Tuesday, July 9, 2024
Homeताज्या घडामोडीआता कोरोना असो की देव, कोणीही अडवू शकणार नाही, मराठे आरक्षण घेणारच!

आता कोरोना असो की देव, कोणीही अडवू शकणार नाही, मराठे आरक्षण घेणारच!

जरांगेचा सरकारला गर्भित इशारा

आंतरवाली सराटी : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांची आज (२२ डिसेंबरला) परभणीच्या सेलूमध्ये सभा झाली. यावेळी त्यांनी आरक्षणाची मागणी करताना सरकारला इशाराच दिला आहे. ते म्हणाले की, ‘आता कोरोना असो की देव, कोणीही मराठ्यांना अडवू शकणार नाही, मराठे आरक्षण घेणारच. सरकारने कोणत्याही नोटीस देऊन नवा प्रयोग करण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा महाराष्ट्रात फिरू देणार नाही.’ असा गर्भित इशाराच यावेळी जरांगे यांनी सरकारला दिला.

मनोज जरांगे पाटील २४ डिसेंबरच्या अल्टीमेटमवर ठाम आहेत. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारला मुदतीची आठवण करून दिली. तसेच ते म्हणाले, तुम्ही आमचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करू नका. आमचं आंदोलन कोणीच दडपू शकत नाही. राज्य सरकारने याआधी एकदा तसा प्रयत्न केला आहे. परंतु, आम्ही आमचं आंदोलन दडपू दिलं नाही. मी राज्य सरकारला विनंती आणि आवाहनही करतो की त्यांनी आमचं आंदोलन दडपण्याच्या भानगडीत पडू नये. आम्ही शांततेत आंदोलन करत राहणार आणि आरक्षण घेणारच. त्याचबरोबर राज्य सरकारने २४ डिसेंबरआधी आरक्षण देऊन त्यांचा शब्द पाळावा, हीच आमची मागणी आहे. कोरोनाच्या नावाखाली कलम १४४ लागू केले किंवा अजून काही केले तरी आता देवही आडवा आला तरी आम्ही मागे हटणार नाही, मराठे आरक्षण घेणारच. आमचं आंदोलन रोखण्यासाठी राज्य सरकारने याआधी एक प्रयोग केला होता. परंतु, आता त्यांनी अशा भानगडीत पडू नये.

येत्या दोन दिवसांत राज्य सरकारने आरक्षणप्रश्नी काही केलं नाही तर आम्ही आंदोलनाची पुढची दिशा ठरवू, असा इशारा देत जरांगे पाटील म्हणाले, राज्य सरकारने काहीही केलं तरी आम्ही आमचं आंदोलन चालूच ठेवणार. राज्य सरकारला वाटतंय की मराठ्यांनी मुंबईत यावं आणि चक्काजाम आंदोलन करावं. आम्ही सध्या तरी मुंबईतल्या आंदोलनाबद्दल काहीच जाहीर केलेलं नाही किंवा तसा विचार केलेला नाही. मुंबईत येण्याची कुठलीही रणनीती आखलेली नाही. परंतु, सरकारच आता आम्हाला या आंदोलनासाठी प्रवृत्त करत आहे, असे चित्र दिसत आहे.

आम्हाला मुंबईला जायचं नाही. पण जायचं ठरवलं तर मुंबई आमची नाही का? मुंबईला आम्ही जायचं नाही का? मुंबईतील शेअर मार्केट, मंत्र्यांचे बंगले, कलाकारांचे बंगले पाहू द्या. मराठा समाजातील आंदोलकांना अटक केली तर सर्वच जन पोलीस ठाण्यात जाऊन बसा, शांततेत सर्वांना अटक करुन घ्या. लाखोंच्या संख्येने जाऊन बसा, सरकारने खेटायचे ठरवले तर खेटू द्या. तसेच यावेळी जरांगे यांनी समाजातील तरुणांना आवाहन केले की तुमची शक्ती कमी होऊ देऊ नका. मग सरकार कसे आरक्षण देत नाही, हे पाहतो. सरकारला गादीवर मराठा समाजाने बसवले. त्यामुळे आरक्षण दिले नाही. तर तुमच्या अंगाला गुलाल लागणार नाही, असाही इशारा जरांगे यांनी या सभेमध्ये दिला.

तर भुजबळांवर बोलताना ते म्हणाले, सरकारचे शिष्टमंडळ माझ्याकडे आले होते. त्यांनी मला सांगितले की, भुजबळांवर बोलू नका. मात्र भुजबळ जर आरक्षणावर बोलले. तर मी देखील त्यावर बोलणार. असे मी त्यांना स्पष्ट सांगितले, असेही यावेळी जरांगे म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -