
२०२३ वर्ष संपत आलं आणि सर्वांना आता ख्रिसमसचे (Christmas) वेध लागले आहेत. दरवर्षी हा सण २५ डिसेंबरला साजरा केला जातो. खरं तर ख्रिसमस हा ख्रिश्चन (Christian) धर्मीयांचा सण आहे. पण जागतिकीकरणामुळे (Globalisation) पाश्चात्त्य संस्कृतीतील (Western culture) अनेक गोष्टी भारतातही उत्साहाने साजऱ्या केल्या जातात. भारतातले बाजारही सध्या ख्रिसमस ट्री, सांताक्लॉजची खेळणी, शोभेच्या वस्तू, सॉफ्ट टॉईज, दिवे यांनी भरुन गेले आहेत.
ख्रिसमस पार्टीत काहीतरी गोडधोड बनवले जाते. प्लम केक, पुडिंग, कुकीज असे एक ना अनेक पदार्थांचे पर्याय यासाठी उपलब्ध आहेत. काहीजण हे पदार्थ घरीच बनवणं पसंत करतात तर काहीजण विकत आणतात. पण खरी समस्या असते ती नॉनव्हेज किंवा अंडी न खाणार्या लोकांची. ख्रिसमससाठीच्या केक्स किंवा पुडिंगमध्ये अंड्याचा वापर होत असल्याने त्यांना ते खाता येत नाही. म्हणून त्यांच्यासाठी खास एगलेस डेजर्ट्सचे (desserts) पर्यायही असतात. हे पदार्थ घरच्या घरीही अत्यंत सोप्या पद्धतीने बनवता येऊ शकतात. या पदार्थांची रेसिपी आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत.
१. प्लम केक (Plum cake)

प्लम केकशिवाय ख्रिसमस अपूर्ण आहे. नेहमीच्या केक्सपेक्षा या केकची चव थोडी वेगळी आणि मस्त असते. यात क्रिमचा वापर केला जात नाही, तरीही हा केक अत्यंत चवदार लागतो. हा केक विना अंड्याचाही तितकाच चवदार आणि मऊ बनवण्यासाठी ही रेसिपी -
सर्वप्रथम एका भांड्यात बेदाणे, क्रॅनबेरी, अंजीर, चेरी, जर्दाळू, सुके खजूर, अक्रोडाचे तुकडे घ्या. त्यात द्राक्षाचा रस घाला आणि ते सर्व सुमारे २-३ तास भिजवा.
यानंतर, एका मोठ्या भांड्यात पाणी गरम करुन घ्या. त्यात ब्राऊन शुगर, तेल/तूप किंवा लोणी घाला आणि नीट मिक्स करा. लक्षात ठेवा की या सर्व गोष्टी नीट एकजीव झाल्या पाहिजेत.
आता चाळणीच्या साहाय्याने पीठ चाळून घ्या. त्यात बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर एकत्र करून चांगले मिक्स करा. यानंतर दालचिनी पावडर, जायफळ पावडर, वेलची पावडर आणि मीठ घालून सर्वकाही चांगले मिसळा. त्यात पाणी, ब्राऊन शुगर, लोण्याचे मिश्रण घाला. त्यात लिंबाचा अर्क आणि व्हॅनिला इसेन्स टाकून एका दिशेने चांगले मिक्स करा. यानंतर तुम्ही भिजवलेले ड्रायफ्रूट्स पिळून या पिठात मिसळा.
आता केकचा साचा घ्या आणि त्यात बटर पेपर लावून चांगले ग्रीस करा. या केकच्या साच्यात केकचे बॅटर घालून चांगले सेट करा. पिठात असलेली हवा काढून टाकण्यासाठी ट्रेवर दोनदा टॅप करा. आता हा केक प्रीहिटेड ओव्हनमध्ये (१८० डिग्री सेल्सिअस) ४० मिनिटे बेक करा. ४० मिनिटांनी टूथपिक टाकून तपासा, टूथपिक स्वच्छ बाहेर आली तर तुमचा केक तयार आहे. नसल्यास, केक आणखी १० मिनिटे बेक होऊ द्या. यानंतर केक बाहेर काढा आणि थंड होण्यासाठी ठेवा. तुमचा एगलेस ख्रिसमस प्लम केक तयार आहे.
२. स्विस रोल (Swiss role)

स्विस रोल तयार करण्यासाठी सर्वात आधी कोमट दुधात ५ मिनिटे व्हिनेगर घालून ठेवा म्हणजे ते फाटेल. फाटलेलं दूध वाडग्यात घेवून त्यात तेल टाका. त्यानंतर मैदा, बेकिंग पावडर, मीठ चाळून घ्या. फाटलेल्या दुधात व्हॅनिला इसेन्स, साखर, चाळलेलं मैद्याचं मिश्रण घालून एकजीव करा.
गॅसवर पॅन ठेवून त्यामध्ये हे मिश्रण डोशाप्रमाणे पसरुन घ्या. गॅस मंद आचेवर ठेवून ७-८ मिनिटे ठेवा. सुरी घालून एकदा मिश्रण शिजलं की नाही हे चेक करा. शिजल्यानंतर ते बटर पेपरवर काढून घ्या. हे मिश्रण तुम्ही (१८० डिग्री सेल्सिअस) १५ मिनिटे बेकही करु शकता.
त्यावर स्ट्रॉबेरी जॅम किंवा आटवलेला स्ट्रॉबेरी क्रश पसरवून घट्ट गुंडाळा व फ्रीजमध्ये ५ मिनिटे ठेवा. काढून वड्या पाडा आणि सर्व्ह करा स्विस रोल.
३. एगलेस चॉकलेट पुडिंग (Eggless chocolate pudding)

चॉकलेट पुडिंग बनवण्यासाठी सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात एक कप दूध घ्या. त्यात २ टेबलस्पून कोको पावडर आणि २ टेबलस्पून कॉर्न फ्लोअर घाला. आता ते चांगले मिसळा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही कॉर्न फ्लोअरऐवजी कस्टर्ड पावडरही घालू शकता. हे मिश्रण व्यवस्थित मिसळेपर्यंत फेटावे लागते.
आता एक पॅन घ्या आणि त्यात अर्धा कप दूध घाला. तयार मिश्रण दूधात मिसळा. आता मंद आचेवर ढवळत शिजवा.
मिश्रण चांगले एकजीव झाल्यावर त्यात १/४ कप साखर घाला. जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही अर्धा कप साखर देखील घालू शकता. आता साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत ढवळा.
आता मिश्रणात क्रीम घाला आणि मिश्रण गुळगुळीत होईपर्यंत ढवळा. आता त्यात चॉकलेट चिप्स घाला, मिक्स करा आणि ढवळत असतानाच चॉकलेट चिप्स पूर्णपणे वितळेपर्यंत शिजू द्या. गॅसची आच मंद करा आणि मिश्रण घट्ट होईपर्यंत आणि चमकदार दिसू लागेपर्यंत शिजू द्या.
आता गॅसची आच बंद करा आणि त्यात व्हॅनिला इसेन्स आणि मीठ घालून चांगले मिक्स करा. आता हे मिश्रण एका छोट्या कपमध्ये घ्या आणि झाकून ठेवा. त्याला किमान २ तास फ्रीजमध्ये ठेवा. अशा प्रकारे तुमची स्वादिष्ट चोको पुडिंग तयार आहे. सर्व्ह करण्यापूर्वी चॉकलेट चिप्सने सजवा.