Tuesday, July 23, 2024
Homeसाप्ताहिककोलाजदिसता वाचनप्रेमींचे जत्थे...

दिसता वाचनप्रेमींचे जत्थे…

खास बात: डॉ. अर्चना कुरतडकर

‘वाचाल तर वाचाल’ हे घोषवाक्य अनेक वेळा वापरले जाते. वाचनसंस्कृती रुजवण्यासाठी वेगवेगळे प्रयोग होताना दिसतात. विविध व्यक्ती, संस्था, संघटना आपापल्या क्षमतेनुसार हा जागर सुरू ठेवतात. हा एक महोत्सव असतो, यज्ञ असतो वा अत्यंत चांगले परिणाम देणारा उपक्रमही असतो, कारण या पायामध्ये भक्कम इमारत उभारण्याची ताकद असते. या अर्थाने बघता अलीकडेच पुण्यात साजऱ्या झालेल्या पण राज्यातच नव्हे, तर देशात चर्चिल्या गेलेल्या उपक्रमांची नोंद घ्यावी लागेल. पालक आणि मुलांनी एकत्र येऊन कथा सांगण्याचा कार्यक्रम असेल वा मैदानावर पुस्तकांच्या माध्यमातून देशाचे नाव सन्मानपूर्वक रेखण्याचा कार्यक्रम असेल अथवा एकाच छताखाली अगणित पुस्तकांचा मेळावा साजरा होण्याचे प्रयोजन असेल… या कार्यक्रमांनी ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये स्थान मिळवलेच, पण त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे वाचनाप्रति सजगता निर्माण करण्याकडे एक मोठे पाऊल उचलण्याचे काम केले.

वाचन कमी होण्यामागे अनेक कारणे आहेत. वाचकांना पुस्तकांपर्यंत पोहोचणे शक्य न होणे, हे त्यातीलच एक. असे असताना पुस्तकेच त्यांच्यापर्यंत पोहोचली, तर एक मोठी समस्या सुटू शकते. आयोजित होणारी अशी पुस्तक प्रदर्शने, मेळावे वा महोत्सव अशी दरी दूर करण्याचे काम करतात. मोठ्या संख्येने पुस्तके पाहिल्यानंतर लहान मुलांना, युवावर्गाला आपापल्या आवडीच्या विषयांवरील इतकी पुस्तके उपलब्ध असल्याचे समजते आणि त्यांच्यामध्ये वाचनाचे भान विकसित होण्यास मदत होते. मुख्य म्हणजे आपल्याला काय आवडते याचा बोधदेखील काही पुस्तकांच्या हाताळणीतून होऊ शकतो. एखादी गोष्ट आवडणे हीच मुळी वाचनसंस्कृतीला बळ देणारी बाब आहे. प्रत्येकाचे वाचनवय वेगवेगळे असते. एखादा अगदी लहान वयापासून वाचू लागतो, तर कोणी म्हातारवयात पुस्तकांकडे वळतात. म्हणूनच वाचनवय लक्षात घेऊन साहित्य उपलब्ध करून दिले, तर आवड वाढते आणि अधिकाधिक लोक अशा संमेलनांमध्ये, महोत्सवांमध्ये हजेरी लावू इच्छितात. अर्थातच वाचनसंस्कृतीच्या वाढीसाठी याचा निश्चितच चांगला परिणाम बघायला मिळतो. अशा उपाययोजनांमुळे वा उपक्रमांमुळे शंभर टक्के लोक वाचनाकडे वळणार नाहीत, पण वाचणाऱ्यांचा वाढणारा प्रत्येक टक्काही महत्त्वाचा आहे, यातही शंका नाही.

विश्वविक्रमांचे एक वेगळे महत्त्व असतेच. एखाद्या विश्वविक्रमी उपक्रमात आपला सहभाग प्रत्येकाला वैयक्तिक पातळीवर आनंद देणारा असतो. हीच बाब वाचनसंस्कृतीला नवे आयाम देणारीही ठरते. एखाद्या उपक्रमाचा जागतिक पातळीवर विचार केला जातो, असे काही उपक्रम होतात हे देशाच्या कानाकोपऱ्यांपर्यंत पोहोचते, तेव्हा होणारा त्याचा परिणामही बराच मोठा आणि चांगला असतो. विशेषत: गावखेड्यांमध्ये वा वाचनापासून दूर असणाऱ्या भागांमध्ये अशा उपक्रमांची चर्चा होते, त्यासंबंधीच्या बातम्या वाचनात येतात, तेव्हा त्या त्या भागातील शिक्षक वा पालकही ते संस्कार रुजवण्याचे प्रयत्न करू लागतात. समाजावर त्याचाही सकारात्मक परिणाम होत राहतो. वेळोवेळी साजऱ्या होणाऱ्या पुस्तक महोत्सवांना मिळणाऱ्या प्रतिसादातून समोर येणारी ही बाब आशादायी वाटते. लहान मुलांच्या मासिकांसाठी काम करत असल्यामुळे तसेच वाचन चळवळीसाठी वेगवेगळे प्रयत्न करत असल्यामुळे मी वाचकांचा टक्का कमी होत नसल्याचे खात्रीने सांगू शकते. उलटपक्षी, मुले चांगले वाचत आहेत. पालक त्यांना चांगले प्रोत्साहन देत आहेत आणि त्यातून काही चांगल्या गोष्टीही घडत आहेत. या सगळ्यात शिक्षकांचा सहभागही मला मोलाचा वाटतो.

‘शिक्षण विवेक’ मासिकाच्या अंतर्गत काव्यवाचन स्पर्धा घेतली जाते. ‘सांगू का गोष्ट’ सारखी मोठी स्पर्धा घेतली जाते. गेल्या वर्षी त्यात जवळपास १०,५०० मुलांनी सहभाग घेतला होता. वाचनासंदर्भात ‘प्रश्नमंजूषा’ स्पर्धाही घेतली जाते. त्याचबरोबर अभिवाचनाचे कार्यक्रम आणि अभिवाचन स्पर्धादेखील घेतल्या जातात. त्यात मुले वेगवेगळ्या दृष्टीने सहभागी होतात, प्रयत्न करतात. म्हणजेच पुस्तक महोत्सवाशी संबंधित नसलेले आणि विविध संस्थांकडून राबवले जाणारे असे उपक्रमही महत्त्वपूर्ण ठरतात. वाचनाच्या दृष्टीने या सर्वांना उत्तम प्रतिसाद मिळताना दिसतो. ही बाब सकारात्मक वाटते कारण पालक, शिक्षक आणि मुले या सर्वांचाच त्यात सक्रिय सहभाग असतो. त्यातूनच या सगळ्यांच्या विचारमंथनाला चालना मिळते आणि सहभागी लोकांची संख्या दर वर्षी वाढतानाच दिसते. सध्या अनेक पालक सजगतेने मुलांच्या वाचनाकडे लक्ष पुरवताना दिसतात. अनेक तरुण या वाचन प्रक्रियेकडे वेगळ्या नजरेने पाहत असतात. या सगळ्याचा सकारात्मक परिणाम पुढील दोन-चार वर्षांमध्ये तर अधिक प्रभावीपणे बघायला मिळेल, असे वाटते.

सध्या आपण सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावाची, त्यासंबंधी वाढत्या व्यसनाधिनतेची चिंता व्यक्त करतो. वाचन चळवळ फैलावणे आणि त्याला चांगला लोकाश्रय मिळणे हे या समस्येवरीलही चोख उत्तर आहे. जाणीव-जागृतीमुळे पालक मुलांना मोबाइलपासून, सोशल मीडियाच्या अतिक्रमणापासून दूर ठेवण्यात यशस्वी होऊ लागले असून, त्यासाठी वाचनाचाच आधार घेताना दिसत आहेत. हीदेखील एक महत्त्वाची आणि चांगली बाब आहे, असे आपण म्हणू शकतो. अलिकडेच पार पडलेल्या पुस्तक प्रदर्शनांमध्ये तरुणाईचा उत्तम सहभाग जाणवला. यात अनेक तरुण-तरुणींनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली दिसली. प्रत्येकाच्या कामाचे स्वरूप वेगवेगळे असले तरी अखेर सर्वांचे प्रयत्न वाचन चळवळीला प्रोत्साहन देणारे, मदत करणारे, हातभार लावणारेच होते. आपण अशा कार्यक्रमांमध्ये उपस्थित असायला हवे, आपली जबाबदारी पार पाडायला हवी, हा विचार अथवा ही जाणीवही खूप काही सांगून जाताना दिसते. शेवटी वाचणारी एक एक व्यक्ती वाढणे, वाचणाऱ्या वर्गात वाढ होणे अनेकार्थाने महत्त्व आहे, कारण हा प्रवाह एकटा वाहत नाही, तर संपादक, लेखक, प्रकाशक, वितरक, विक्रेते अशा सर्वांनाच पुढे घेऊन जातो. म्हणूनच हा एक चांगला स्टार्ट अप आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

अगदी सहा-सात वर्षांच्या मुलांपासून ८५-८० वयोगटातील वृद्धांनी पुस्तकांच्या प्रेमापोटी येणे, पुस्तके हाताळणे, चाळणे ही गोष्टच खरे तर अत्यंत आनंददायी आहे. खेरीज लोक केवळ पुस्तके हाताळत नाहीत, तर उत्साहाने खरेदीही करतात. त्यामुळेच खरेदीदारांची वाढती संख्यादेखील साहित्यविषयक जाणीव वाढल्याचा दाखला देऊन जाते. शेवटी प्रत्येक स्तरावरून निकराचे आणि प्रामाणिक प्रयत्न होत राहिले, तरच वाचनसंस्कृती बहरणार आहे, कारण काही काळ हाती घेऊन बाजूला ठेवावा, असा हा वसा नाही. ही निरंतर सुरू ठेवावी अशी परंपरा आहे. हा वसा सातत्याने पुढे नेण्याची जबाबदारी समाजातील प्रत्येकाची आहे. एकीकडे भौतिक विकास होत असताना वाचनविषयक जाणिवांचा विकासच समाजाचे रूप पालटू शकेल. वैचारिक प्रगल्भता, वाढती सर्जनशीलता हे वाचनाचे लाभ आहेतच. पण मुख्य म्हणजे वाचनाने ‘स्व’ची ओळख होते. या ओळखीतून तुम्ही अंतर्मुख होता, तितके तुम्ही बहुर्मुख चांगले काम करू शकता. आधी उल्लेख केल्याप्रमाणे वाचनामुळे संवेदनशीलता वाढते. समोरच्याला नेमके काय म्हणायचे आहे, हे तुम्हाला समजून घेता येते. ते समजून घेतानाच व्यक्ती म्हणून आपण त्याला अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देऊ शकतो. महत्त्वाचे म्हणजे एका व्यक्तीने दिलेला सकारात्मक प्रतिसाद वा कामही संपूर्ण समाजासाठी खूप महत्त्वाचे असते. त्यामुळेच आधीच व्यक्ती, समाज आणि देश म्हणून आपण जाणिवांची एक उंची, एक वेगळी पातळी गाठू शकतो. म्हणजेच वाचनाच्या व्यासंगाचा इतका ठाशीव परिणाम बघायला मिळू शकतो.

सध्या माणसाच्या जगातील यांत्रिकतेच्या मुद्द्यावर बरीच चर्चा होत आहे. अर्थात ही काही नवी बाब नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात यांत्रिक होण्याचे विशिष्ट वय असते. पण यांत्रिक झाल्यानंतरच त्याला माणूसपणाचे महत्त्व पटते आणि तो पुन्हा माणूसपणाकडे वळू लागतो. हे वळण सुकर होण्यासाठी तसेच वेळेवर होण्यासाठीदेखील वाचनाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते. आजच्या वाचनप्रेमी तरुणांकडे पाहून तर मी हे खात्रीपूर्वक सांगू शकते, कारण वाचणाऱ्या तरुणांच्या एका हाती अतिप्रगत तंत्रज्ञान असले तरी दुसऱ्या हातात पुस्तक असल्यामुळे त्यांच्यात तेवढीच आस्था, सजगता, संवेदनशीलता, समन्वय आणि दुसऱ्यासाठी काहीतरी करण्याची भावना बघायला मिळते. वाचनाचा जागर सुरू राहिला, तर समाजासाठी काम करणाऱ्या तरुणाईची टक्केवारी नक्कीच वाढती राहील. म्हणूनच आताच्या काळाला साजेसे लेखन पुढे यायला हवे. हा रथ असाच पुढे जात राहायला हवा.(लेखिका ‘शिक्षण विवेक’मध्ये कार्यकारी संपादक म्हणून कार्यरत आहेत.)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -