Tuesday, October 8, 2024
Homeसाप्ताहिककोलाजस्थलांतरित युगुल फ्लेमिंगो

स्थलांतरित युगुल फ्लेमिंगो

निसर्गवेद: डॉ. महालक्ष्मी वानखेडकर

आकृतीनियमानुसार पक्ष्यांना बरोबर माहीत असतं की कोणतं वातावरण त्यांना योग्य आहे. त्यांना अन्न, निवारा ज्या वातावरणात मिळेल तिथे ते स्थलांतरित होतात. शिवाय प्रजनन काळ. प्रजनन काळात जे वातावरण त्यांना पूरक असत त्याच वातावरणात ते जातात. मातेसाठी, पिल्लांसाठी पूरक निवारा, आहार, संरक्षण हे फार महत्त्वाचे असते आणि यासाठी ते वर्षातून काही ठिकाणी आवर्जून स्थलांतरित होतात. सर्व ऋतूंमध्ये प्रत्येक स्थान या जीवांसाठी एक विशिष्ट पूरकता निर्माण करते. पशुपक्षी, कीटक यांना हे बरोबर ज्ञान असतं.

आकर्षक सुंदर गुलाबी पंख, मनमिळावू, प्रेमळ, कौटुंबिक, सामाजिक, नर्तक असे हे भव्य दिव्य मनमोहक गुलाबी पंखाचे रोहीत म्हणजेच फ्लेमिंगो पक्षी.फ्लेमिंगो हा सर्वात सुंदर स्थलांतरित पक्षी आहे.फ्लेमिंगो हा शब्द स्पॅनिश आहे आणि फ्लेमा म्हणजे ज्वाला या शब्दापासून आला आहे. त्यांच्या पंखांचा गुलाबी रंग आणि त्याचा आकार यामुळे हा शब्द आला असावा. हिवाळ्यामध्ये हा भारतात स्थलांतरित होत असतो.फ्लेमिंगो हा बहमास देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे. याच्या सहा जाती आढळून येतात. हे पक्षी उष्णकटिबंध प्रदेशात आढळतात. सर्वात जास्त आफ्रिकेत टांगालीका सरोवर आणि व्हिक्टोरिया सरोवर येथे यांचे थवे दिसतात तर भारतात कच्छमध्ये यांचे वस्ती स्थान खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्या स्थानाला “फ्लेमिंगो चे शहर” असे म्हटले जाते. कच्छ मधील पाणी आटल्यावर हे परत स्थलांतरित होतात.

हे उष्ण कटिबंधीय पक्षी असल्यामुळे त्यांना भारतातील हिवाळा प्रजनन aकाळासाठी सुखकर असतो त्यामुळे यांचे खूप मोठ्या प्रमाणात भारतात स्थलांतर होत असते. 1980 मध्ये मुंबई (ठाणे)खाडीत फ्लेमिंगोची सुरुवात झाली. हे फ्लेमिंगो दक्षिण युरोप, एशिया मध्य पूर्व येथून येतात. पुण्यातील उजनी धरणा जवळ जिथे पोषक, उथळ पाण्याची जागा आहे तेथे सुद्धा हे पक्षी आढळून येतात.खाऱ्या पाण्यात, खोल खाडीत, खारफुटी दलदली आणि वाळूच्या क्षेत्रात हे पक्षी दिसून येतात. खारफुटीच्या दलदलीत शेवाळे, खेकडे, मच्छर, लार्वा, छोटे किडे हे जास्त प्रमाणात असते ज्याचा पौष्टिक आहार या फ्लेमिंगोना मिळत असतो. कोरोना काळात मानव बंदी वासात होता; परंतु हे सगळे जीव स्वतंत्र होते. त्यामुळे मार्च २०१९ मध्ये एक लाख ३४ हजार फ्लेमिंगोची नोंद झाली आहे. पक्ष्यांचा वेग त्यांच्यासाठी त्या प्रदेशाचे अंतर ठरवितो. हे पक्षी सामाजिक असल्यामुळे थव्याने किंवा कळपाने आपल्याला दिसतात.

ग्रेटर फ्लेमिंगो हे आफ्रिका, दक्षिण युरोप, दक्षिण पश्चिम एशिया आणि भारतीय द्वीप यावर सुद्धा आढळतात. याची उंची पाच फूट असते आणि वजन कमीत कमी साडेतीन किलो असते. आफ्रिका आणि भारतात तीन फुटाचे आणि अडीच किलो वजनाचे दिसून येतात. यांचे आयुष्य वीस ते तीस वर्षांचे असते. जगातील सर्वात जास्त आयुष्य ६८ वर्षे असलेल्या ग्रेट फ्लेमिंगोचे निधन ऑस्ट्रेलियातील प्राणी संग्रहालयात २०११ मध्ये झाले. विशिष्ट प्रकारचे शेवाळे खाल्ल्यामुळे त्यातील बिटा कॅरोलीनमुळे त्यांचे पंख गुलाबी होतात. त्यांच्या बाकदार चोचीमुळे त्यांना मासे, खेकडे, चिखलातील खाणे सहज शोधता येते. याच चोचीमुळे चिखलाचे घरटे बांधण्याससुद्धा मदत होते. यांच्या खाद्यांमध्ये चिखल आणि गाळ वेगळे करता येईल, अशी फिल्टरेशनची संरचना असते. यांचे पाय लांब आणि सडपातळ असतात. यांच्या अंगावरील पंख हे चमकदार पांढरे आणि गुलाबी दिसतात, तर आतील पंख हे काळसर रंगाचे असतात.

सर्वच पक्षी नृत्य करतात आणि त्यांच्या तऱ्हा सुद्धा वेगवेगळ्याच असतात. पण फ्लेमिंगोचे एकत्रित येऊन थव्याने नृत्य केलेले खूपच आकर्षक आणि धुंद करणारे असते. नृत्य करताना नर आणि मादी हजारोंच्या संख्येने एकत्रित येऊनच नृत्य करतात. माना उंच करून बाजूला आणि समोरच्या दिशेला फिरवणे ज्याला “हेड फ्लॅग” म्हणतात. जोरजोरात साद घालत मार्च करणाऱ्या सैनिकांप्रमाणे एकत्रित चाल करत एकाच वेळेला पावले उचलत यांचे नृत्य सुरू होते, तर कधी एकत्रित येऊन पंख पसरवून आकाशात उडतात. त्यामुळे त्यांच्या गुलाबी पंखाखालचे काळे पंख खूपच आकर्षित करतात, तर कधी डोके खाली शेपूट वर करतात, हा यांचा वेडिंग टाइम एक आनंदाच्या पर्वणीचा लग्न सोहळाच असतो.

मादीला नर आकर्षित करण्यासाठी अनेक क्लृप्त्या करत असतो. एकपत्नी, एकनिष्ठ असणारा नर हा मादीसाठी खूपच रोमँटिक सहयोगी असतो. नर आणि मादी यांचा मिलाप होण्याची जेव्हा वेळ येते, तेव्हा नराच्या पंखाचा रंगसुद्धा बदलतो. त्याच्या शेपटीकडील भागात तैलीय ग्रंथी असतात. नराची आपल्या चोचीने ते तेल पंखाला लावण्याची क्रिया या काळात खूप वाढते. या तेलामुळे त्याचे पंख गुलाबी आणि अधिक चमकदार होतात. जर मादीचा नरासाठी होकार असेल, तरच ती त्या कळपातून थोडी लांब जाऊन उभी राहते आणि खाली वाकून पंख पसरवते आणि ते नरासाठी आमंत्रण असते.

हे पक्षी आपल्या पिल्लांचे घरट्यांचे संरक्षण करतात. त्यासाठी ते आक्रमकसुद्धा होतात. नर आणि मादी एकत्र मिळून आपल्या पिल्लांचे संगोपन करतात. दोघेही आपल्या पिल्लांना ‘क्रॉप मिल्क’ म्हणून देतात. क्रॉप मिल्क म्हणजे त्यांच्या गळ्याजवळ अस्तर असलेल्या ग्रंथींमध्ये जिथे हार्मोन्स तयार होतात, तिथे हे दूध तयार होते. हे हार्मोन्स प्रॉलॅक्टिनचे उत्पादन करतात. या रक्तात दुधातली चरबी, प्रथिने व लाल-पांढऱ्या पेशी असतात. कबुतरांमध्येही असेच दूध तयार होते. पण त्यात चरबीचे प्रमाण कमी असते. जन्मतः पिल्लांच्या पंखांचा रंग हा राखाडी असतो. जसजशी पिल्लं मोठी होतात, तसतसा त्यांच्या पंखांचा रंग लाल-गुलाबी व्हायला लागतो. पाच ते सात दिवसांनी पिल्ले घरटे सोडतात.पालक त्यांना सोडून देतात. ती हजारो पिल्ले जेव्हा एकत्र येतात, तेव्हा त्यांना “मायक्रोक्रॅच” म्हणतात. मोठी झाल्यावर यांचे मोठ्या कळपात विलिनीकरण होते.

पक्ष्यांचा वेग त्यांच्यासाठी त्या प्रदेशाचे अंतर ठरवितो. निसर्गाने सर्व घटकांसाठी ही नैसर्गिक योजना केली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट हे पक्षी जिथे जातात तिथे स्वच्छता करतात. उदाहरणार्थ दलदलीचे, ओढ्याचे नद्यांचे, जंगल, झाडेझुडपे, खारफुटीचे जंगल जिथे अस्वच्छ पाणी असते तिथे मच्छरांसारखे कीटक वास्तव्य करून असतात. या ठिकाणची स्वच्छता हे पक्षी करत असतात. खारफुटीमुळे हे पक्षी जास्त प्रमाणात तिथे येतात; परंतु आता खारफुटीची जंगल तोडून तिथे प्रगती प्रकल्प राबवले जात आहे.

या खारफुटीत गुलाबी कोळंबी, लॉबस्टर, लाल मासे आणि विविध प्रकारचे मासे असतात. शिवाय खारफुटीमुळे समुद्राच्या लाटांचा वेग आणि किनाऱ्याची धूप रोखण्यास मदत करतात. त्यामुळे दलदलीत असणारे खाद्य जर या फ्लेमिंगोंना मिळेनासे झाले, तर हे फ्लेमिंगो स्थलांतर करून येतील का? नैसर्गिक बदल म्हणजे तलाव कोरडे पडल्याने फ्लेमिंगोंची संख्या कमी होत आहे. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारला काही नियम बनवावे लागतील. जसे प्रत्येक जीवाचे आध्यात्मिक महत्त्व आहे तसेच फ्लेमिंगोचे सुद्धा आध्यात्मिक महत्त्व आहे.

फ्लेमिंगोचे एका पायावर उभे राहणे आपल्याला जीवन संतुलित करायला शिकवते, तर फ्लेमिंगोच्या खाण्यामुळे त्याचा जो रंग बदलला जातो, तो आपल्याला जसे आपले अन्न तशी आपली प्रकृती हे शिकवतो, फ्लेमिंगोचा गुलाबी रंग दिवसेंदिवस गडद होत जातो तो आपल्याला आपला प्रेमळपणा वाढविण्यास शिकवतो, त्यांचे एकत्रित थव्याने किंवा कळपाने राहणे त्यांची सामाजिकता आपल्याला सामाजिक एकत्रित राहण्याची शिकवण देते, नृत्याची सृजनशीलता आपल्याला आनंदीत राहायला शिकवते. अशा या पक्ष्यांचे संरक्षण आणि संवर्धन करणे आपले प्रत्येकाचे कर्तव्य आहे.
[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -