Saturday, July 20, 2024
Homeसाप्ताहिकरिलॅक्सRutuja Bagwe : दिग्दर्शकाची अभिनेत्री

Rutuja Bagwe : दिग्दर्शकाची अभिनेत्री

  • टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल

ऋतुजा बागवे हिने आता स्वतःची अभिनेत्री म्हणून ओळख निर्माण केली आहे. सध्या तिचे ‘लंडन मिसळ’ व ‘सोंग्या’ हे चित्रपट रिलीज झालेले आहेत. तिचा जन्म मुंबईचा, तिचं गाव मसुरा (मालवण) विलेपार्लेच्या पार्ले टिळक शाळेत व रायगडच्या मिलिटरी शाळेत तिचे शालेय शिक्षण झाले. पार्ले टिळक शाळेत असताना तिने सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतला होता; परंतु रायगडच्या मिलिटरी शाळेत जास्त सांस्कृतिक कार्यक्रम होत नसत. फक्त गायनाचे कार्यक्रम होत असत. तिने भांडून तिथे एकांकिका सादर केली. नर्सरीमध्ये असताना तिने तेथील स्नेहसंमेलनात नृत्य केले होते. ती भरतनाट्यम हा नृत्य प्रकार शिकली होती.

एम. डी. कॉलेज व रुईया कॉलेजमधून तिने पुढील शिक्षण घेतले. तिथे जवळपास २२ एकांकिका तिने केल्या. ५३ बक्षिसे तिला मिळाली. तिने केलेल्या काही एकांकिका खूप गाजल्या. तिला आजदेखील उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून ओळखले जाते.

तिच्या अभिनयाची सुरुवात बालपणापासून झाली. तिच्या आईला अभिनयाच्या क्षेत्रात काम करायचे होते; परंतु न जमल्याने तिने डॉक्टरकी केली. ऋतुजामध्ये मात्र अभिनयाचे गुण बालपणापासून दिसले. कुणाच्या वाढदिवसाला स्किट कर, वक्तृत्व स्पर्धेत भाग घे, वेशभूषा, एकपात्री प्रयोग कर असं तिचं बालपणापासून सुरू होतं.

‘गोची प्रेमाची’ हे पहिलं व्यावसायिक नाटक तिला मिळालं. सचिन मोटे यांनी हे नाटक लिहिलं होतं व सचिन गोस्वामीने ते दिग्दर्शित केलं होतं.

या नाटकामुळे तिच्या अभिनयाची सुरुवात झाली. त्यानंतर तिला ‘गोजिरवाण्या घरात’ ही मालिका मिळाली. नंतर ‘स्वामिनी’ ही मालिका मिळाली. त्यानंतर असंख्य प्रायोगिक नाटकात तिने काम केली. ‘गिरगाव व्हाया दादर’ हे व्यावसायिक नाटक तिने केलं. या नाटकातील भूमिकेसाठी झी टिव्हीवर सहाय्यक अभिनेत्रीचं बक्षीस मिळालं. २०१५ ला तिला ‘नांदा सौख्यभरे’ ही मालिका मिळाली. त्यामध्ये तिची मुख्य नायिकेची भूमिका होती. हा तिच्या जीवनातला टर्निंग पॉइंट ठरला. त्यानंतर ती नायिका म्हणून ओळखली गेली, घराघरांत ती पोहोचली. तिला चेहऱ्याने प्रेक्षक ओळखू लागले. तिच्या नावाला महत्त्व आलं. त्यानंतर ‘अन्यन्या’ हे नाटक तिने केलं. एक उत्तम अभिनेत्री अशी ओळख या नाटकामुळे तिला मिळाली. वर्षभरातील सर्व बक्षिसे व पारितोषिके तिला प्राप्त झाली. हे नाटक देखील तिच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरले, असं ती मानते.

‘लंडन मिसळ’ या चित्रपटात ती दुहेरी भूमिकेत आहे. अदिती व आदित्य अशा त्या दोन भूमिकांची नावं आहेत. ती मुलगी आदित्य या मुलाच्या नावाने लपून हॉस्टेलमध्ये मुलासारखी राहत असते.

‘सोंग्या’ हा तिचा अजून एक चित्रपट नुकताच रिलीज झालेला आहे. स्त्रिया आज जरी बंधमुक्त वाटत असल्या तरी कधी समाज – संस्कृती तर कधी घराण्याची मानमर्यादा – इभ्रत अशा बेगडी प्रतिष्ठांना सर्रास बळी पडताना दिसतात. त्यात शहरी – निमशहरी सगळ्याच जणी भरडल्या जातात. अशाच एका विषयाकडे मनोरंजनाच्या माध्यमातून अगदी हलक्या – फुलक्या पद्धतीने लक्ष वेधण्याचा प्रयत्न या चित्रपटात केला गेलेला आहे.

या चित्रपटामध्ये शुभ्रा या नायिकेची भूमिका ऋतुजाने साकारली आहे. या चित्रपटाची कथा शुभ्रा आणि यशराज या दोन प्रेमी युगुलांवर आधारित आहे. या दोघांच्या आनुषंगाने खुलत जाणारी प्रेमकथा जुनाट – रूढी परंपरांच्या विळख्यात अडकते. समाजाला शरण न जाणारी शुभ्रा आपल्यावरील तर अन्याय सहन करत नाहीच, पण ती अशा रूढींविरोधात आवाज उठवते. आपल्या पारंपरिक भारुडाच्या माध्यमातून जनजागृती करणारी प्रातिनिधिक स्वरूपात शुभ्रा हे पात्र यात दाखविण्यात आलेले आहे.

शुभ्रा या पात्रामुळे असंख्य मुली बळी जाण्यापासून वाचू शकतात. स्त्रीशक्तीचा जागर करणारा ‘सोंग्या’ हा चित्रपट सामाजिक परिस्थितींवर भाष्य करीत जळजळीत अंजन घालतो, असं म्हटलं तर वावगं ठरू नये.

कोणत्याही कलाकृतीत दिग्दर्शक हा महत्त्वाचा घटक असतो कारण त्याच व्हिजन हे मोठं असतं. त्याला एखादी व्यक्तिरेखा कशी हवी हे ऋतुजा जाणून घेते, त्यांच्यांशी संवाद साधते. त्या व्यक्तिरेखेचा अभ्यास करते. त्यानंतर ती भूमिका साकारते. ती दिग्दर्शकांची अभिनेत्री आहे. तिच्याकडून अजून चांगल्या चांगल्या व्यक्तिरेखा साकारल्या जावोत व प्रेक्षकांना चांगली कलाकृती पाहावयास मिळू दे, अशी अपेक्षा आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -