Saturday, July 6, 2024
Homeताज्या घडामोडीDada Bhuse : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आठ दिवसांत मदतीचे वाटप झाले नाही तर...

Dada Bhuse : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आठ दिवसांत मदतीचे वाटप झाले नाही तर…

दादा भुसेंची पीकविमा कंपन्यांना तंबी

नाशिक : खराब वातावरणामुळे (Bad weather) यंदा राज्यात खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामातील पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी (Farmers) चिंतेत सापडला आहे. अशातच आणखी एक वाईट बाब म्हणजे खरीप हंगामातील पिकांच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना भरपाईची २५ टक्के रक्कम ऑगस्ट अखेरपर्यंत देणे अपेक्षित असतानाही पीकविमा कंपन्यांनी (Crop insurance companies) त्याचे गांभीर्य राखले नाही. शेतकऱ्यांना ही रककम अजूनही देण्यात आलेली नाही. या प्रकरणी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी पीकविमा कंपनीच्या अधिकाऱ्यांची कडक शब्दांत कानउघाडणी केली.

जिल्हाधिकारी कार्यालयात काल दादा भुसे यांनी पीकविमा योजनेचा आढावा घेतला. यंदा नाशिक जिल्ह्यातून ५,८८,७४८ शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेत सहभाग घेतला होता. मात्र, पीकविम्याच्या पहिल्या २५ टक्क्यांपैकी १०५ कोटी रुपये सरकारकडून शेतकऱ्यांसाठी मंजूर केलेले असताना पीकविमा कंपन्यांनी ५७ कोटी ४६ लाख रुपयेच वितरित केल्याची कृषी अधिकाऱ्यांनी माहिती दिली.

यावेळेस पीकविम्याची रक्कम तातडीने वितरित करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले असतानाही पीकविमा कंपन्यांनी हा मुद्दा गांभीर्याने का घेतला नाही? तुम्ही मुख्यमंत्र्यांचेही ऐकणार नाहीत का? सरकारने निधी उपलब्ध करून दिलेला असतानाही त्याचे वाटप का केले नाही? तुम्ही येथे धंदा करायला बसला आहात का?असे संतप्त सवाल भुसे यांनी उपस्थित केले.

शेतकऱ्यांना पैसे देता म्हणजे त्यांच्यावर उपकार करत नाही, अशा शब्दांत भुसे यांनी अधिकाऱ्यांना सुनावले. पुढे ते म्हणाले, आठ दिवसांत शेतकऱ्यांना मदतीचे वाटप झाले नाही, तर तुमच्या कार्यालयात येऊन नववर्षाचे ‘गिफ्ट’ देऊ. शेतकऱ्यांना घेऊन थेट पीकविमा कंपनीच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करू, असा इशाराही भुसे यांनी दिला.

शेतकऱ्यांची स्थिती वाईट आहे. त्यांना मदतीची गरज आहे. तुम्ही कधी शेतकऱ्यांच्या बांधावर गेलात का? असा प्रश्न भुसे यांनी अधिकाऱ्यांना विचारला. त्यावर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी हसून नाही असे उत्तर दिल्यामुळे भुसे अधिकच संतप्त झाले. तुम्ही हसून शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळू नका, अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांना खडसावले.

बैठकीला अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, जिल्हा उपनिबंधक फय्याज मुलाणी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, ओरिएंटल पीकविमा कंपनीचे राज्य व्यवस्थापक विनायक दीक्षित आदी उपस्थित होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -