उदय पिंगळे
सन २०२३ कसे आणि कधी संपत आले ते कळलेच नाही. या वर्षात आपण काही चुका केल्यात का? यातून आपण काही शिकलो का? जर त्याच त्याच चुका आपण पुन्हा पुन्हा करणार असलो तर आपली प्रगती होणार नाही आणि त्या जर आर्थिक चुका असतील, तर होणारे नुकसान आर्थिक असणार! या वर्षाला निरोप देताना आपण अशा आर्थिक चुकांचा आढावा घेऊ, ज्या कदाचित टाळता आल्या असत्या.
बाजाराचा कल सातत्याने बदलत असतो, आपल्याला मिळणाऱ्या उत्पन्नात प्रतिवर्षी वाढ होत असते. हातात खेळत असणाऱ्या पैशांनुसार आपल्या इच्छा, गरजा आणि अपेक्षाही बदलत असतात. करविषयक नियमही थोडेफार दरवर्षी बदलत असतात, त्याचप्रमाणे गुंतवणुकीच्या नव्या संधी उपलब्ध होत असतात. डिसेंबर हा महिना असा आहे जेथे शांतपणे थोडे थांबून निरोप देत असलेल्या वर्षाचा आपण आढावा घेऊ शकतो, केलेल्या आर्थिक चुकांचे विश्लेषण करू शकतो, नवीन वर्ष किंवा त्या पुढील काळासाठीचे ध्येय निश्चित करू शकतो, पूर्वी केलेले संकल्प ठरविलेली उद्दिष्टं योग्य आहेत की त्यात बदल करावे, याकडे त्रयस्थ नजरेने पाहू शकतो. सर्वसाधारणपणे बाजाराची दिशा कशी आहे, ती आपल्या मानसिकतेस अनुकूल आहे की प्रतिकूल, यात जोखीम कशी आणि किती याचा विचार करून पुढील वर्षातील गुंतवणूक संधी कोणत्या असतील याचा अंदाज बांधता येईल. त्या क्षेत्रात आपली गुंतवणूक वाढविता येईल का ते ठरविता येईल.
जिथे काहीतरी अभ्यास करून अंदाज बांधावा लागतो तेथे चुका होणे अगदी साहजिकच आहे, पण त्या कमीत कमी कशा होतील, एकाच प्रकारच्या चुका वारंवार होत असतील तर त्या टाळता कशा येतील, यावर आपली प्रगती होऊ शकते. यादृष्टीने गुंतवणूकदारांकडून होणाऱ्या सर्वसाधारण चुकांचा आणि त्यावरील उपाययोजनांचा एक धावता आढावा घेऊ या –
- कोणत्याही उद्दिष्टाशिवाय केलेली गुंतवणूक : अनेकदा कोणतेही ध्येय न ठेवता गुंतवणूक केली जाते, यात आपलेच नुकसान होण्याची शक्यता जास्त असते, कारण अशी गुंतवणूक ही त्या वेळेची बाजारातील स्थिती लक्षात घेऊन म्हणजेच अल्पकालीन स्थितीचा विचार घेऊन केलेली असते. ती गरजेवेळी आपल्याला उपयोगी पडेलच याची खात्री देता येत नाही, कारण उद्दिष्टचं नसल्याने नेमकी किती गुंतवणूक, किती काळासाठी आणि कुठे करायची याचा विचारच केलेला नसतो. गुंतवणूक ही जाणीवपूर्वक त्यातील धोका स्वीकारून, त्यातून मिळणारा परतावा हा इतर धोकारहित योजनांत मिळत असलेल्या परताव्याहून अधिक असावा या हेतूनेच केलेली असते, हेच त्यामागील प्राथमिक तत्त्व आपण विसरून जातो. आपले उद्दिष्ट हे SMART असावे, असे गुंतवणूक तज्ज्ञांचे मत आहे. म्हणजे नेमकं काय आहे समजून घेऊनच मागील गुंतवणुकीचा आढावा घ्यावा आणि नवीन वर्षात गुंतवणूक करण्याचा विचार करावा. याच दृष्टिकोनातून गुंतवणूकदारांकडून होणाऱ्या सर्वसाधारण चुका आणि त्यावरील उपाययोजनांचा विचार करूया –
- आपत्कालीन खर्चाची तरतूद नसणे : प्रत्येकाच्या जीवनात काहीना काही संकटे येत असतात. यावर मात करण्यासाठी काहीतरी योजना असावी लागते. या वर्षात अशी काही संकटे आपल्यावर आली का, तेव्हा आपण काय केले, तेव्हा आपल्याकडे पुरेशी तरतूद होती का, आठवून पाहा कोणती संकटे आली ती. नोकरी गेली, कुणीतरी गंभीर आजारी पडले, गाडी बिघडली ती दुरुस्त करण्यासाठी मोठा खर्च करावा लागला. यासाठी पुरेशी तरतूद नसेल तर उधार उसनवार करावी लागते, कर्ज घ्यावे लागते, मालमत्ता विकावी लागते. यामुळे आपल्या आर्थिक परिस्थितीत प्रगती होण्याऐवजी आपण दोन पावले मागे जातो. कदाचित क्रेडिट कार्डसारख्या महाग कर्जाच्या सापळ्यात अडकतो. असा काही प्रसंग आपल्यावर आला का? यासाठी आपला किमान घरखर्च १२ महिने चालेल असा आपत्कालीन फंड आपल्याकडे हवा. तो नसल्यास असा फंड कसा निर्माण करता येईल या दृष्टीने नववर्षाचा विचार करावा.
