दृष्टिक्षेप: अनघा निकम-मगदूम
मानवाला जेव्हा शब्दांची भाषा माहिती नव्हती, त्या वेळेला मानवाने चिन्हांची भाषा शोधली आणि आत्मसात केली होती. या चिन्हांच्या भाषेमुळेच मनुष्य संवाद साधू लागला. त्यानंतर शब्द आले आणि मग भाषा तयार झाली. अशीच चिन्हांची किंवा शुभ चिन्हांची भाषा आपल्या आजूबाजूच्या निसर्गामध्ये सुद्धा दडलेली आहे. ती भाषा समजून घेतली पाहिजे इतकेच. निसर्गातील बदल हे आपल्याला भविष्यात होणाऱ्या चांगल्या आणि वाईट गोष्टींचा संकेत देत असतात, ते संकेत कोणते हे समजून घेण्यासाठी निसर्गाच्या चिन्हांची भाषा येणे आवश्यक आहे. नवीन वर्ष आता उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. २०२४ या वर्षाचे स्वागत करण्यासाठी सगळेजण सज्ज झाले आहेत. अशा वेळेला आजूबाजूच्या निसर्गामध्ये सुद्धा येणारे वर्ष नक्कीच चांगलं असेल अशी शुभचिन्ह सुद्धा दिसू लागली आहेत असं काहीसं चित्र आजूबाजूला आहे.
सन २०२० जेव्हा उजाडलं तेव्हा कुणालाही माहिती नव्हत की, या वर्षाच्या पोटात नेमकं काय दडलं आहे. पण जसजसा मार्च महिना उजाडू लागला, तसतसं संपूर्ण जग कोरोनासारख्या महाभयंकर रोगाच्या विळख्यात अडकलं. कधीही न पाहिलेला लॉकडाऊन संपूर्ण जगाने पाहिला, जग थांबलं, मृत्यूचं सर्वत्र थैमान सुरू झालं, व्यवसाय ठप्प झालेले, नोकरी गेलेले, आपली जवळची माणसे अचानक गेल्याने हताश झालेले चेहरे आजूबाजूला होते. आर्थिक, मानसिक, शारीरिक परिणाम जाणवू लागले. कुटुंबं विस्थापित झाली. त्यानंतर हे जग शिल्लक राहील की नाही? अशी भीती वाटावी असा काळ आणि असं वातावरण आजूबाजूला होते. हे सारं चित्र या जगाने पाहिलं, आपण पुन्हा सावरू का? असं वाटत असतानाच मात्र त्यातूनही हे जग स्थिरावलं, वाचलं. २०२१ आणि थोडासा २०२२ चा भाग असं वर्ष सरल्यानंतर कोरोना आणि कोरोनाची भीती हळूहळू कमी झाली. भीती कमी झाल्यानंतर त्याची तीव्रता ही कमी झाली. कोरोना अतितीव्र वेगाने पसरण्यामागे त्या रोगाच्या लक्षणापेक्षाही त्याची भीतीच अधिक कारणीभूत होती हे लवकरच सिद्ध झाली. कारण या २०२३ च्या डिसेंबरमध्ये सुद्धा कोरोनाचे रुग्ण भारतात पुन्हा आढळू लागलेत. मात्र त्याची भीती आज इतकी जाणवत नाही; परंतु २०२०-२०२१ ही दोन वर्षे कोरोनामुळे आलेल्या संकटाच्या तडाख्याची होती, तर २०२२ आणि सन २०२३ ही दोन वर्षे या संकटाच्या परिणामांची वर्ष होती. या सगळ्यातून माणूस हळूहळू सावरत आहे.
पण सरत असलेल्या २०२३ या वर्षाने दुष्काळाची ओळख करून दिली. थंडीचे प्रमाण कमी, अत्यल्प पाऊस यामुळे उन्हाळा पावसाविना गेलेला दुष्काळ पाहिला, याचा परिणाम सर्वत्र दिसून आला. गतवर्षी मागच्या डिसेंबरमध्ये याची चिन्हे निसर्गाकडून दिसू लागली होती. डिसेंबर आणि जानेवारीमध्ये थंडीचे प्रमाण अत्यल्प होतं. त्यामुळे सरणारे वर्ष उष्ण वर्ष ठरले. त्याचा परिणाम जसा जगात सर्वत्र झाला तसाच तो भारतात, महाराष्ट्रात, कोकणात झाला. आंबा हे कोकणचे महत्त्वाचे नगदी पीक. पण पुरेशी थंडीच न पडल्याने गेल्या आंबा हंगामात पीकच आले नाही. त्याचे आर्थिक तोटे कोकण भोगताना दिसत आहे. कडक उन्हाळा सोसल्यानंतर किमान पावसात दिलासा मिळेल ही अपेक्षाही पूर्ण झाली नाही. २०२३ मध्ये कमी पर्जन्यमान झाले. जगात कुठेही कमी पाऊस पडेल, पण कोकण नेहमीच हिरवेगार राहील, मुसळधार पडणारा पाऊस त्याचे वेळपत्रक कोकणात पूर्ण करेल अशी अपेक्षाही अपूर्ण राहिली. या दुष्काळाचे परिणाम आताच येत्या उन्हाळ्यात भोगावे लागणार आहेत. कमी पावसामुळे भीषण पाणी टंचाईची भीती व्यक्त केली जात आहे. त्याचे नियोजन आतापासूनच सुरू कारणे आवश्यक आहे.
पण असे जरी असले तरीही येणारे नवे वर्ष लोकांना फारसे निराश करणार नाही अशी चिन्हे दिसू लागली आहेत. जरा उशिरा का होईना थंडी चांगली पडली आहे. आंब्याला चांगला मोहोर धरू लागला आहे. डोंगर उतारावरच्या, रस्त्यालगतच्या बागांमधून मोहोराचा घमघमाट सुटला आहे. वातावरण आल्हाददायक आहे. यंदा मत्स्य उत्पादन सुद्धा चांगलं होईल अशी एक अपेक्षा स्थानिक मच्छीमारांकडून व्यक्त केली जात आहे. यातच जर २०२४ चा पावसाळा सुद्धा तितकाच सुखदायी झाला, तर २०२४ तितकंच सकारात्मक आणि चांगलं होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्याची चिन्ह हळूहळू निसर्गानं दाखवण्यास सुरुवात केली आहे. आता मनुष्याने सुद्धा सतत नकारात्मक विचार करण्यापेक्षा आजूबाजूचे बदल सकारात्मकतेने स्वीकारले, तर त्याच्यासाठी प्रत्येक वर्ष सुखाचे, समाधानाचे जाईल हे निश्चित! यासाठी माणसाने निसर्गाची भाषा शिकणे आवश्यक आहे. होणाऱ्या बदलांचे संकेत निसर्ग आपल्याला देतच असतो, गरज फक्त ते समजून घेण्याची असते. यासाठी अधिकाधिक निसर्गाच्या जवळ गेले पाहिजे तेव्हाच निसर्गाचे संकेत, निसर्गाचे इशारे आपल्याला समजतील आणि जगण्यासाठी नवा विचार देतील.
[email protected]