नॉस्टॅल्जिया: श्रीनिवास बेलसरे
‘कही दिन कही रात’ हा दर्शन सभरवाल यांचे लेखन आणि दिग्दर्शन असलेला १९६८ सालचा चित्रपट. कलाकार होते विश्वजीत, सपना, प्राण, नादिरा, हेलन आणि मोहन चोटी. एक सी.आय.डी. इन्स्पेक्टर सूरज (विश्वजीत) तस्करांना पकडण्यासाठी वेश बदलून त्यांच्या टोळीत शिरतो. आपण पॅरिसला राहतो आणि वर्षभरातून केवळ दोनदा भारतात येतो असा बहाणा तो करतो. मात्र टोळीत सामील झाल्यावर त्याच्या लक्षात येते की, त्याची कॉलेजमधील प्रेयसी पूनम (सपना) त्या टोळीची सदस्य बनली आहे. उलट टोळीतील दुसरी तरुणी-हेलन त्याच्या प्रेमात पडते. एक दिवस सपना आणि विश्वजितमधील त्यांचे जुने प्रेम स्पष्ट करणारे संवाद हेलनच्या कानावर पडतात. ते ऐकून ती खूप उदास होते. तरीही त्याला त्याच्या मिशनमध्ये मदत करण्याचे सोडत नाही.
सूरज यशस्वी व्हावा म्हणून त्याच्यावर जीव टाकणारी हेलेन शेवटच्या सीनमध्ये स्वत:चे बलिदान करते, तो मिशनमध्ये यशस्वी होतो आणि शेवटी त्याचे लग्न सपनाशी पार पडते. या नाट्यमय घटनांचा सिनेमा म्हणजे ‘कहीं दिन कहीं रात!’ सिनेमात भरपूर कारस्थाने, चवीला म्हणून टाकलेले जॉनी वॉकरचे दारूचे व्यसन त्याचे विजोड प्रेमप्रकरण असा मसाला टाकण्यात आला होता. शेवटी अशा रहस्यकथात असतात तशा भरपूर मारपीट, हाणामाऱ्याही होत्या. सपना या सुंदर अभिनेत्रीचा हा पहिला चित्रपट. या चित्रपटात आणताना पदार्पणालाच तिला ‘ड्रीमगर्ल’ म्हटले गेले होते. मात्र तिची कारकीर्द दोन सिनेमांतच संपली. ‘कहीं दिन कहीं रात’(१९६८) आणि ‘पुरस्कार’(१९७०) हे तिचे दोनच चित्रपट ठरले. मग पुढे कित्येक वर्षांनी ही पदवी हेमामालिनीला देण्यात आली.
जेव्हा कॉलेजात असताना सूरज (विश्वजीत) आणि पूनमचे (सपना) प्रेम भरात असते तेव्हाचे त्यांच्या तोंडी असलेले एक गाणे मोठे सुंदर होते. शमशूल हुदा बिहारी यांनी या गाण्यात प्रेमात बुडालेल्या प्रत्येक प्रियकराची सार्वत्रिक भावना नि:संकोचपणे मांडली होती. ओमप्रसाद नैयर अर्थात ओ. पी. नैयर यांनी त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने गाण्याला ठेकेदार संगीत देऊन त्याची गोडी वाढवली होती. त्यात महेंद्रकपूरचा पहाडी, दमदार आवाज आणि आशाताईंचा नितळ नाजूक आवाज यामुळे गाणे श्रवणीय झाले. यौवनात आपण जिच्यावर प्रेम करतो ती आपली व्हावी ही अगदीच नैसर्गिक प्रेरणा असते. पण त्यावेळी प्रेमाचा ‘जुनून’ म्हणजेच उन्माद, इतका असतो की आपल्या प्रेमपात्राच्या जवळ इतर कुणी फिरकूही नये असेही वाटत असते! ती पझेसिव्हनेसची भावना अलीकडे समाजाच्या बदललेल्या मानसिकतेमुळे बरीच कमी झाली आहे. अर्ध्या शतकापूर्वी मात्र ती तीव्र होती, समाजमान्य होती. एस. एच. बिहारी यांनी तीच खुलवून हे गाणे लिहिले होते.
सूरज आपल्या प्रेयसीला म्हणतोय, या जगात तुझी अभिलाषा धरणारा माझ्याशिवाय दुसरा कुणीही असूच नये. तुझे नाव जरी कुणाच्या ओठावर आले तरी मला सहन होत नाही. इतकेच काय, उद्या आरशाने जरी तुझ्या रूपाची स्तुती केली तरी मी तो फोडून टाकेन असे मला वाटते. प्रिये, तुझ्या अदांमुळे कुणी तुझ्यावर मोहीत झाले तरी मला ते मुळीच सहन होणार नाही!
तुम्हारा चाहनेवाला खुदाकी दुनियामें,
मेरेसिवा भी कोई और हो खुदा न करे…
ये बात कैसे गवारा करेगा दिल मेरा,
तुम्हारा ज़िक्र किसी औरकी ज़ुबानपे हो,
तुम्हारे हुस्नकी तारीफ आईना भी करे,
तो मैं तुम्हारी क़सम है के तोड़ दूँ उसको…
तुम्हारे प्यार, तुम्हारी अदाका दीवाना,
मेरेसिवा भी कोई और हो खुदा न करे…
तुम्हारा चाहनेवाला…
प्रेमात आकंठ बुडालेल्या मनाला त्याक्षणी पुढच्या सर्व क्षणांची शाश्वतीच हवी असते! जवळजवळ अमरत्वच हवे असते म्हणा ना! म्हणून त्याचे अधीर मन आताच सगळे वचनात, शपथेत बांधून टाकायला बघत असते. तो म्हणतो, असा दिवस कधीही न येवो जेव्हा आपल्यात अंतर पडेल आणि तू दुसऱ्या कुणाचा आधार शोधू लागशील. आधारासाठी कुणातरी परक्याच्या खांद्यावर तू डोके टेकवावेस असे कधीही न घडो. आयुष्यात कोणत्याही परिस्थितीत, तुझ्या हृदयाच्या जवळ फक्त मलाच प्रवेश असावा. माझ्याशिवाय कुणालाही तिथे जवळपासही फिरकता येऊ नये.
वो दिन न आये के मुझसे कभी जुदा होकर,
किसीका प्यार दोबारा कही तलाश करो,
झुकाके सरको किसी अजनबीके शानोपर,
तुम अपने गमका सहारा कही तलाश करो,
करीब दिलके तुम्हारे किसी भी हालतमें, मेरे सिवा भी कोई और हो खुदा न करे…
तुम्हारा चाहनेवाला…
व्यवहारात या भावना कितीही अवास्तव वाटल्या तरी प्रेमात असताना प्रत्येकालाच त्या कधीतरी उत्कटपणे जाणवलेल्या असतात. त्यालाही आणि तिलाही! पूनमला मात्र स्वत:बद्दल खात्री आहे. ती उत्तरात प्रियकराला आश्वस्त करते. खात्री देतानाच ती म्हणते, ‘तुझ्या मनाला थोडाही त्रास मी कधीच होऊ देणार नाही. माझ्या माझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे. उद्या तुझेच प्रेम कधी आटून न जावो एवढीच माझी इच्छा आहे. देवाच्या या जगात माझ्याशिवाय तुझे कुणीच जवळचे असू नये असेच मलाही वाटते.
तुम्हारे दिलको कभी मुझसे कोई ठेस लगे,
मुझे यकीं है ऐसा कभी नहीं होगा,
मुझे वफाओपे अपनी बड़ा भरोसा है,
तुम्हारा प्यारही दे जाये न कही धोखा,
दुआ ये है के तुम्हारा खुदाकी दुनियामें,
मेरे सिवा भी कोई और हो खुदा न करे…
तुम्हारा चाहनेवाला…
प्रेमाचे किती साधेसरळ निवेदन! उत्कट भावनांची निर्मळ, थेट आणि प्रांजळ अभिव्यक्ती! हेच तर जुन्या सिनेमाचे, जुन्या गाण्यांचे वैशिष्ट्य होते. स्त्री-पुरुष समानता, स्त्रियांचे व्यक्तीस्वातंत्र्य, प्रत्येकाची व्यक्तिगत स्पेस, प्रायव्हसी या संकल्पना रूढ होण्याच्या आधीचा काळ! त्या काळी या प्रागतिक, आधुनिक संकल्पना जरी प्रचलित नव्हत्या तरी स्त्रीपुरुषातील परस्परप्रेमाची परिणीती फक्त आयुष्यभर टिकणाऱ्या विवाहात होते असे मानले जाई. प्रेमाच्या चिरंतनतेवर श्रद्धा होती. आणि त्यासाठी आवश्यक असणारे उभयपक्षी, बावनकशी शुद्ध प्रेम, प्रत्येक संबधात गृहीत धरलेले असायचे. बहुतेक साहित्याचा आणि कलानिर्मितीचा तो आधार होता. त्यामुळे मनाला उगाच अस्वस्थ आणि निराश न करता, मानवी नात्यांच्या टिकाऊपणाच्या दर्शनातून, माणसाला आश्वस्त करणाऱ्या कलाकृती निर्माण होत असत.