Wednesday, October 9, 2024
Homeसाप्ताहिककोलाजNytrogen : नत्रवायू

Nytrogen : नत्रवायू

  • कथा : प्रा. देवबा पाटील

नायट्रोजन म्हणजे नत्रवायू सजीवांच्या शरीराचा एक महत्त्वाचा घटक आहे. विशेष म्हणजे तो हवेतील प्राणवायूस विरवून टाकतो. त्यामुळे वातावरणातील प्राणवायूचा अतिप्रखरपणा कमी होतो व निसर्गाच्या घडामोडींस व्यवस्थितपणा येतो. तो स्वत:ही जळत नाही आणि पदार्थांच्या ज्वलनासही मदत करत नाही हवेत नायट्रोजन नसता, तर ज्वलन अतिशय वेगाने झाले असते व आगीही जास्त लागल्या असत्या.

ज्ञानवर्धिनी शाळेतील देशमुख सर आठव्या वर्गातील मुला-मुलींना “आपले वातावरण” हे प्रकरण जीव तोडून मुलांना शिकवायचे व समजाऊन सांगायचे. त्यामुळे सर्व मुलेमुली त्यांच्या शिकवण्यावर खूपच खुश होती. सरांनी त्या दिवशी शिकवणे सुरू केले.

“मुलांनो, अभ्यास व्यवस्थित सुरू आहे ना?” सरांनी विचारला.

“हो सर. तुम्ही रसायनशास्त्राच्या अभ्यासाच्या शिकवलेल्या ससपद्धती व क्लृप्त्या आम्ही भौतिकशास्त्र व गणित यांनाही वापरतो.” नरेंद्राने सांगितले.

“त्यामुळे त्या दोन्ही विषयांचाही आमचा अभ्यास खूपच छान होत आहे.” कुंदा बोलली.

“ते दोन्हीही सरसुद्धा आमच्यावर तुमच्यासारखेच खुश असतात सर.” वीरेंद्राने सांगितले.

“आम्ही जीवशास्त्राचाही असाच अभ्यास करतो सर.” मंदाने सांगितले.

“हे ऐकून मला खूपच आनंद झाला.” सर म्हणाले.

“सर, तुम्ही परवा सांगितले होते की, हवेत नायट्रोजन ७८ टक्के आहे. मग त्याचा आपल्या शरीरास असा काय फायदा होतो?” वीरेंद्राने प्रश्न केला.

सर म्हणाले, “हवेत नायट्रोजन म्हणजे नत्रवायूचे प्रमाण हे सर्वात जास्त म्हणजे ७८ टक्के आहे, हे मी सांगितलेच आहे, तर हा नत्रवायू सजीवांच्या शरीराचा एक महत्त्वाचा घटक आहे. विशेष म्हणजे तो जरी अचेतन असला तरी तो हवेतील प्राणवायूस विरवून टाकतो. त्यामुळे वातावरणातील प्राणवायूचा अतिप्रखरपणा कमी होतो व निसर्गाच्या घडामोडींस व्यवस्थितपणा येतो.”

“या नत्रवायूची वैशिष्ट्ये काय आहेत सर?” चंदाने सरांना म्हटले.

सर पुढे म्हणाले, “नायट्रोजन हा गंधरहित, रंगहीन, चवरहित व उदासीन असा वायू आहे. तो स्वत:ही जळत नाही आणि पदार्थांच्या ज्वलनासही मदत करत नाही; परंतु तो हवेमध्ये असतो म्हणून तर ज्वलन मंद गतीने होते. हवेत नायट्रोजन नसता, तर ज्वलन अतिशय वेगाने झाले असते व आगीही जास्त लागल्या असत्या. हवेतील नायट्रोजनमुळे वनस्पतींची वाढही जोराने होते. तसेच तो प्राणवायूसोबत नायट्रेट्स नावाची संयुगे तयार करतो आणि पाण्यासोबत नत्राम्ल तयार करतो. ही संयुगे वनस्पतींच्या वाढीसाठी खूपच उपयुक्त असतात. म्हणून त्यांचा शेतातील पिकांसाठी लागणाऱ्या खतांमध्ये खूप वापर होतो.”

“सर, पण हा नत्रवायू तयार कसा होतो?” कुंदाने प्रश्न केला.

“सहसा नायट्रेट्सचे विघटन करून नत्रवायू तयार करतात.” सरांनी उत्तर दिले.

“या नायट्रोजनपासून अमोनिया कसा काय तयार होतो सर?” धर्मेंद्राने विचारले.

“नायट्रोजन व हायड्रोजन यांपासून एका ठरावीक रासायनिक प्रक्रियेने अमोनिया तयार होतो.” सर म्हणाले.

“तो तर कुजलेल्या सडलेल्या वनस्पतींपासूनही तयार होता की सर.” वृंदाने आपली शंका प्रकट केली.

“खरे आहे.” सर म्हणाले, “अमोनिया हा कुजक्या व सडक्या वनस्पतींपासूनही तयार होतो.”

“सर, अमोनयिा तर खाण्याचा चुना व नवसागरपासूनही तयार होतो ना?” रविंद्राने आपले ज्ञान प्रकट केले.

“अरे व्वा. तुम्हाला तर बरीच माहिती आहे.” सर म्हणाले, “तू म्हणतोस तेही बरोबर आहे. खाण्याचा चुना व नवसागर तापवूनही अमोनिया तयार होतो.”

“अमोनियाची गुणधर्मे काय आहेत सर?” वीरेंद्राने माहिती विचारली.

सर म्हणाले, “अमोनियाला जरी रंग नाही, पण त्याला उग्र वास आहे. तो पाण्यात हमखास विरघळतो. तो हवेहून हलका असून निळा लिटमस तांबडा करतो. तो जळतही नाही व ज्वलनास मदतही करत नाही; परंतु त्याला प्राणवायू मिळाल्यास तो पिवळसर बनून जळतो. त्यापासून गार बर्फ निर्माण करतात व कृत्रिम गारवासुद्धा निर्माण करता येतो.”

सरांचे असे मन लावून शिकवणे सुरू असताना व मुले ते लक्षपूर्वक ऐकत असतानाच त्या दिवशीचा शाळेचा तसा संपला.

“आता पुढील माहिती मी तुम्हाला उद्याच्या तासामध्ये शिकवेल.” सर म्हणाले.

“हो सर.” मुलांनी एकआवाजी उत्तर दिले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -