संवाद: गुरुनाथ तेंडुलकर
लहानपणी ऐकलेली एक कथा…
एकदा एक सौदागर हत्ती घेऊन एका खेडेगावात गेला आणि त्यानं जोर जोरात ओरडायला सुरुवात केली, “हत्ती विकणे आहे… हत्ती विकणे आहे….” गाव तसं लहानसंच होतं. आडवळणाचं, मागासलेलं. शेती, पशूपालन आणि डोंगरावरच्या झाडपाल्यापासून मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नवर गुजराण करणारी दहा-वीस घरं, शाळा नाही. शिक्षण नाही. आधुनिक जगातले संस्कार नाहीत. देवाजीच्या कृपेनं आलेला दिवस ढकलायचा ही वृत्ती त्यामुळे बाहेरच्या जगाशी फारसा संबंध नाही. अशा गावात एक सौदागर हत्ती विकायला घेऊन गेला आणि ओरडू लागला, “हत्ती विकणे आहे… हत्ती विकणे आहे.” त्या गावात हत्ती कुणी कधी पाहिलाच नव्हता. पोरं-टोरं, बाया-बापड्या, म्हातारे-कोतारे सगळी माणसं हांहां म्हणता त्तीभोवती गोळा झाली. कुणीतरी धिटाईनं विचारलं, “दादा… कोणता हो हा प्राणी?”
“याला हत्ती म्हणतात.” सौदागरानं उत्तर दिलं.
पारटोरांत चुळबुळ सुरु झाली होती.
“केवढा मोठ्ठा आहे नाही?”
“अगदी ढगाऐवढा….”
“ह्याला बांधायला गोठा केवढा मोठा हवा
नाही का?”
“हो नं. आपल्या गायीच्या गोठ्यात तर हा शिरणार सुद्धा नाही.”
माणसं आपापसात चर्चा करत होती. बायाबापड्या तोंडाला पदर लावून आश्चर्यानं त्या अवाढव्य धूडाकडे डोळे विस्फारून पहात होत्या. म्हातारे कोतारे आपल्या उभ्या आयुष्यात असलं काही पहायला मिळालं नाही ते आता पाहायला मिळालं म्हणून खूश झाले होते. तरुण, प्रौढ, संसारी मंडळी या प्राण्याचा आपल्या संसाराच्या दृष्टीनं काही उपयोग होऊ शकेल का? याचा विचार करीत होते. हत्ती चालत होता. झुलत होता. सोंडेनं आजूबाजूची छोटी छोटी झाडं उपटून पाला खात होता. सौदागर हत्तीसाठी गिऱ्हाईक शोधत होता. हत्ती हळूहळू पुढंपुढं सरकत होता. डुलत डुलत चालत होता. शेवटी देवळाजवळ येऊन सौदागर थांबला आणि म्हणाला, “हा हत्ती विकायचा आहे.” उपस्थितांपैकी कुणीतरी पुढं होऊन दबक्या आवाजात विचारलं, “काय असेल हो या प्राण्याची किंमत?” “फक्त दहा हजार रुपये.” सौदागरानं उत्तर दिलं. “अत्यंत शुभलक्षणी आणि गुणवान हत्ती आहे हा… किंमत फक्त दहा हजार रुपये….”
उपस्थितांत एकच खुसफुस सुरू झाली.
“अबब… दहा हजार रुपये…?”
एवढ्या किमतीत कमीत कमी पंधरा-वीस चांगले बैल विकत घेता येतील, साधारण आठ-दहा दुभत्या गायी मिळतील… कोंबड्या तर… लोकांनी मनातल्या मनात हिशोब मांडायला सुरुवात केली.
“छे, बुवा नकोच हा प्राणी आपल्याला.” एक माणूस स्वतःशीच पुटपुटला
“मला पण नको.” दुसऱ्यानं री ओढली.
“पण काय हो या एवढ्या मोठ्या प्राण्याचा उपयोग तो काय?” कुणीतरी विचारलं
सौदागर थोडासा गडबडला. “अं. अं. याचा उपयोग म्हणजे… म्हणजे…”
कुणीतरी धीटपणे त्या सौदागराला विचारलं, “तसं नाही पण या जनावराचा… काय नाव म्हणालात तुम्ही… ?”
“हत्ती.”
“हां. तर या हत्तीचा नेमका उपयोग काय? हा दूध देतो का?”
“नाही हा दूध नाही देत.” सौदागर उत्तरला.
“बरं. मग याला नांगराला बांधून शेती करता येईल का?”
“नाही याला नांगराला नाही बांधता येणार.” सौदागर म्हणाला.
“बरं, हा एकावेळी किती अंडी देतो?” कोंबड्या पाळून अंड्यांचा धंदा करणाऱ्या एका म्हातारीनं विचारलं.
“नाही. हा अंडी नाही देत…” सौदागराचं उत्तर.
“काय? हा अंडी देत नाही? मरू देत मग…” हत्ती अंडी देत नाही हे समजल्यानंतर त्या म्हातारीच्या दृष्टीनं हत्तीचा उपयोग शून्य होता.
लोकांच्या आपापसात चर्चेला सुरुवात झाली. या प्राण्याचा उपयोग काय? हा गाईसारखा हा दूध देत नाही. बैलासारखा हा नांगराला जुंपता येत नाही. घोड्यासारखा याला गाडीला बांधता येणार नाही. गाढवासारखं याच्या पाठीवर ओझं लादता येणार नाही. कोंबडीसारखा हा अंडी देत नाही. बकऱ्यासारखी याला लोकर नाही. कुत्र्यासारखा हा घराची राखण करायला उपयोगी पडेल म्हणावं तर तेही शक्य नाही… कारण ह्याला भुंकता येत नाही.
“याला एकावेळी खायला किती अन्न लागेल?”
“याचं शेण काढायचं तर एक गडी हवा.”
“याला गोठ्यात बांधता येणार नाही. म्हणजे याच्यासाठी वेगळी सोय करायला हवी.”
“ह्याचं धूड एवढं मोठं आहे की जर कधी चुकून याच्या पायाखाली एखादं रांगतं पोर आलं तर….”
“छे, हा प्राणी खरंतर काहीच उपयोगाचा नाही. उलट याचा त्रासच जास्त…”
“आणि एवढ्या निरुपयोगी आणि उपद्रवी प्राण्याची किंमत दहा हजार रुपये? कोण घेणार?”
सगळ्या गावकऱ्यांनी तो त्यांच्या दृष्टीनं निरुपयोगी प्राणी डोळे भरून पाहिला. तोंड भरून टीका केली आणि आपापल्या
कामाला गेले. सौदागराचा हत्ती त्या गावात काही विकला गेला नाही. तो तिथं विकला जाणंच शक्य नव्हतं. निराश झालेला तो सौदागर पुढे चालू लागला. दुसऱ्या गावी…हत्ती विकायचा असेल, तर एखाद्या राजवाड्यातच जायला हवं. एखादा श्रीमंत राजाच त्या हत्तीचं योग्य मोल करील आणि असलं उमदं रत्न आपल्या पदरी हवंच म्हणून थोडी अधिक किंमत देऊनही विकत घेईल. सौदागर मूर्ख. राजवाड्यात न जाता गावोगावी हिंडत होता…
आपणदेखील अनेकदा त्या मूर्ख सौदागराप्रमाणेच नाही का वागत? “हत्ती” घेऊन गावोगाव नाही का हिंडत? राजवाड्यात जाऊन राजाला न भेटता आडगावच्या खेडूतांना नाही का भेटत? आणि परिणाम… आपला “हत्ती” विकला तर जात नाहीच पण उलट टीका मात्र ऐकून घ्यावी लागते. आपल्या उत्कृष्ट कलाकृती, आपले उत्कट विचार, आपल्या अलौकीक कल्पना नको त्या लोकांपुढे मांडल्या, तर असंच होतं. गुणांचं चीज व्हायला गुणग्राही माणसंच समोर असावी लागतात. रसिक कलाप्रेमी मंडळी समोर असली, तरच कलेचं कौतुक होतं. उच्च विचार पटण्याकरता ज्याच्यासमोर ते विचार प्रकट करतो ते लोक विद्वान असणं गरजेचं असतं. नाहीतर… नाहीतर आपलं हसं होतं…
दोष हसणाऱ्या लोकांचा नसतो. त्यांची बिचाऱ्यांची कुवतच नसते. एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे त्यांच्या बुद्धीची झेपच जाऊ शकत नाही त्यात त्यांचा काय दोष? सामान्य माणसांच्या कल्पनांची क्षितीजं सामान्यच असतात. त्यांच्या विचार करण्याला मर्यादा असते. स्वतःभोवती कुंपण निर्माण केलेलं असतं त्या कुंपणाच्या बाहेर ते पडूच शकत नाहीत. दोष त्यांचा नसतो. त्यांच्यावर परिस्थितीमुळं जे संस्कार झालेले असतात, त्यानुसार ते विचार करतात. पण अशा वेळी अशा अतिसामान्य बुद्धीच्या लोकांसमोर आपली कला सादर करणाऱ्या कलावंताचं मन मात्र योग्य दाद न मिळाल्यामुळं उद्विग्न होतं. विद्वान मंडळी आपल्या विद्वत्तेचं चीज न झाल्यामुळं निराश होतात. गुणी मंडळी गुणांची योग्य कदर न झाल्यामुळं खट्टू होतात. स्वतःवरच संतापतात. अनेक शास्त्रज्ञ आपले प्रयोग अर्धवट सोडतात. अशावेळी मन उदास होतं, हताश होतं. पण… पण यात दोष कुणाचा? सामान्य बुद्धीच्या लोकांचा? की त्या सामान्यांसमोर आपली असामान्य बुद्धी प्रकट करणाऱ्याचा? कृष्णशास्त्री चिपणूणकर अशा वेळी आपल्या अन्योक्तीतून कोकीळेला उद्देशून म्हणतात.
येथे समस्त बहिरे वसताती लोक।
कां भाषणे मधुर तू करिसी अनेक॥
हे मूर्ख यांस किमपिही नसे विवेक।
वर्णावरून तुजला गणतील काक॥
कोकिळेस उद्देशून कवी म्हणतात, अरे बाबा… ही बहिऱ्या माणसांची वसाहत आहे. इथं तू तुझा गोड आवाज कुणाला ऐकू येणार? तू उगाचच घसाफोड कां करतोस? हे लोक बहिरे आहेत. तुझा मधूर ध्वनी यांच्या कानी पडला तरी ऐकू येणार नाही. उलट तुझ्या रंगावरून हे लोक तुला कावळा समजून हाकलून देतील… जिथं कदर होईल, तिथंच कला सादर करावी. जिथं गुणांचं कौतुक होईल तिथंच त्यांचं प्रकटीकरण करावं. व्यासंगी वक्त्यानं आपले विचार अशाच ठिकाणी मांडावेत जिथं ते विचार समजून घेण्याची कुवत असणारा श्रोतृवर्ग असेल. अन्यथा… अन्यथा हत्ती विकणे आहे म्हणून ओरडत गावोगावी वणवण करणाऱ्या त्या सौदागरासारखी अवस्था होते. हत्ती तर विकला जात नाहीच, उलट टीका मात्र ऐकून घ्यावी लागते.