Sunday, July 14, 2024
Homeसाप्ताहिककोलाजदत्तजयंती : गिरनार पर्वत

दत्तजयंती : गिरनार पर्वत

गुलदस्ता: मृणालिनी कुलकर्णी

‘जय श्री गुरुदेव दत्त’! मार्गशीर्ष पौर्णिमेला मृग नक्षत्रावर सायंकाळी श्री दत्ताचा जन्म बद्रिकाश्रमात झाला. २६ डिसेंबर २०२३ : दत्त जयंती! महर्षी ऋषी अत्री व पत्नी अनुसयाने केलेल्या हजारो वर्षांच्या तपोत्सवाचे फळ श्री दत्त! दत्ताच्या पाठीमागे असलेला औदंबर वृक्ष हे दत्ताचे पूजनीय रूप, गाय म्हणजे पृथ्वी, चार श्वान म्हणजे चार वेद, गाय आणि कुत्रे ही दत्ताची अस्त्रे! दत्ताचा जन्मोत्सव भजन-कीर्तन, गुरुचरित्राचे सामूहिकरीत्या पारायण, सुंठवड्याचा प्रसादाने देशभर मुख्यतः महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.  दत्त म्हणजे निर्गुणाची अनुभूती. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवाचे मिळून एक सुंदर रूप म्हणजे श्रीदत्त. हातातील कमंडलू व जपमाळ ब्रह्मदेवाचे, शंख आणि चक्र विष्णूचे, त्रिशूळ व डमरू शंकराचे प्रतीक आहे. दत्तात्रेय हा विष्णूचा अवतार. पृथ्वीवर सूक्ष्म स्वरूपात असणाऱ्या असुरी शक्तीला नष्ट करण्यासाठी ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या रूपांत, दत्ताला अवतार घ्यावा लागला. त्यानंतर दैत्य नष्ट झाले. तो दिवस दत्त जयंती.

दत्त+अत्रेय = दत्तात्रेय! दत्त या शब्दाचा अर्थ ‘जे दिले जाते ते’! श्रीदत्त हे महान योगी, अतिशय प्राचीन शिक्षक, संपूर्ण विश्वाचे पहिले गुरू, हिंदू धर्मात त्यांना देव मानतात. हिंदू धर्माचा प्रसार करण्याच्या उद्देशाने दत्तात्रयाने भारतभर भ्रमण केले. स्वधर्म, स्वसंस्कृती, संकटग्रस्तांची जोपासना करण्याचे काम दत्त संप्रदाय करतो. चराचरांत प्रत्येक वस्तूमध्ये ईश्वराचा अंश आहे, प्रत्येकाकडून काहीतरी शिकण्यासारखे आहे, ह्या विचाराने श्री दत्ताने २४ गुरू केले. श्रीदत्त अतिशय प्रेमळ, दयाळू, आणि लगेच प्रसन्न होणारे दैवत आहे. महाराष्ट्रात दत्ताच्या औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर, पिठापूर, कुरवपूर, अक्कलकोट आणि गिरनार पर्वत या स्थांनांना विशेष महत्त्व आहे. श्रीक्षेत्र गिरनार पर्वत – श्रीदत्तप्रभूंचे अक्षय निवास्थान! या ठिकाणी दत्तात्रेयांनी १२००० वर्षे तपश्चर्या केली नि ते अंतर्धान पावले. तेव्हा तेथे उमटलेल्या श्रीदत्तप्रभूंच्या स्वयंभू चरणपादुका, भगवान श्रीदत्ताच्या वास्तव्याने पावन झालेली आणि ३३ कोटी देवतांचा वास असलेला श्रीक्षेत्र गिरनार पर्वत. गिरनार म्हणजे गिरिनारायण किंवा रेवतक पर्वत. गिरनार हा पर्वताचा समूह असून उंच, सर्वात प्राचीन आणि पवित्र स्थान आहे. भारताच्या गुजराथ राज्यांत सौराष्ट्रांत, जुनागढात असून, राहण्यासाठी अनेक धर्मशाळा आहेत.

गिरनार पर्वताचे वैशिष्ट्य –
१. श्री दत्त महाराजांच्या चरण
पादुका (गुरुशिखर)
२. कमंडल कुंड
३. गोरक्षनाथ मंदिर
४. अंबामाता मंदिर
५. नेमिनाथ मंदिर
६. गिर जंगल
गिर जंगलांनी वेढलेला गिरनार पर्वताच्या पायथ्याशी (तलेटी) येथून दत्तदर्शनच्या दहा हजार पायऱ्या चढण्याआधी, सारे शक्तिशाली लंबे हनुमानाचे, भावनाथ मंदिरातील शंकराचे दर्शन घेऊन पहिल्या पायरीवर नारळ फोडून नतमस्तक होत दत्तमहाराजांना शरण जात प्रार्थना करतात, “आम्हाला दहा हजार पायऱ्या चढण्याचे बळ दे.” पाणी, लिंबू सरबत, कानटोपी, टॉर्च, स्वतःची औषधे व चढण्यासाठी काठी विकत घेऊन, प्रत्येकजण चढायला सुरुवात करतो. वाटेत पाणी, सरबताचे स्टॉल आहेत.

श्रीदत्त दर्शनासाठी, पौर्णिमेच्या रात्री नियमितपणे गिरनार चढणारे अनेक भक्त आहेत. आपल्याला चढताना ते भेटतात. सुरुवातीच्या १५०० पायऱ्या चढायला जड जातात. सवय नसते. पायथ्याजवळील डोंगराळ भाग निरखत, आपल्यासारखेच इतर भक्तांशी, कोठून आलात ? असे संवाद साधत, श्रीदत्ताचे अनुभव शेअर करताना नकळत पायाचा वेग वाढतो. दत्ताचे नामस्मरण करीत, मध्ये मध्ये विश्रांती घेत, दत्त भेटीच्या ओढीने दत्तभक्त पायऱ्या चढत गुरू शिखरावर पोहोचतात. आम्ही चढताना डोंगराच्या कपारीजवळून सरपटणाऱ्या सापाचे चित्रीकरण केले. गिरनार तेलेटी ते अंबामाता मंदिर हे ५००० पायरीचे अंतर रोपवेमुळे आठ मिनिटांत पोहोचतो. रोपवेत बसण्याआधी बिसलेरी, लिम्का अशा प्लस्टिकच्या बाटल्या काढून घेतात. घरी पाण्यासाठी विकत घेतलेल्या बाटल्या चालतात. रोपवेच्या पायथ्याशी नि रोपवेच्या वरच्या थांब्यापाशी फक्त वॉशरूम आहे. यावर विचार व्हावा.

रोपवेतून जाताना, हिरव्या खुरट्या झुडपांनी वेढलेला पहाड, गिरनार चढणारे भक्त, दूरवरून दिसणारे गुरुशिखर, ४००० पायरीवरचा जैन मंदिराचा समूह पाहतो. जैन धर्मियांचे २२वे कीर्तनकार नेमिनाथ यांचे ते मोक्ष स्थळ. गिरनारच्या जंगलातून कार्तिकी एकादशी ते त्रिपुरी पौर्णिमा या कालावधीत गिरनार परिक्रमा असते. गिरनारच्या पहिला टप्पा ५००० पायरीवर स्थित असलेले अंबामाता मंदिर. विश्रांती, चहा-नाष्टासाठी मोकळी जागा. पार्वतीदेवीने आंबाच्या रूपात येथे वास्तव्य केले होते म्हणून हे मंदिर बांधले. गिरनारचा दुसरा टप्पा, ५८००पायरीवरील नवनाथांचे गुरू गोरक्षनाथच्या चरण पादुका असलेले मंदिर. गोरक्षनाथांनी येथे घोर तपश्चर्या केली होती. आजही त्यांचा तेथे वावर आहे असे मानतात. येथेच श्रीदत्तानी नवनाथांना गुरुमंत्र दिला होता. गोरक्षनाथांनी दत्तगुरूंकडे प्रार्थना केली, आपल्या चरणांचे दर्शन मला सतत व्हावे, या भक्ताच्या मागणीसाठी थोडा उंच असलेल्या गोरक्षनाथ मंदिरापासून दुरूनच गुरुशिखराचे दर्शन होते. काही भक्त येथूनच गुरुशिखराचे दर्शन घेऊन माघारी फिरतात.

गोरक्षनाथाच्या मंदिरापासून १२०० पायऱ्या खाली उतरताच दोनकमानी लागतात. एक पर्वत उतरून गुरुशिखर पर्वताच्या (१२००) थोड्याशा उभ्या पायऱ्या थांबत थांबत चढतो. ९९९९ पायऱ्या चढल्यानंतर दत्त महाराजांच्या गुरुशिखरवर येतो. पर्वतशिखराच्या समूहात, निसर्गाचे वरदान लाभलेल्या सुंदर वातावरणात, दत्त महाराजांची सुबक मूर्ती, भगवान दत्तात्रयांच्या चरणपादुकांना मनापासून नतमस्तक झाले. दत्तप्रभूंची इच्छा असल्याशिवाय कोणी गिरनारला जाऊ शकत नाही असे ऐकले होते ते मी अनुभवले. मनात इच्छा, ओढ, श्रद्धा असेल, तर श्रीदत्त कोणत्या ना कोणत्या रूपात दर्शन देतो. याचा अनुभव दर्शनाच्या इथेच डॉ. लता ससाणेंना मिळाला. श्रीदत्ताचे दर्शन म्हणजे आपल्याला मिळालेला आशीर्वाद हे उदय जोशी यांनी दोनदा अनुभवले. “दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन; मी-तू पणाची झाली बोळवण, एका जनार्दनीं श्रीदत्त ध्यान”…

कमानीच्या उजव्या बाजूला खाली कमलकुंड, येथे विनामूल्य अन्नछत्रांत प्रसादाचे जेवण दिले जाते. अन्नछत्रातील सेवकांना, डोली करताना वाद न घालता सेवेचा मोबदला द्यावा. कमलकुंडाचा एक तुकडा जेथे पडला त्या जागी गंगा प्रकटली. आजही तेथे पाणी आहे. दुसऱ्या तुकड्याच्या जागी काहीही न पेटवता अग्नी प्रकटला. आजही त्या धुनीत अग्निरूपांत साक्षात श्रीगुरुदेव प्रकटतात. गिरनारच्या १०,००० पायऱ्यांची भीती वाटण्याचे काहीच कारण नाही. सगळ्या पायऱ्या चांगल्या स्थितीत, रुंद, कमी उंचीच्या असून एका बाजूला डोंगर दुसऱ्या बाजूला आधारासाठी दगडी रुंद कठडा. दरीत पडण्याचा धोका नाही. कुठेही कितीही वेळ थांबू शकतो. जय गिरनारीची ललकारी, भक्तांची सकारत्मक भाषा प्रात्साहन देते. अभी थोडाही रहा हैं! आरामसे जाना! त्या आजीसुद्धा चढल्या बघ! “असे हे श्रीक्षेत्र गिरनार पर्वत; एक अप्रतिम संचित!”

mbk1801@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -