
बाकीच्यांचं खूप वर्षे ऐकलंत, आता माझं ऐका
अजितदादांचं नाव न घेता शरद पवारांवर टीकास्त्र
मुंबई : राष्ट्रवादी पक्षात (NCP) फूट पडल्यापासून अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार (Sharad Pawar) गटात सातत्याने आरोप प्रत्यारोप सुरु असतात. यातच आता अजितदादांनी शरद पवारांवर जोरदार टीकास्त्र उपसलं आहे. अजित पवार यांच्या उपस्थितीत बारामतीतील (Baramati) नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्यांचा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी बोलताना अजित पवारांनी नाव न घेता शरद पवारांना लक्ष्य केलं.
अजित पवार म्हणाले, “माझे विचार अतिशय स्पष्ट असतात. मी ६० वर्षांचा झाल्यावर वेगळी भूमिका घेतली. काहींनी ३८ व्या वर्षी वेगळी भूमिका घेतली होती. यशवंतराव चव्हाण यांचा याला विरोध होता. वसंतदादा पाटील हे चांगलं नेतृत्व होते. तरी त्यांना बाजूला करण्यात आलं आणि जनता पक्षाला बरोबर घेऊन सत्ता स्थापन करण्यात आली.”
पुढे ते म्हणाले, “याआधी ४० वर्षांच्या आतच वेगळे निर्णय घेण्यात आले. मी ६० वर्षांचा झाल्यावर वेगळा निर्णय घेतला. इथून पुढे फक्त माझं ऐका. बाकी कुणाचं ऐकू नका. बाकीच्यांचं खूप वर्षे झालं ऐकलं आहे. आता माझं ऐका,” अशी तंबी अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिली.
माझा निर्णय योग्य म्हणून आमदार माझ्याबरोबर
“माझ्याबरोबर विधानसभेतील ५३ पैकी ४३ आमदार आहेत. देवेंद्र भुयार आणि संजयमामा शिंदे या दोन अपक्ष आमदारांनीही पाठिंला दिला आहे. विधानपरिषदेतील ९ पैकी ६ आमदार माझ्याबरोबर आहेत. मी घेतलेला निर्णय योग्य असल्यानेच ही लोकं माझ्याबरोबर आली,” असं अजित पवार म्हणाले.