मायभाषा: डॉ. वीणा सानेकर
अंजली कीर्तने यांच्या जेमतेम दोन प्रत्यक्ष भेटी, पण तेवढ्या भेटींमध्ये ही विलक्षण संवेदनशील स्त्री मनाला भावली. दादर येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात मात्र हा चेहरा मी अनेकदा पाहिला नि तेव्हा तेव्हा त्यांच्या चमकदार तेजस्वी डोळ्यांनी मनावर ठसा उमटवला. संशोधक, व्यासंगी, सखोल अभ्यासातून लेखन, संदर्भांचा उचित शोध, त्याकरिता प्रवासाची तयारी, कलांवर आत्मीय प्रेम ही अंजली यांची वैशिष्ट्ये. त्यांनी कविता, चरित्र, प्रवासवर्णन, कादंबरी, व्यक्तिचित्र, ललितलेख अशा विविध साहित्य प्रकारांत लेखन केले. या वर्षी तर सोयरिक घराशी, आठवणींचा पायरव, षड्ज एकांताचा ही त्यांची ३ पुस्तके प्रकाशित झाली.
चरित्रपर लेखन करणे हे एक मोठे आव्हान असते, कारण चरित्रनायक वा नायिकेच्या आयुष्याचा आलेख उभा करताना संपूर्ण व्यक्तित्त्वाला भिडायचे असते. अंजली यांनी डॉ. आनंदीबाई जोशी : कालकर्तृत्व, बहुरूपिणी दुर्गा भागवत : चरित्र आणि चित्र, गानयोगी पं. द. वि. पलुस्कर ही तीन चरित्रे लिहिली. पहिली भारतीय महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचे, तर इंग्रजी चरित्रही त्यांनी लिहिले. बाराव्या वर्षापासूनच आनंदीबाई जोशी या व्यक्तिमत्त्वाने त्यांच्या मनावर मोहिनी घातली होती. परंपरेचा आदर नि बंडखोरी या दोन्ही गोष्टी आनंदीबाईंमध्ये होत्या. मुख्य म्हणजे त्यांच्या मनातली वैद्यक शिक्षण घेण्याची तीव्र ओढ!
ही तिन्ही व्यक्तिमत्त्वे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावीत म्हणून त्यांच्यावरील लघुपट निर्मितीचा ध्यास अंजली यांनी घेतला. त्याकरिता त्यांनी लघुपट निर्मितीचे तंत्र शिकून घेतले. मुलाखती, लेख, या संदर्भांचा अभ्यासपूर्ण शोध तर घेतलाच, पण प्रत्यक्ष स्थलांना भेटींकरिता प्रवासही केला. आनंदीबाईंवरील चरित्र लिहिताना अमेेरिकेत जाऊन संदर्भांचा शोध घेणे ही किती महत्त्वाची गोष्ट. अंजली यांंच्या आनंदीबाईंवरील लघुपटाची निवड बाल्टीमोर येथील मराठी अधिवेशनात झाली होती. दुर्गाबाई भागवत यांच्यासारख्या विदुषीचे, संशोधनकर्तीचे अंजलीबाईंना आकर्षण वाटणे, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घ्यावासा वाटणे हे स्वाभाविक होते, कारण त्यांच्या स्वभावधर्माची जातकुळी मिळतीजुळती होती. दुर्गाबाईंनी घेतलेला संस्कृतीसंचिताचा वेध, आणीबाणीच्या काळात घेतलेली भूमिका ही तर खूप महत्त्वाची होती. हिंदुस्थानी शास्त्रीय गायनशैलीतील प्रसिद्ध गायक द. वि. पलुस्कर यांच्यावरील लघुपट निर्मितीचे मोठे काम त्यांनी केले.
अंजली या कवयित्री पद्मिनी बिनीवाले यांच्या कन्या. लेखनाचा वसा त्यांनी आईकडूनच घेतला. हिरवी गाणी नि षड्ज एकांताचा या त्यांच्या दोन संग्रहातून त्यांचे कविता काव्यरसिकांसमोर आली.
प्रवासाच्या उपजत ओढीतून आठवणी प्रवासाच्या, पॅशन फ्लॉवर, ब्लॉसम ही पुस्तके साकारली. माझ्या मनाची रोजनिशी हे त्यांचे पुस्तक दैनंदिनी वा डायरी स्वरूपात, कादंबरीचा रूपबंध घेऊन समोर आले. अंजली यांचे कलांवर निस्सीम प्रेम होते. त्यांच्या लेखांतून अभिजात संगीताचे १८५० ते १९५० या काळातील सुवर्णयुग शब्दबद्ध झाले. भरतनाट्यम, सतार या कलांचे प्रशिक्षणही त्यांनी घेतले होते. मोलिएरचा मराठी नाटकांवर प्रभाव हा विषय त्यांनी पीएच.डी.करिता निवडला व पदवी संपादन केली. त्यांचा ‘सोयरीक घराशी’ या पुस्तकाचा विषय मनाला स्पर्शून गेला. घर हे आपला आधार नि विसाव्याचे स्थान असते. घराशी जुळलेल्या नात्याचा उत्कट व बहुस्तरीय शोध या पुस्तकातून उभा राहतो. साहित्य नि कलांमध्ये रमणाऱ्या, महनीय माणसांची चरित्रे पुढल्या पिढ्यांकरिता अजरामर करण्यासाठी धडपडणाऱ्या अंजली कीर्तने यांनी भौतिक जगाचा निरोप घेतला तरी त्यांच्यासारखी व्यक्तिमत्त्वे जगाकरिता चिरस्मरणीयच राहतात.