पालघर जिल्हा आदिवासीबहुल भाग म्हणून सर्व परिचित आहे. मूलभूत सुविधांचाही अभाव असलेल्या या भागाचा विकास व्हावा, यासाठी ठाणे जिल्ह्यातून २०१४ साली पालघर या भागाचे स्वतंत्र जिल्हा म्हणून विभाजन झाले. मात्र मुख्य प्रवाहापासून मूलभूत सुविधांपासून अनेक वर्ष इथला आदिवासी बांधव आजही वंचित आहे. किमान जन्मताच दररोज ३ बालके कुपोषणाने मृत्युमुखी पडतात, तर शेकडो लोकांना उपचारासाठी पैसे नसल्याने व आपल्या जिल्ह्यात रुग्णालय नसल्याने मृत्यूला सामोरे जावे लागते. जिथे आरोग्याची ही तऱ्हा तिथे शिक्षणाचाही काय अवस्था असेल? याची कल्पना कुठल्याही सर्वसामान्य माणसालाही येईल. म्हणूनच या परिस्थितीत परिवर्तनाचा ध्यास घेऊन जिजाऊ शैक्षणिक व समाजिक संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांनी आदिवासी व गोरगरीब विद्यार्थ्यांनाही अत्याधुनिक शिक्षणाचा परिस्पर्श होण्यासाठी पालघर जिल्ह्याच्या विक्रमगड तालुक्यातील झडपोली येथे २०१५ साली आपल्या आईच्या नावाने सौ. भावनादेवी भगवान सांबरे इंटरनॅशनल स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय ही एकमेव सी.बी.एस.सी. अभ्यासक्रमावर आधारित शाळा सुरू केली. त्यामध्ये इयत्ता नर्सरी ते इयत्ता १२ वीपर्यंत सी.बी.एस.सी. तसेच इयत्ता ११ वी व १२ वी महाराष्ट्र स्टेट बोर्डमध्ये सुद्धा शिक्षण दिले जाते. आपल्या शाळेत एकूण १२०८ त्यामध्ये एकूण मुले ६१६ आणि ५९२ मुली शिक्षण घेत आहेत.
एकीकडे अशा प्रकारच्या इतर शाळांमध्ये शिक्षणासाठी भली मोठी फी आकारली जाते. मात्र या शाळेत सर्व वर्गातील तसेच सर्व जाती-जमातीतील मुलांना मोफत सी.बी.एस.सी. अभ्यासक्रमाचे शिक्षण दिले जाते. मोफत वह्या आणि शाळेचा गणवेश हे देखील अगदी दिले जाते. विद्यार्थांना एक पेन्सिलही स्वत:च्या पैशाने विकत घ्यावी लागत नाही. येथील हा भाग दुर्गम आदिवासीबहुल असल्याने आदिवासी भागात सुरुवातीला मुलांना शिकवताना भाषेची समस्या निर्माण झाली. त्यानंतर सी.बी.एस.ई अभ्सासक्रमानुसार शिकवताना त्यांना दिला जाणारा अभ्यास हा घरी त्यांचे पालक करून घेत नाहीत म्हणून मुलांकडे अतिक्षय प्राथमिक टप्प्यातून शिक्षणाची सुरुवात केली. डीजिटल माध्यमांचा वापर करून प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी नियोजित वेळ देण्याचे काम केले. पालकांना सुद्धा मोठ्या प्रमाणात सी.बी.एस.ई च्या शिक्षणाबद्दल महत्त्व पटवून देण्यात आले. कारण कुठल्याही परिस्थितीत या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे हे संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांचे स्वप्न होते.
“इथला प्रत्येक माणूस सक्षम झाला पाहिजे हा संस्थेने पेरलेला विचार आता रुजलाय आणि अधिक बहारदारपणे फुलतोय देखील. उद्याची येणारी सक्षम पिढी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या मातीतून घडत आहे, याचे अपार समाधान आहे.
– निलेश भगवान सांबरे (संस्थापक – जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था)
वाचनालय
सौ. भावनादेवी भगवान सांबरे इंटरनॅशनल स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये सुसज्ज व विविध पुस्तकांनी भरलेले वाचनालय आहे. तसेच UPSC / MPSC ॲॅकॅडमीचे मोठे वाचनालय आहे. यामध्ये
येथील विद्यार्थी पुढील ध्येयाची पूर्तता करण्यासाठी वाटचाल करीत आहेत.
केवळ शिक्षण नाही, तर सक्षमही केले जाते
आजच्या युगातील स्पर्धा पाहता आपल्या शाळेत इयत्ता ९ वीपासून इयत्ता १२ पर्यंत NEET आणि IIT-JEE या स्पर्धापरीक्षेकरिता वेगळे आणि विशेष विषय तज्ज्ञांकडून स्पर्धा परीक्षांच्या विषयांची वैयक्तिक तयारी करून घेतली जाते. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास व परत जाण्यास होणारा त्रास लक्षात घेता शाळेच्या आवारामध्ये मुलांसाठी स्वतंत्र वसतिगृह बनवण्यात आले आहे. शाळेत मुलांना / विद्यार्थ्यांना शाळेत ने-आण करण्यासाठी सर्व सुविधापूर्ण शाळेची बस तसेच व्हॅन उपलब्ध करून देण्यात आली आहे. शाळेतील मुलांच्या सर्वांगीण विकासाठी भव्य असे क्रीडांगण शाळेच्या आवारात देण्यात आले आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये खेळाडूवृत्तीची जोपासना करण्यात येईल. शाळेत सुसज्ज कॉम्प्युटर (संगणक कक्ष) लॅब, संगीत कक्ष, तसेच स्वतंत्र कला कक्ष देण्यात आला आहे.
शाळेतील विविध उपक्रम
- शाळा चालू झाल्यापासून शाळेत शैक्षणिक उपक्रमाअंतर्गत विविध उपक्रम (सी.बी.एस.सी.) अभ्यासक्रमानुसार आतापर्यंत राबविले गेले आहेत.
- मुलांमधली कलात्मकता आणि गुणवत्ता वाढीस लागावी यासाठी इयत्ता १ ते ४ साठी कलरिंग आणि ड्रॉईंग (६ वी, ८ वी) च्या स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. हिंदी दिवसाचे औचित्य साधून कविता वाचन, हास्य कविता वाचन आणि निबंध स्पर्धा यांचे देखील आयोजन करण्यात येते.
- जागतिक पर्यावरण दिवसाचे औचित्य साधून इयत्ता १ ते १० साठी हस्ताक्षर स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येते.
- स्वातंत्र दिनाचे औचित्य साधून मॅप मेकिंग इयत्ता १ ली ते ५ वी आणि कार्ड मेकिंग ६वी ते ७ वी आणि आपल्या संस्कृतीची ओळख व्हावी म्हणून इयत्ता ८ वी ते १० साठी विविध सांस्कृतिक उपक्रम राबवले जातात. रक्षाबंधन, जन्माष्टमी उत्सव, गणेश चतुर्थी आणि नवरात्री उत्सव यांसारखे उत्सव राबविले जातात. राखी मेकिंग, पूजा थाळी सजावट आणि बहिणीसाठी शुभेच्छा अशा विविध स्पर्धा घेण्यात येतात.
- तसेच शैक्षणिक उपक्रमासोबतच मुलांमध्ये सामाजसेवेची आवड निर्माण व्हावी म्हणून ती जोपासण्यासाठी देखील स्वच्छता अभियान यांसारखे विविध उपक्रम राबविण्यात येतात.
- वार्षिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करत विशेष पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय क्रीडापटू अमण चौधरी यांसारख्या व्यक्तींना आमंत्रित करण्यात येते.
- आमच्या स्कूलमध्ये JEE / NEET चे १०० टक्के विद्यार्थी घडण्यासाठी मोठे प्रयत्न केले जात आहेत.
- ९ वीपासून स्पेशल बॅच सुरू करण्यात आली आहे. त्याप्रमाणेच अभ्यासाबरोबर खेळ, संगीत, कराटे व डीजिटल क्लासरूम यांच्यासह पूर्वीपेक्षाही अधिक चांगल्या पद्धतीने शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न चालू आहेत.
- २०२०-२०२१ च्या शैक्षणिक वर्षात सौ. भावनादेवी भगवान ज्यू. कॉलेजने यश मिळवत १२ वीच्या परीक्षेत १००% निकाल दिला. ही बाब निश्चितच आमच्या शाळेसाठी अभिमानास्पद होती. चार तालुक्यांतून केलेल्या सर्वोत्तम कामगिरीचा हा गौरव होता.
- या वर्षी सौ. भावनादेवी भगवान सांबरे इंटरनॅशनल स्कूलची शैक्षणिक वर्ष २०२३ – २४ ही प्रथम दहावीची बॅच आहे. याही वर्षी ही परंपरा कायम राखण्यासाठी शाळा सर्वोतोपरिने क्रियाशील आणि गतीशील आहे.
- केवळ मोफत शिक्षण मिळते म्हणून येथे पालक आपल्या मुलांना शाळेत दाखल करत नाहीत, तर गुणवत्ता आहे म्हणून ते या शाळेत येतात. गरिबातला गरीब आणि श्रीमंतांची मुलेही या शाळेत एकसमानतेने या ठिकाणी ज्ञानार्जन करतात हे आमच्या या शाळेचे विशेष वैशिष्ट्य आहे.
- दुर्गम भागात संस्थेच्या वतीने विक्रमगड, मोखाडा, जव्हार, शहापूर, भिवंडी या तालुक्यांतील विविध ठिकाणी अशाच आणखी ७ शाळा सुरू केल्या आहेत. आज संस्थेच्या माध्यमातून अशा ८ सीबीएसई निःशुल्क शाळा चालवण्यात येत आहेत.
- तर कुठलाही विद्यार्थी आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत म्हणून पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथील विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी २५ लाख वह्यांचे मोफत वाटप केले जाते.
- गुणवत्ता असूनही ज्यांना केवळ पैशांअभावी आपले शिक्षण पूर्ण करता येत नाही, अशा कोकणातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या पंखात बळ देण्यासाठी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेतर्फे विविध मोफत उपक्रम राबवले जातात. याच विद्यार्थांना भविष्यातील शैक्षणिक स्पर्धेत सक्षम बनवण्यासाठी जिजाऊ मिशन ॲॅकॅडमीमार्फत ५ वी ते १० वी मोफत क्लासेस चालविले जातात. सद्यस्थितीत जव्हार, खानिवली, पाचमाड, मोखाडा व विक्रमगड येथे हे क्लासेस चालू आहेत. संस्था या विद्यार्थांसाठी घेत असलेल्या उपक्रमांचा विद्यार्थ्यांना लाभ होताना पाहायला मिळत आहे. दरवर्षी आमच्या शाळेतून MBBS आणि IIT ला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढतच आहे.
पालकांचा अनुभव :-
विद्यार्थ्यांच्या पालकांचा चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे. “माझा मुलगा मोठा अधिकारी व्हावा’ म्हणून सी. बी. एस. ई शिक्षणाकडे त्यांनी बऱ्यापैकी लक्ष केंद्रित केले आहे. “अशा प्रतिक्रिया जेव्हा येतात तेव्हा संस्थेचा मूळ उद्देश सार्थकी लागल्याचे समाधान मिळते. पालक सभेसाठी पालकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात असते. त्यामध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या दृष्टीने दिलेल्या सूचनांचे पालन पालक करतात.