोणाच्यातरी ओळखीचा जवळचा असतो, याचाही इतरांना त्रास होतो आणि जर का त्या वक्त्याने चांगला परफॉर्मन्स दिला नाही, तर भांडणासाठी विषयच मिळतो. तसा कोणताही कार्यक्रम ठरण्याआधी, कार्यक्रम चालू असताना आणि कार्यक्रम झाल्यावर संस्थांमध्ये खडाजंगी होतेच. कधी ती संस्थेतच विरते तर कधी संस्थेबाहेरही पसरते.
छोट्या संस्थेतील, छोट्या कार्यक्रमातसुद्धा वाद ठरलेलाच असतो; परंतु मोठ्या प्रमाणात जेव्हा संमेलने आयोजित केली जातात, तेव्हा त्या संमेलनामध्ये आपल्याला साहित्यिकांची मर्यादा सांभाळावी लागते. त्या साहित्यिकांनी बोलण्यासाठी दिलेल्या वेळ पाळावा लागतो. पण असे क्वचितच घडते. कोणालाही कितीही वेळ दिला तरी तो कमीच पडतो आणि मग पुढील वक्त्याची पंचायत होते. पुढच्या सर्व कार्यक्रमाचा डामडौल बिघडतो. सुरुवातीच्या वक्त्यांमुळे किंवा लांबलेल्या कार्यक्रमांमुळे पुढील कार्यक्रम उरकावे लागतात, तर कधी कधी ते रद्द करावे लागतात. हे सगळे माहीत असूनही परत परत तेच घडत राहते. आपण मानाने बोलावलेला महत्त्वाचा वक्ता बोलताना त्याला थांबवता येत नाही. संयोजक, आयोजक, सूत्रसंचालक याची पंचायत होते. रसिक प्रेक्षक जर टाळ्या वाजवून कार्यक्रम थांबण्याचा इशारा देत असतील तरी वक्त्याला त्या टाळ्यांमुळे प्रोत्साहन मिळते आणि तो आणखीन जास्त उत्साहाने बोलू लागतो!
एकंदरीत काय तर कार्यक्रमातील वक्ता कधी उशिरा येतो, अभ्यास न करता बोलतो, विषयांतर करतो. आपल्यासोबत असलेल्या इतर वक्त्यांच्या नावाचा चुकीचा उल्लेख करतो, दिलेली वेळ पाळत नाही आणि खूप चांगला वक्ता म्हणून प्रसिद्ध असलेला माणूस त्याचे ठरावीक भाषण अनेक ठिकाणी पुन्हा पुन्हा ऐकवत राहतो… अशा अनेक कारणांमुळे आता सुज्ञ रसिकांनी कार्यक्रमांकडेच पाठ फिरवली आहे. भारताची लोकसंख्या वाढत आहे. पण कार्यक्रम पाहण्यासाठी येणाऱ्यांची संख्या मात्र मोठ्या प्रमाणात घटत आहे. वक्त्याचे भाषण चालू असताना जर प्रेक्षक आपसात बोलत असतील, मोबाइलवर इतर कामे करत असती, तर वक्त्याने सुज्ञपणाने आपले भाषण थांबवावे.
एकंदरीतच काय तर “एक कार्यक्रम, हजार भानगडी” असेच खूपदा म्हणण्याची पाळी येते. त्यामुळे आपल्याला एखाद्या कार्यक्रमांमध्ये वक्ता म्हणून बोलवले असेल, तर त्या विषयाची पूर्ण तयारी करून जाणे आवश्यक आहे. वेळेत पोहोचून भाषणासाठी दिलेला वेळ पाळण्याची आवश्यकता आहे. असे जर घडले, तर हळूहळू मोठ्या प्रमाणात रसिक प्रेक्षक सभागृहात कार्यक्रमांसाठी निश्चितच गर्दी करतील!