Monday, July 22, 2024
Homeसंपादकीयरविवार मंथन६० रुपयांपासून ३५ कोटींपर्यंतचा उद्योग

६० रुपयांपासून ३५ कोटींपर्यंतचा उद्योग

दी लेडी बॉस: अर्चना सोंडे

मुंबई ही मायानगरी आहे, असे म्हटले जाते. या शहरात जी व्यक्ती मोठ्ठं होण्याचं स्वप्न पाहते, ते स्वप्न साकार करण्यासाठी जीवाचं रान करते. तिला हे शहर कवेत घेत तिचं स्वप्न साकार करतं. कष्ट करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला हे शहर निराश करत नाही. अशा प्रकारचं जगातील हे एकमेव शहर असावं. त्या १५ वर्षांच्या घरातून पळून गेलेल्या चिमुरडीला या मुंबईने आपल्या कुशीत घेतले. तिला रोजगार मिळवून दिला. त्या मुलीनेसुद्धा प्रचंड कष्ट घेतले. प्रसंगी रेल्वे फलाटावर झोपली. ना आईची माया ना बापाची छाया. अशात परिस्थितीला शरण न जाता ती लढली, घडली. आज तिचा ३५ कोटी रुपयांची उलाढाल असलेला व्यवसाय आहे. ही मन हेलावणारी गोष्ट आहे, रूबन ॲक्सेसरीजच्या चिनू कालाची.

चिनू काला ही केवळ १५ वर्षांची होती. ती तिच्या वडिलांसोबत आणि सावत्र आईसोबत नालासोपाऱ्याला राहात असे. सावत्र आईची तिच्यासोबत वागणूक ही सावत्रपणाचीच होती. तिचे बाबासुद्धा तिच्या सावत्र आईचीच पाठराखण करायचे. खरं तर चिनूची आई ही सौदी अरेबिया देशात काम करत होती. मात्र आईसोबत तिचा काही संपर्कच होत नव्हता. खूप वेळा तिला वाटायचं की घर सोडून कुठं तरी निघून जावं. मात्र जाणार कुठे हा यक्षप्रश्न होताच. एके दिवशी चिनूचे तिच्या सावत्र आई आणि बाबांसोबत भांडण झाले. मन तुटून गेलेलं. शेवटी मनंच तुटलं असेल, तिथे थांबण्यात अर्थ तो काय… सातवीत शिकणारी चिनू मिळेल त्या ट्रेनने निघाली. खिशात होते फक्त ३०० रुपये. मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनवर आली. आजूबाजूला कोणी ओळखीचं नव्हतं. दोन दिवस तसेच तिने रेल्वे फलाटावर घालवले. दोन दिवसांत जवळचे पैसे होते ते सुद्धा संपायला आले. काय करावं, कुठे जावं काही सुचत नव्हतं. १५ वर्षांची चिनू एकटीच रडत बसायची. सुदैवाने तिला एक महिला भेटली. घरोघरी जाऊन कटलरी विकण्याच्या काही वस्तूंबद्दल तिने माहिती दिली. प्रत्येक वस्तूमागे कमिशन मिळणार होते. पण पगार नव्हता. काहीच नसण्यापेक्षा काहीतरी मिळेल या उद्देशाने चिनूने तो पर्याय स्वीकारला. सोबत एका छपराखाली झोपण्याची सोयही झाली. भाडं ठरलं प्रत्येक दिवसाचे २५ रुपये. खरं तर जागासुद्धा म्हणणं हास्यास्पद ठरलं असतं, कारण एका चटई पसरण्यापुरतं जागेचं भाडं होतं ते.

