- पाचवा वेद : भालचंद्र कुबल
काही संहिता या मुळात तोंडात सोन्याचा चमचा घेऊनच जन्माला येतात. लेखकांनी मांडलेल्या स्वतःच्या विचारधारेची संहिता आणि दिग्दर्शकाने सादर केलेली रंगावृत्ती यांच्या मिश्रणातून जे उभे रहाते ते खरे नाटक. आपल्याकडे नाटक हे लेखकाचेच मानले गेले आहे; परंतु पोस्ट माॅडर्न थिएट्रिकल सिद्धांतानुसार ते दिग्दर्शकाचेही म्हणणे गरजेचे भासू लागले आहे. साधारण तीन वर्षांपूर्वी “निर्वासित” नावाची एकांकिका मी दिल्लीच्या एका स्पर्धेसाठी दिग्दर्शित केली होती. तत्पूर्वी हीच एकांकिका अभिजीत झुंजारराव यांनी अनेक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेसाठी सादर केल्याने अव्वल ठरली होती. माझ्याही दिग्दर्शनाखाली सादर झालेल्या या एकांकिकेस झाडून सर्व प्रथम क्रमांकाची पारितोषिके मिळाली होती… आणि त्याच वेळेस वाटून गेले होते की, या एकांकिकेचे नाटक होणे गरजेचे आहे, कारण एकांकिका या लघुनाट्याच्या फाॅर्ममध्ये “निर्वासित”चा श्वास गुदमरतो आहे. स्वप्नील जाधव या नवलेखकाने त्या फाॅर्मला विस्तारलं आणि रत्नागिरी केंद्रावर राज्यनाट्य स्पर्धेत या नाटकाचा पहिला प्रयोग सादर झाला आणि तिथेही या नाटकाला भरघोस यश मिळालं. आज तेच नाटक व्यावसायिक रंगभूमीवर ‘भरत जाधव’ यांनी रंगमंचावर आणल्यामुळे त्याला वेगळे वलय प्राप्त होऊन, भरत जाधवांच्या धाडसाचे कौतुक होतेय, जे अत्यावश्यक आहे.
अच्युत वझे, सतीश आळेकर, जयंत पवार, वृदावन दंडवते, दिलीप जगताप, विजय तेंडुलकर या लेखकांनी त्यांच्या आजवरच्या लेखनातून निम्नमध्यमवर्गाच्या समस्या विविध रूपांनी मांडल्या आहेत. शहरातल्या समस्यांनी भरडला गेलेला नोकरदार वर्ग या समस्यांच्या केंद्रस्थानी होता. त्यातल्या त्यात मुंबईसारख्या शहरात तर जागेची समस्या या नोकरदार वर्गाच्या पाचवीला पूजलेली समस्या आहे. यावर आपापल्या पद्धतीने रंगमंचीय अवकाशाचा वापर करत उलगडून दाखवलेल्या समस्यांची कारणमिमांसा कथाबीजाचे रूप धारण करून सर्वसामान्य प्रेक्षकाला आपलीशी वाटत आली आहे. आपल्याच कुटुंबातल्या व्यक्तिरेखा पाहतानाचा भास जणू या कलाकृतींमधून होत असे. नाटक किंवा नाट्याकृती जरी कृती म्हणून खोटी असली तरी ती आपली वाटली पाहिजे, त्यातल्या नाट्याने आपलं वाटायला लावलं पाहिजे आणि जेव्हा ते आपलं वाटतं, तेव्हा त्यातला खोटेपणा निघून गेलेला असतो. मग सत्यतेची परिमाणं लावलेली उदाहरणं देत आपण त्याबद्दल बोलू लागतो. मध्यमवर्गाच्या समस्या ज्या ज्या लेखकांनी मांडल्या त्यांच्याविषयी हा वर्ग अस्तित्वात असेल तोवर बोलले जाईल आणि लेखक लिहीत राहतील. शेवटी कला हे देखील जगण्याचे अविभाज्य अंग आहेच की..!
मुंबईसारख्या शहरात राक्षसी महत्त्वाकांक्षेने पछाडलेल्या वृत्तींच्या समवेत जगताना आपलं अस्तित्व टिकविण्याची धडपड जो तो करताना दिसतो. प्रत्येकाच्या जगण्याचे सापेक्ष समीकरण किंवा भूमिका प्रत्येकाने निर्माण केली आहे. यात जो लायक आहे त्याचाच निभाव लागतो, असे दुर्दैवी चित्र या महानगराने उभं केलंय. पालिकेतला झाडू खात्यातील हसोळकर आपलं चौकोनी कुटुंब घेऊन म्युनिसिपल काॅलनीतल्या दहा बाय बाराच्या खोलीत आल्या गेल्या प्रसंगांना सामोरा जात जगतोय. त्याने आपल्या गावाची नाळ तुटू नये म्हणून केलेली समर्थ धडपड म्हणजेच हे त्याचं “अस्तित्व”..! प्रत्येकाच्या दैनंदिन गरजा पुरवता पुरवता दमछाक झालेला हसोळकर जेव्हा आपल्या समोर उभा राहतो, तेव्हा आपल्या आजूबाजूला धडपडणारे अनेक हसोळकर आपल्याला दिसू लागतात आणि म्हणूनच ते नाटक आपलं वाटू लागतं. खरं तर भरत जाधवांचा हसोळकर हा एक व्यक्तिचित्रण उलगडून सांगणारा स्वतंत्र लेख होऊ शकतो इतके बारकावे आणि बीटवीन द लाइन्सवर त्यांचा अभिनय उभा आहे.
एकांकिकेचे नाटक करताना अनेक शक्याशक्यतांचा विचार लेखकाला विस्ताराच्या दृष्टीने करावा लागतो. केवळ प्रसंग आणि संवाद वाढवले म्हणून एकांकिकेचे नाटक होत नसते. मुळात दोन्ही संहितांसाठी वेगवेगळे कॅनव्हास आहेत; परंतु त्याचे माध्यमांतर काही गैर नाही फक्त अपेक्षित खोली त्यातून साध्य होतेय का? हे पडताळणे जरूरीचे ठरते. नाटकातील प्रत्येक पात्र स्वतःची भूमिका मांडण्याच्या नादात “हां..आता तू बोल..!” अशा पद्धतीने नाटक पुढे नेत राहतात. जयंत पवार काय किंवा तेंडुलकर काय त्यांचे पात्र आपले म्हणणे अथवा विधान न विस्तारता खोलात जायचे. तसे या लिखाणात बिलकुल दिसत नाही. स्वप्नील जाधव तसा अजून मॅच्युअर्ड लेखक नसला तरी परिपक्व लिखाणाचे संस्कार या संहितेवर व्हायला हवेत, जे एकांकिकेच्या लेखनात जाणवत होते. शिवाय लेखक दिग्दर्शक एकच असल्याने ते शक्य देखील होते. उदाहरणार्थ मांजरीचा आणि कावळ्याचा आवाज ही दोन अदृश्य पात्रे जेव्हा मंचावर येतात, तेव्हा त्यांना “निर्वासित” या शिर्षकाशी असलेला संदर्भ उलगडावा लागत नाही. मात्र अस्तित्व टिकवण्यासाठी कांबळेंकडे गेलेल्या मांजराचा संदर्भ ओढून ताणून नको त्या जागी आला आहे. कावळ्याच्या रूपातल्या सासरेबुवांना तर फाटाच दिलेला आहे. त्यामुळे निर्वासित आणि अस्तित्व यांचे अंतःप्रवाह निरनिराळे आहेत यावर विचार व्हायला हवा होता. साधारण तीन वर्षांपूर्वीच्या या नाटकानंतर स्वप्नील जाधवांचे कुठलेही नाटक वा एकांकिका बघण्यात किंवा वाचनात आलेली नाही. लिखाणातल्या सातत्याने देखील लेखकाचे अस्तित्व जगाला कळंत असते. लेखन प्रक्रिया स्मूथ व्हावी असे जर वाटत असेल, तर लिखाणात सातत्य हे हवेच. नाहीतर ‘कबड्डी कबड्डी’सारखे अव्वल नाटक लिहिणाऱ्या जितेंद्र पाटील या लेखकासारखी अवस्था होते. एका नाटकानंतर तो लेखक पुढे कुठेच दिसला नाही. अस्तित्व हे नाटक या अगोदर केलेल्या निर्वासित या एकांकिकेमुळे आणि त्याला लाभलेल्या सर्व मान्यवरांच्या हस्तस्पर्शामुळे प्रगल्भ झालेले आहे. त्यात भरत जाधवांच्या अभिनय सामर्थ्याने तर प्रचंड उंची गाठून ठेवली आहे; परंतु कथाबीजात असलेली उंची “अस्तित्व”च्या नाट्यसंहितेत नाही.
नाटकातील दुसरी मध्यवर्ती भूमिका आहे चिन्मयी सुमीत यांची. चाळीतल्या आणि कौटुंबिक संघर्षमय जीवनाला सामोरी जाणारी स्त्री लेखकाने समर्थपणे उभी केलीय; परंतु अभिनयात मात्र त्यांनी अजून मेहनत घ्यायला हवी. चिडचिडी; परंतु हळवी व्यक्तिरेखा म्हटली की आठवते ती उषा नाडकर्णी. देहयष्टीचा वापर कसा करावा हा प्रत्येक कलाकाराचा स्वतःचा जसा अभ्यास असतो तसा तो त्रयस्थ दिग्दर्शकाचाही असतो. का कुणास ठाऊक एकांकिका गाजवणारी याच भूमिकेतील सायली बांदकर मात्र सतत आठवत होती. असो.
हार्दिक जाधव आणि सलोनी सुर्वे मात्र नजरेत भरतात. सलोनी सुर्वे यांचा संयत अभिनय लक्षवेधी ठरतो. जयराज नायर आणि शाम घोरपडे यांची साथही चांगली लाभली आहे. तांत्रिक बाजू मात्र कमालिची स्ट्राँग झाली आहे. सचिन गावकर यांचे नेपथ्य अत्यंत वास्तववादी झाले आहे. नेपथ्यातून चाळीतल्या संसाराचे बारकावे त्यानी अचूक भरून काढले आहेत. तीच गोष्ट वेशभूषेची. चाळीतल्या व्यक्तिरेखांच्या कपड्यांची रंगसंगती चैत्राली डोंगरे हिने इतक्या सुंदर रीतीने साधली आहे की ते रंग भूमिकांसोबत विलिन झाल्याने वास्तवाशी एकरूप होतात. फक्त हार्दिक जाधवांचा मित्रांसोबत बाहेर जाण्याच्या प्रसंगात इन्फाॅर्मल वेशभूषा चालली असती आणि सरतेशेवटी प्रकाश योजना…! शाम चव्हाण हा हौशी रंगभूमीवरील सध्याचा स्टार प्रकाश योजनाकार आहे. प्रत्येक राज्यनाट्य स्पर्धेत कमीत कमी पाच पारितोषिके मिळवणाऱ्या या रंगकर्मीने प्रकाश योजनेत कमाल केली आहे. कुठेही अवास्तव रंगसंतीचा वापर नाही, व्यक्तिरेखेच्या उठावासाठी स्वतंत्र लाइट सोर्स नाही, शिवाय स्वतःच्या कल्पकतेचे अवडंबरही माजवणे नाही. शाम चव्हाण यानी आता व्यावसायिक रंगभूमीवर येणे गरजेचे आहे. गोट्या सावंत हे नाव गेली कित्येक वर्षे आपण सूत्रधार या शिर्षकाखाली वाचत आलो आहोत. असे नाटक करावे की करू नये? याचा व्यावसायिक अंदाज असणारा सूत्रधार हे नाट्यव्यवसायातलं प्रमुख पात्र समजलं जातं. एवढ्या वर्षांचा नाट्यव्यवसायाचा अभ्यास या नाटकाच्या यशास कारणीभूत ठरणार यात शंका नाही.
अपेक्षांच्या गर्दीत हरवलेल्या नात्यांच्या अस्तित्वाला लोकप्रियता लाभायलाच हवी, कारण भरत जाधव एंटरटेनमेंटचं हे इतिहास घडविणारं नाटक ठरू शकतं.