नवी दिल्ली: भारताने दक्षिण आफ्रिकेला दक्षिण आफ्रिकेत दुसऱ्या वनडे मालिकेत हरवले आहे. विराट कोहलीनंतर केएल राहुल दुसरा कर्णधार बनला आहे ज्याने आपल्या नेतृत्वात वनडे मालिका जिंकली आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पार्लमध्ये झालेल्या मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात ७८ धावांनी विजय मिळवला आणि मालिका जिंकली.
हा सामना जिंकण्यासोबतच २०२३मध्ये टीम इंडियाच्या सर्व वनडे मॅचेस संपल्या आहेत आणि या वर्षी टीम इंडियाने वनडे फॉरमॅटमध्ये एक कमालीचा रेकॉर्ड बनवला आहे. भारतीय संघाने या वर्षात एकूण २७ वनडे सामने जिंकले. यासोबतच टीम इंडिया एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक वनडे सामने जिंकणारी दुसरी टीम बनली आहे. या लिस्टमध्ये पहिल्या स्थानावर ऑस्ट्रेलिया आहे.
भारताची कामगिरी
२०२३मध्ये भारताने वनडे आशिया चषकात कमालीचे प्रदर्शन केले. यात अनेक सामने जिंकले. त्यानंतर वनडे विश्वचषकातही टीम इंडियाने सेमीफायनलपर्यंतचे सर्व १० सामने जिंकले. मात्र शेवटच्या सामन्यात त्यांना ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला.
ऑस्ट्रेलिया – २०२३ – ३० वनडे सामन्यात विजय
भारत – २०२३ – २७ वनडे सामन्यात विजय
तिसऱ्या सामन्यात भारताचा ७८ धावांनी विजय
तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात भारताने आफ्रिकेला ७८ धावांनी हरवले. भारताने या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना ८ बाद २९६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल आफ्रिकेचा संपूर्ण डाव २१८ धावांत गुंडाळला गेला. आफ्रिकेकडून सलामीवीर टोनी दे झोर्झी यांनी ८१ धावा केल्या. तर एडन मार्करमने ३६ धावांची खेळी केली.
याआधी टी-२० मालिकेत बरोबरी
वनडे मालिकेआधी झालेल्या टी-२० मालिकेत भारत आणि दक्षिण आफ्रिकेने १-१ अशी बरोबरी साधली. तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पावसाने धुतला गेला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात आफ्रिकेने सरशी साधली. यानंतर तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात भारताला विजय मिळवण्यात यश मिळाले.