तिच्या सेल्सगर्ल म्हणून नोकरीचा किस्सा सुद्धा रंजक आहे. जेव्हा तिने पहिली दाराची बेल वाजवली, तेव्हा दार उघडणाऱ्या महिलेने तिच्या पिशवीकडे पाहिले आणि धाडकन दार तोंडावर आपटून चिनूला सरळ हाकलून दिलं. चिनू तीन तास त्या इमारतीखाली उभी राहून रडली. हार मानून घरी परत जाणे हा पर्याय मात्र तिला मान्य नव्हता. काहीही झालं तरी आपल्याला विकावंच लागेल हे तिच्या मनाने पक्कं केलं होतं. शेकडो उंबरठे झिजवल्यानंतर तीन वस्तू ती विकू शकली. त्या दिवशी चिनूने ६० रुपये कमावले. तिला हुरूप आला. ती मेहनत करू लागली. अवघ्या ६-७ महिन्यांत तिच्या हाताखाली तीन मुली काम करू लागल्या. त्यावेळी ती अवघी १६ वर्षांची होती. अशा प्रकारे एक वर्ष घरोघरी सेल्सवुमन म्हणून काम केल्यानंतर ती यलो पेजेसची वितरक म्हणून काम करण्यासाठी सूरतला गेली. त्यानंतर तिने वेट्रेस, रिसेप्शनिस्ट म्हणून देखील काम केले. काही काळ तिने कपड्यांच्या दुकानात सुद्धा सेल्सगर्ल म्हणून काम केले. शेवटी तिला टाटा इंडिकॉमच्या फ्रँचायझीमध्ये कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह म्हणून नोकरी मिळाली. ही नोकरी मात्र तिच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. तिथेच ती एमबीए पदवी मिळवलेल्या अमित काला या तरुणाला भेटली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. २००४ मध्ये चिनूने अमितशी लग्न केले आणि ती बंगळूरुला स्थायिक झाली.

लग्नानंतर अमितने तिला तिची उद्योजकता क्षमता विकसित करण्यास मदत केली आणि तिला मोठी जोखीम घेण्याचा आत्मविश्वास दिला. चिनूने ब्यूटिशियनचा कोर्स केला. घरूनच ती पार्लर चालवत होती. पार्लरविषयी अजून माहिती घेण्यासाठी ती मुंबईत आली. तेव्हा तिला ग्लॅडरॅग्स मिसेस इंडियाबद्दल कळले. तिने २००६ मध्ये या सौंदर्यस्पर्धेत भाग घेतला आणि टॉप १० फायनलिस्टमध्ये स्थान मिळवले. तिने विजेतेपद जिंकले नसले तरी, एक दागिन्याचा तुकडा एखाद्या पोशाखात किती फरक करू शकतो हे तिने पाहिल्यानंतर तिला दागिन्यांचा व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा मिळाली.

खूप विचार केल्यानंतर तिने शेवटी २०१४ मध्ये रूबन्स ॲक्सेसरीज सुरू केले. स्वतःच्या खिशातून ३ लाख रुपयांची बचत करून तिने स्वतःची कंपनी सुरू केली. चिनूने बंगळूरुमधील फिनिक्स मॉलमध्ये ३६ चौरस फूट जागेत दुकान सुरू केल्यानंतर झटपट विस्तार केला. एका वर्षापेक्षा कमी कालावधीत अनेक शहरांमध्ये या ब्रँडची किरकोळ विक्रीची दुकाने उभी राहिली. जीवनशैलीच्या प्राधान्यांवर आधारित दागिन्यांच्या ग्राहकांच्या मागणीचे सखोल विश्लेषण करणे, ८० टक्के डिझाईन्स मूळ स्वरूपाच्या असणे, ग्राहकांना भारतीय व पाश्चात्त्य पद्धतीच्या डिझाईनचे विविध पर्याय उपलब्ध करून देणे या कारणामुळे रुबन ॲक्सेसरीज लोकप्रिय झाली.

आठ वर्षांहून अधिक काळ कार्यरत राहिल्यानंतर, तिची फर्म ३० कोटी रुपयांची कमाई करत आहे आणि डीएनएनुसार वार्षिक १० टक्के दराने वेगाने विस्तारत आहे. परिणामी, रुबन ॲक्सेसरीजचे उत्पन्न २०१४ मध्ये ५६ लाख रुपयांवरून २०२२ मध्ये ३५ कोटी रुपयांपर्यंत वाढले. याशिवाय, ऑफलाइन व्यवसाय पाच ठिकाणी वाढला. २०२४ पर्यंत १४० कोटी रुपयांच्या उलाढालीचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवून विकास दर आणखी १५० टक्क्यांपर्यंत नेण्याचे चिनू कालाचे उद्दिष्ट आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. आपण गरिबीत जन्माला आलो ते आपल्या हाती नव्हतं मात्र आपण गरिबीत मेलो, तर मात्र ती आपली चूक आहे असं कोणत्यातरी उद्योजकाने म्हटलं आहे. चिनू काला हे वाक्य शब्दश: जगली आहे. ‘लेडी बॉस’ या शब्दासाठीच ती जन्माला आली की काय इतपत वाटावं, असा तिचा उद्योजकीय प्रवास आहे.
theladybosspower@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -