क्राइम: ॲड. रिया करंजकर
नोकरीसाठी लोकांचा लोंढा गावाकडून शहराकडे येऊ लागलेला आहे. शहरामध्ये लोकांना राहण्यासाठी जागा अपुरे पडू लागलेली आहे. म्हणून लोक उपनगरामध्ये घर शोधून तिथे स्थायिक होत आहेत. लोकांचे राहण्याचे प्रश्न मिटवण्यासाठी शहरांमध्ये टोलेजंग इमारती उभ्या राहू लागल्या आहेत. अनेक बिल्डर आपले फ्लॅट विकावे म्हणून ग्राहकांना वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून देत आहेत. सुधीर आणि सुनीता यांनी उपनगरामध्ये आपल्या कुटुंबासाठी नवीन फ्लॅट विकत घेतला. सासू, सुधीर, सुनीता, व त्यांची दोन मुलं यांच्यासोबत त्यांचा एक पाळीव प्राणी कुत्राही होता. सुधीर आणि सुनीता राहायला गेल्यानंतर तिथे त्यांनी आपल्या नवीन घराची पूजाही घातली व त्यासाठी अनेक नातेवाइकांनाही बोलवले. सुधीर यांनी बाहेरच्या हॉलला खिडकीला ग्रिल लावून घेतली नव्हती. अनेक नातेवाइकांनी त्यांना ‘लवकरात लवकर खिडकीला ग्रिल लावून घे’ असेही सुचवलं. घरात पाळीव प्राणी आहे उडी मारेल व त्याला काहीतरी होईल असं नातेवाइकांनी सांगितलं. सुधीरने सगळ्यांना सांगितले, ‘जरा पैसे कमी पडतात लवकरात लवकर लावून घेईन.’ पण दिवसेंदिवस या गोष्टीकडे सुधीरने कानाडोळा केला.
सुधीरच्या वयस्कर आईनेही त्याला सांगितले, ‘अरे लवकर ग्रिल लाव आपला डॉगी इकडे तिकडे फिरत असतो कधी उडी मारली तर आपल्याला कळणारही नाही.’ कामाच्या व्यापामुळे सुधीरला ग्रिल लावण्यासाठी वेळच मिळत नव्हता. ज्या ज्यावेळी त्याचं घर बघण्यासाठी नातेवाईक येत होते, ते प्रत्येक नातेवाईक त्याला आवर्जून ‘ग्रिल लावून घे बाबा’ असं सांगत होते. बिल्डिंगमधल्या चौथ्या मजल्यावर सुधीरच घर होतं. बिल्डरने बिल्डिंगला ग्रिल लावलेले नव्हते. ग्रिल हे रूम मालकाने लावा असं सांगितले होते, त्यामुळे त्यांचे फ्लॅट घेताना पैसे तसेच कमी घेतले होते.
सुधीरची १४ वर्षांची मुलगी चिनू ही शाळेतून आल्यावर नेहमी त्या खिडकीवर बसून जेवत असे. चिनूची आई सुनीता हिने तिला अनेक वेळा सांगितलं होतं की, ‘तिथे बसत जाऊ नको ज्यावेळी आपण ग्रिल लावू त्यावेळी तिथे बस.’ एक दिवस शाळेतून आल्यावर नेहमीप्रमाणे ती तिथे जेवायला बसली आणि घरातील डॉगी तिला प्राण्यांच्या भाषेत सांगत होता की, तिथे बसू नको. त्यामुळे चिनूला त्याचा राग आला म्हणून गमतीने तिने त्याला मारण्याची ॲक्शन केली, मागे जाऊन पुढे होण्याचा प्रयत्न केला तेही त्या ग्रिल नसलेल्या खिडकीवर बसून आणि त्याच वेळी तिचा बॅलन्स गेल्यामुळे ती खिडकीतून चौथ्या मजल्यावरून खाली गडगडत पडली. चौथ्या मजल्यावर असल्यामुळे तळमजल्यापर्यंत येण्यापर्यंत अनेक लोकांनी आपल्या खिडक्यांना ग्रिल लावलेले होते आणि पुढे पत्र्याचे छप्पर केले होते. या प्रत्येक तिसऱ्या माळ्यापर्यंत ती या पत्र्यांना व ग्रिलला आपटत खाली पडली. सर्वजण धावत खाली आले आणि तिला तातडीने दवाखान्यात नेण्यात आलं. तोपर्यंत ती व्यवस्थित बोलत होती तिने स्वतःहून आपल्या आईला सांगितलं की, डॉगी मला भू भू करत होता, तिथे बसू नको म्हणून सांगत होता, म्हणून मी त्याला गमतीने मारायला गेले आणि माझा बॅलन्स गेला. त्या प्राण्याला कळत होतं की ते बसणं धोकादायक आहे पण तिला ते कळत नव्हतं. तिला शरीरावर कुठे एवढ्या जास्त जखमा जाणवत नव्हत्या, पण डॉक्टरांनी तिला इंटरनल ब्लीडिंग झालेलं होतं आणि तिच्या शरीरातल्या नसा आपटत आल्यामुळे फाटल्या होत्या असं सांगितलं. वाचण्याची जास्त गॅरंटी नाही असं डॉक्टरांनी तिच्या आई-वडिलांना सांगितले.
अपघातानंतर चिनू एक दिवस पूर्ण आपल्या आईशी बोलत होती आणि दुसऱ्या दिवशी जी कोमात गेली ती परत बाहेर आलीच नाही. ज्या गोष्टीला तिचे आई-वडील मनाई करत होते, तीच गोष्ट आज तिला या जगातून घेऊन गेली होती. चूक नेमकी कोणाची होती? नातेवाइकांनी अनेकदा सुधीरला सांगितलं की, ग्रिल लावून घे. पण कामाच्या व्यापामुळे ग्रिल लावण्याकडे त्याने दुर्लक्ष केलं. पैसे नाही, वेळ नाही अशी कारण त्यांनी पुढे केली. दुर्लक्ष केल्यामुळे लेकीचा बळी नवीन घरात गेलेला होता. आपण छोट्या-छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. पण त्या छोट्या गोष्टी फार मोठ्या होऊन जातात, हे एखादी घटना घडल्यावर आपल्याला कळते. सुधीर नातेवाइकांकडूनही पैसा जमा करून ग्रिल लावू शकला असता किंवा कामातून थोडे वेळ घेऊन ते काम करू शकला असता. पण जे त्याला जमत होते ते केलं नाही आणि त्यामुळे आज त्याची लेक त्याच्यापासून फार दूर गेली आहे. कायमची… (सत्यघटनेवर आधारित)