निवृत्ती नियोजनासाठी लवकरात लवकर तरतूद करण्याची आवश्यकता न वाटणे : आपण जसे आयुष्य आज जगत आहोत तसेच आयुष्य आपल्या निवृत्तीनंतर याच जीवनशैलीच्या जवळपास असावे, असे प्रत्येकाला वाटत असते. त्यासाठी लवकरात लवकर गुंतवणूक करावी लागते. ही गुंतवणूक आपण जितक्या लवकर (शक्यतो उत्पन्न मिळवायला लागल्यावर दोन महिन्यांत आणि उत्पन्नाच्या १० टक्के) करू तेवढी कमीत कमी करावी लागते आणि त्याच्या चक्रवाढीचा फायदा आपल्याला मिळतो. हे करण्यासाठी जेवढा विलंब तेवढी गुंतवणूक रक्कम वाढवावी लागते. - आयकर कायद्याच्या संबंधित चुका : अनेकदा आयकर, अग्रीमकर आयकर विवरणपत्र वेळेवर न भरणे यामुळे आपल्याला दंड भरावा लागतो. काही सवलती
सोडून द्याव्या लागतात. तेव्हा यासाठीची निश्चित योजना बनवून ठेवावी. - आपल्या गुंतवणूक संचाचा आढावा न घेणे : गुंतवणूक संचाचा वेळोवेळी आढावा घेऊन तो आपल्या धोरणानुसार अपेक्षित परतावा देत आहे की नाही, ते पाहून त्यात योग्य ते बदल करणे हे उत्तम गुंतवणूकदाराचे लक्षण आहे. जर एखादी गुंतवणूक अपेक्षित परतावा देत नसेल, तर थोडाफार तोटा सहन करून त्यातून वेळीच बाहेर पडावे.
- महाग कर्जाचा बोजा कमी न करणे : गृहकर्जाचा अपवाद सोडल्यास कोणतेही कर्ज लवकरात लवकर फेडणे कधीही चांगले. अनेकदा गुंतवणूक करण्याच्या नादात महाग कर्ज फेडले जात नाही. कर्ज काढून गुंतवणूक करणे हे आर्थिक मागासलेपणाचे लक्षण आहे, यामुळे व्याजाचा बोजा तर वाढतोच, पण गुंतवणुकीतून अपेक्षित परतावा न मिळाल्यास दुहेरी नुकसान होते, तेव्हा अशी नसती उठाठेव करू नये.
- जीवनविमा, मेडिक्लेमकडे दुर्लक्ष करणे : आयुष्य अशाश्वत असल्याने कुटुंबातील कमावती व्यक्ती मरण पावल्यास पूर्ण आर्थिक घडी विस्कटते, त्यासाठी जीवनविमा असतो. सातत्याने वाढणाऱ्या वैद्यकीय खर्चामुळे घरातील एखाद्या सदस्यास गंभीर आजाराशी सामना करायला लागल्यास मोठा आर्थिक फटका बसतो. जीवनविमा आणि आरोग्यविमा यासाठी करावा लागणारा खर्च, त्यात असलेल्या जोखमींची किंमत समजावी. पुरेशा रकमेचा विमा घेऊन त्याचे वेळेवर नूतनीकरण करावे.
सर्वसाधारणपणे होत असलेल्या या आणि अशा चुका आपण टाळाव्यात. येणाऱ्या नवीन वर्षात आपण आणि आपले कुटुंबीय यांचे आरोग्य उत्तम राहून आर्थिक भरभराट व्हावी, या सदिच्छा!
[email protected]