आपल्या देशातील तरुणांचा विचार करता तरुण मंडळी तणावाखाली वावरताना दिसतात. याचे एकमेव कारण म्हणजे आपण कोणतीही पदवी घेतली तरी पोट भरण्या इतक्या पगाराची नोकरी मिळेलच याची खात्री नाही. त्यामुळे शिकून तरी काय फायदा, असा प्रश्न त्यांच्या मनात कायम निर्माण होत असतो. हे काही सुशिक्षित तरुणांसोबत बोलल्यावर माझ्या लक्षात आले. तेव्हा या आव्हानाच्या दृष्ट चक्रातून तरुणांना बाहेर काढावे लागेल. त्यासाठी त्यांनी संपादन केलेल्या पदवीनुसार त्यांना नोकरी मिळालीच पाहिजे. म्हणजे तो आपल्या मूलभूत गरजा भागवून आपले उत्तम प्रकारे जीवन जगू शकेल. दुर्दैवाने आज उलट परिस्थिती देशात पाहायला मिळते. त्यांच्या गुणवत्तेला न्याय मिळालाच पाहिजे. तरच देशाचा सर्वांगीण आर्थिक विकास होण्याला मदत होऊन, देश प्रगतिपथावर जाईल. तेव्हा राज्यकर्त्यांनी तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. हे मोठे आव्हान आजच्या तरुणांपुढे आहे.
भारत देश हा तरुणांचा देश आहे, असे आपल्या देशातील राज्यकर्त्यांना वाटते, हे अगदी खरे आहे. आज आपल्या देशाचे नाव उज्ज्वल केले त्यात तरुणांचा जास्त वाटा असल्याचे सिद्ध होते. सन १९८५ पर्यंत एखादा तरुण डी. एड. करीत असेल वा झाला असल्यास परिसरातील शाळेचे अध्यक्ष त्या तरुणाच्या घरी येऊन त्याच्या आई-वडिलांना सांगायचे की, मुलाचा निकाल लागल्यावर माझ्या शाळेवर पाठवा. म्हणजे नोकरी पक्की समजायची. ती सुद्धा भरपगारी, पहिले तीन महिने पगार मिळाला नाही तरी. आता सांगा डी.एड. पदवीधरांची तेव्हा काय परिस्थिती होती? त्यावेळी डी. एड. ला प्रवेश मिळायचा नाही. आता डी. एड.ची पदवी घेण्यासाठी तरुण जात नाही. मग पुढे काय? कोणत्या पदव्या घ्यायच्या, असे आता तरुणांपुढे एक प्रमुख आव्हान निर्माण झाले आहे. यात बी. एड. वाल्यांची सुद्धा तीच परिस्थिती आहे. मग अध्यापन पदवी कशासाठी? याचा जरूर विचार शिक्षण विभागाने करणे आवश्यक आहे. सध्या डी. एड. असून सुद्धा ‘परीक्षा पे परीक्षा’ असे चक्र चालू आहे. या पदवीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षक होण्याचे स्वप्न साकार झाले आहे. आता तर तरुण जाहिरातीच्या शोधात असतात. मात्र गेली सात -आठ वर्षे स्पर्धा परीक्षेमुळे काय करावे, हेच त्यांना सुचत नाही. तेव्हा येणाऱ्या काळाची वाट बघत आहेत. आजच्या परिस्थितीमध्ये डी. एडधारक तरुणांची परिस्थिती ‘घर का ना घाट का’ अशी झालेली दिसून येते.
सध्या अनेक तरुण मंडळी आपले अर्धवट शिक्षण सोडून राजकारण्यांसोबत फिरताना दिसत आहेत. राजकारणात पहिले दिवस बऱ्यापैकी होते. त्यात तरुण कार्यकर्त्यांना सुद्धा चांगले दिवस आलेले होते. मात्र सध्या घराणेशाही व अकस्मात पक्ष प्रवेश यामुळे तरुण मंडळी द्विधा मनस्थितीत आहेत. यातून पुढे काय करावे, हा तरुणांमध्ये प्रश्न निर्माण झाला आहे. यात गटबाजी झाल्याने प्रामाणिक कार्यकर्ता पक्षाच्या बाहेर फेकला गेला. इकडे आड तिकडे विहीर अशी त्यांची तऱ्हा झाली. त्यामुळे पुढे काय करावे असे आव्हान त्यांच्यापुढे निर्माण झाले आहे. यात तरुण कार्यकर्ता होळपळताना दिसत आहे. राजाच नसेल तर त्यांच्या सैनिकांना कोण विचारणार, असा प्रश्नही निर्माण झाला आहे.
आज कोणतीही पदवी घेतली तरी नोकरी मिळेलच याची शाश्वती नाही. दिवसेंदिवस सुशिक्षित बेकारांची संख्या देशात वाढते आहे. तेव्हा ही परिस्थिती देशाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून घातक आहे. यासाठी सरळसेवा पद्धतीने भरती होणे आवश्यक आहे. ते सुद्धा आरक्षणाची काटेकोरपणे अंमलबजावणी करून. सध्या जी कंत्राटी भरती केली जात आहे, ती एकप्रकारे तरुणांचे शोषण करणारी पद्धत आहे यात त्यांचे भवितव्य काहीच नाही. आरक्षण नसल्याने महिला, अपंग व मागासवर्गीय समाज वंचित राहणार, हे मात्र निश्चित. मग अशा वर्गातील तरुणांना खरे आव्हान असणार आहे. काही ठिकाणी तुटपुंज्या पगाराची नोकरी मिळते. मात्र त्या नोकरीची शाश्वती नाही. जरी नोकरी केली तरी निवृत्तीनंतर काय? याचा विचार राज्यकर्त्यांनी करणे गरजेचे आहे. यासाठी प्रबोधन महत्त्वाचे असते. शहरात काही ठिकाणी तरुणांना त्यांच्या जीवन प्रवासाला योग्य दिशा मिळण्यासाठी प्रबोधन केले जाते. यात अनेक तरुणांना मार्गदर्शन मिळते. मागे राहतात ते म्हणजे ग्रामीण भागातील तरुण. यांचे योग्यवेळी प्रबोधन न केल्यामुळे पारंपरिक पद्धतीने ते काम करीत असतात. यामध्ये योग्य मोबदला न मिळाल्याने ते व्यसनाच्या आहारी जातात. याचा परिणाम यात अनेक घरे उद्ध्वस्त होताना दिसत आहेत.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे, देशाच्या विकासातील एक महत्त्वाचा घटक म्हणून तरुणांकडे पाहिले जाते. आजचे तरुण म्हणजे उद्याचे मुख्य आधारस्तंभ व मार्गदर्शक म्हणून त्यांची गणना करण्यात येते. तेव्हा त्यांना सन्मानाने जगू द्या. आपल्या देशात तरुणांच्या समोर अनेक आव्हाने आहेत आणि ती आव्हाने तरुणांच्या विकासाला मारक ठरत आहेत. त्यासाठी तरुणांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्यकर्त्यांनी गट-तट बाजूला ठेवून देशातील तरुणांच्या विकासासाठी अत्यावश्यक ठोस उपाययोजना कराव्या लागतील. तरच आपल्या देशातील तरुण आव्हानांचा आत्मविश्वासाने सामना करू शकतील.