Wednesday, April 30, 2025

महाराष्ट्रविदेशमनोरंजनताज्या घडामोडी

Maharashtra Shahir : 'महाराष्ट्र शाहीर'ची चीनच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड

Maharashtra Shahir : 'महाराष्ट्र शाहीर'ची चीनच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड

आज चीनमध्ये होणार चित्रपटाचं स्क्रिनिंग

मुंबई : महाराष्ट्रीय गायक, नाटककार, लोकनाट्य निर्माते आणि दिग्दर्शक शाहीर साबळे (Shahir Sable) यांच्या जीवनावर आधारित चरित्रपट 'महाराष्ट्र शाहीर' (Maharashtra Shahir) या वर्षीच्या एप्रिल महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला आला होता आणि या चित्रपटाला प्रेक्षकांची भरभरुन पसंती मिळाली. प्रसिद्ध मराठी दिगदर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) याचा हा सिनेमा आणि त्यातील गाणी मराठी प्रेक्षकांना प्रचंड आवडली. यातील 'आली उमलून माझ्या दारी' या गाण्याने तर सोशल मीडियावर धुमाकूळ घातला.

नुकतंच या सिनेमाने आणखी एक अभिमानास्पद कामगिरी केली आहे. 'महाराष्ट्र शाहीर' या चित्रपटाची चीनच्या 'हैनान आयलँड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' (Hainan Island International Film Festival) येथे निवड झाली आहे. आज या फेस्टीव्हलमध्ये चित्रपटाचं स्क्रिनिंग होणार आहे. निवड झालेल्या सर्व चित्रपटांचं स्क्रिनिंग झाल्यानंतर पारितोषिके जाहीर केली जातील. त्यामुळे चीनच्या महोत्सवात महाराष्ट्राचा 'महाराष्ट्र शाहीर' किती पारितोषिके पटकावणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

'महाराष्ट्र शाहीर' चित्रपटात अभिनेता अंकुश चौधरीने (Ankush Chaudhari) शाहीर साबळेंची भूमिका साकारली आहे. याचसोबत सना शिंदे, शुभांगी सदावर्ते, मृण्मयी देशपांडे, निर्मिती सावंत, अश्विनी महांगडे, दुष्यंत वाघ, अतुल काळे या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाला अजय-अतुल (Ajay Atul) या प्रसिद्ध संगीतकार जोडीचं संगीत लाभलं आहे.

 
View this post on Instagram
 

A post shared by Ankush Chaudhari (@ankushpchaudhari)

काय आहे हैनान आयलँड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव?

हैनान आयलँड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (HIIFF) चायना मीडिया ग्रुप आणि पीपल्स गव्हर्नमेंट ऑफ हैनान प्रांत यांच्या संयुक्त विद्यमाने, चीन चित्रपट प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केला जातो. हा महोत्सव दरवर्षी चीनमधील सान्या (Sanya) शहरात आयोजित केला जातो. HIIFF चे उद्दिष्ट आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक देवाणघेवाण आणि सहकार्याला प्रोत्साहन देणे, चित्रपट उद्योगातील नाविन्यपूर्ण विकास वाढवणे आणि चित्रपट निर्मितीमध्ये सर्जनशीलता वाढवणे आहे.

Comments
Add Comment