Friday, October 24, 2025
Happy Diwali

डब्बा ट्रेडिंगमध्ये वकिलाला सव्वाकोटी रुपयांना गंडा

डब्बा ट्रेडिंगमध्ये वकिलाला सव्वाकोटी रुपयांना गंडा
  • गोलमाल : महेश पांचाळ

मालाड येथील रहिवासी असलेल्या तक्रारदार मुंबई उच्च न्यायालयाच्या वकिलांना मार्च २०२१मध्ये शेअर ट्रेडिंगचा व्यवसाय करणाऱ्या विजय पाटील या मित्राने सौरभ म्हात्रे आणि चंद्रकांत म्हात्रे या पिता-पुत्रांशी ओळख करून दिली होती. या भेटीदरम्यान पाटील यांनी वकिलांना सांगितले की, सौरभ आणि चंद्रकांत यांचा सल्ला घेऊन शेअर ट्रेडिंगमध्ये सदर्भात केल्यास चांगला नफा कमवाल. हे दोघेही त्यांच्याकडे गुंतवणूक करणाऱ्यांना गेल्या तीन वर्षांपासून गुंतवणुकीवर नियमित परतावा देत आहेत.

त्यानुसार मित्र पाटील यांच्या विश्वासावर सौरभ आणि त्याचे वडील चंद्रकांत यांच्या कार्यालयात भेटीसाठी गेले. म्हात्रे पिता-पुत्र दोघांनी तक्रारदार वकिलाला सांगितले की, ‘गेल्या ११ वर्षांपासून कॉल अँड पुट, कमोडिटी आणि डब्बा ट्रेडिंग करत आहेत, त्यांना कधीही तोटा सहन करावा लागला नाही आणि सरासरी २०% नफा कमावला आहे.” काही गुंतवणूकदाराची उदाहरणे दिली. तुम्हीही बिनधास्त गुंतवणूक करा. या गुंतवणुकीवरील २०% नफ्यातील १०% टक्के रक्कम दर महिन्याला नफा तुमच्या खात्यात जमा केली जाईल. अशी ऑफर वकिलांना देण्यात आली.

वकिलाने गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आणि मार्च ते जून २०२१ दरम्यान त्यांनी १.३१ कोटी रुपये गुंतवले आणि म्हात्रेंच्या सूचनेनुसार बँक खात्यात पैसे जमा केले.

या गुंतवणूक संदर्भात वकिलाने म्हात्रे पिता-पुत्र यांच्यासोबत करारही केला होता. ज्यामध्ये गुंतवणूक आणि देऊ केलेल्या नफ्याचा सर्व तपशील नमूद केला होता. म्हात्रेंनी वचन दिलेला नफा देण्यास भविष्यात शक्य झाले नाही, तर म्हात्रे यांच्या नावावर असलेले त्यांचे घर आणि रायगड जिल्ह्यातील एक भूखंड त्यांच्या ताब्यात देण्यात येईल, असेही करारपत्रात नमूद करण्यात आले होते.

म्हात्रे यांनी सुरुवातीला तक्रारदाराला काही पैसे दिले. मात्र ३.२३ लाख रुपये दिल्यानंतर या दोघांनी वकिलाला पैसे देणे बंद केले. त्यांनी त्यांना कारण विचारले असता ते काही ना काही कारणे सांगून प्रकरण लांबवत होते, असा आरोप तक्रारदाराने केला आहे.

याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या वकिलाने मालाड पोलिस ठाण्यात पिता-पुत्राविरोधात सुमारे सव्वाकोटी रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली. आरोपींनी वकिलाकडून डब्बा ट्रेडिंगमध्ये गुंतवण्याच्या बहाण्याने पैसे स्विकारले होते (प्रतिभूतींमध्ये व्यापार करण्याचा बेकायदेशीर आणि अनियंत्रित प्रकार) आणि त्यांच्या २०% नफ्यातील १०% ऑफर केला होता. मात्र आरोपींनी तक्रारदार वकिलाला कोणताही फायदा दिला नाही आणि त्याचे पैसेही परत केले नाहीत आणि ते दोघे अज्ञातवासात गेले आहे. मालाड पोलिसांनी एफआयआर नोंदवला असून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

तात्पर्य : कायद्याच्या चौकटीत काम करणारा वकीलसुद्धा जास्त व्याजाच्या आमिषापोटी फसत असेल, तर सर्व सामान्य नागरिकांनी डब्बा ट्रेडिंगपासून दूरच राहावे.

maheshom108@ gmail.com

Comments
Add Comment