- मनस्विनी : पूर्णिमा शिंदे
वाचाल तर वाचाल, वाचाल तर टिकाल. वाचनामुळे आपल्याला शक्ती, सामर्थ्य, प्रगल्भता लाभते. निर्णयक्षमता येते. आज धकाधकीच्या काळात माणसं वाचतच नाहीत, तर काहींना वाचनाची गोडी असते, आपले मन वाचनात गुंतल्यामुळे अनेक चिंता हळूहळू कमी होऊन आपणास दुःख, संकटे, निराशा यावर मात करता येते. मनोबल वाढते. मनोधैर्य वाढते, आत्मविश्वास येतो आणि आपल्या चेहऱ्यावर एक विशिष्ट प्रकारचे तेज येते. जीवनाकडे पाहण्याची आपली दृष्टी निकोप व दयाळू होते, ती कणव आपल्यामध्ये निर्माण होते. संवेदनशीलता निर्माण होते. सजगता, सर्जनशीलता आणि संवेदनशीलतेमुळे माणूस हा “माणूस” ठरतो. आपल्या संसारात प्रपंचात आयुष्यात जीवनात रोज येणाऱ्या अडचणी, अनंत समस्या यातून आपल्याला सुदृढ मन ठेवायचे असेल, तर आजूबाजूच्या प्रतिकूल परिस्थितीचा मनावर कोणताही प्रकार परिणाम होणार नाही, मानसिकता संतुलन बिघडणार नाही, यासाठी वाचनाचे मोल अत्यंत अनन्यसाधारण आहे.
पुस्तक काय देतात? निळं आकाश, निळं पाणी, हिरवं झाड, लाल फुलं इंद्रधनूची कालची-आजची, उद्याची युगायुगांची तसेच सुख-दुःख, यश-अपयश, चढ-उतारांची भौतिक विकासाचे माध्यम ज्ञानलालसा प्राप्ती आणि समाज प्रबोधनाचे कार्य पुस्तके करतात. ऐतिहासिक नोंदी सण, उत्सव, सणावळी, ज्ञान, माहिती यांचे संकलन, मनोरंजन तसेच भविष्य, भूतकाळ, वर्तमानकाळ या सगळ्यांमध्ये टिकून राहण्याची ताकद आणि सामर्थ्य पुस्तक देतात. निळं पाणी, निळं आकाश, हिरवं झाड, लाल फुलं यांची माहिती गेलेले क्षणांची वाहून गेलेल्या घटनांची घडून गेलेल्या वेळेची माहिती पुस्तक देतात. ग्रंथ हेच गुरू. स्वसामर्थ्य, निर्णयशक्ती, वैचारिक प्रगल्भता आणि परिपक्वता वाचनातून लाभते आणि व्यक्तिमत्त्व असाधारण होतं. शब्दभांडार, साहित्य विषयीची गोडी वाढते.
जसे पूर्वी गुरुकुल पद्धती होती. गुरूच्या घरी जाऊन शिक्षण, परंपरा, संस्कृती, जोपासना अध्ययन केले जायचे. आता मात्र ही पद्धती राहिली नाही आणि म्हणून आपण काय वाचतो, आपल्याला काय आवडते व श्रम घेण्याची आजकाल तयारी नष्ट होत चाललेली आहे. उदाहरणार्थ एखाद्या कार्यक्रमाचे निवेदन करायचं असेल, तर खूप सारी पुस्तके वाचावीच लागतात. व्याख्यान द्यायचं असेल, तर खूप सारा अभ्यास करावा लागतो. पण जर आपण वाचलेच नाही, तर जसे एखाद्या गाडीमध्ये पेट्रोल नसेल, तर ती गाडी पुढे चालणार नाही. तसे एखाद्या वक्त्याचे वाचन कमी असेल, तर त्याचे टॉनिक नसल्याने ते कोलमडून पडेल, त्याला बोलता येणार नाही, बोलायला शब्दभांडार सुचणार नाही आणि म्हणून वाचनासाठी दिवसातून दोन-अडीच तास एखादे ग्रंथालय, शांततेचे ठिकाण, झाडाखाली, पाराखाली किंवा घरातील एका सुंदर अशी शांत वातावरणातील खोली बघून आपलं वाचन रोज चालू ठेवावं. रोजच्या रोज नित्य नियमाने नवीन काहीतरी वाचण्याचा प्रयत्न असावा. विविध वर्तमानपत्रे, बोधकथा, कादंबरी, काव्यसंग्रह इतकेच काय छोटी-मोठी कोडी सोडवण्यामध्ये सुद्धा वाचनाचा अतिशय उपयोग होतो. चार माणसांत बोलायला उठवल्यानंतर आपलं मत मांडत असताना, आपल्याला शब्द सुचतात ते मांडण्याचे धैर्य प्राप्त होतं आणि आपण बोलू शकतो त्यासाठी वाचन महत्त्वपूर्ण आहे आणि म्हणूनच म्हटले आहे वाचाल, तर टिकाल.
कोणतीही पुस्तक हातात आल्यानंतर लगेच वाचून काढले भराभर आणि त्यातून आपण आपली एक स्वतंत्र डायरी आणि त्या डायरीमध्ये आवडलेल्या नोंदी करून ठेवणे त्या पुस्तकातील कोणती गोष्ट कोणता प्रसंग अविस्मरणीय वाटला, आवडला आणि का आवडला? तसे एक साधारण संदर्भ आणि ते पुस्तक वाचल्याची तारीख त्या नोंदीला असली पाहिजे. आपले स्वतंत्र असे घरात जागा असेल तिथे ग्रंथालय असले पाहिजे. काही संग्रही पुस्तकं ठेवण्यासाठी असतात. अनेक ठिकाणी आपण व्याख्यानासाठी जातो किंवा ज्ञानदानासाठी पवित्र कार्य करणाऱ्या गुरूंनादेखील पुस्तक ही वेळोवेळी दाखले देण्यासाठी दृष्टांत कथा, बोधकथा, सुभाषिते, सुविचार, काव्यपंक्ती यासाठी अत्यंत मोलाची आहेत.
आपण दिवसातून अनेक वेळ व्हाॅट्सअॅप उघडतो. टीव्ही सीरियल पाहतो, गप्पा मारतो. पण जसं आपल्याला अवगत असलेल्या भाषेमध्ये जर आपण आपलं वाचन निरंतर अखंड सुरू ठेवले, तर त्याचा लाभ आपला आपल्यालाच होतो. ही जी विद्या आहे, वाचन, मनन, चिंतन या कला आपल्यातून कोणीही चोरू शकत नाही. भविष्यात निश्चितच त्याचा लाभ होतो. निबंधकला, वक्तृत्वकला, संवाद, संभाषण, निवेदनशैली यासाठीदेखील वाचन महत्त्वाचे आहे. या सर्वच व्यक्तिमत्त्व विकासाच्या प्रकाशवाटा आहेत.