वॉशिंग्टन: अमेरिकेच्या बायडेन सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे भारतीयांना जबरदस्त फायदा होणार आहे. अमेरिकन सरकारने H-1B व्हिसाच्या डोमेस्टिक रिन्यूअलचा पायलट प्रोग्राम सुरू केला आहे. हा प्रोग्राम २४ जानेवारीपासून सुरू होईल. हा H-1B व्हिसा पायलट प्रोग्राम केवळ भारतीय आणि कॅनडाच्या नागरिकांसाठी आहे.
याच्या अंतर्गत अमेरिकेत काम करत असलेल्या भारतीय आयटी प्रोफेशनल्स आणि कॅनडाच्या नागरिकांना लाभ होणार आहे. हा प्रोग्राम अशा कंपन्यांसाठी आहे ज्यांचे H-1B कर्मचारी कामासाठी परदेशी जातात.
अमेरिकेने हा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानंतर अनेक महिन्यांनी घेतलाय. जूनमध्ये जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी राजकीय दौऱ्यावर गेले होते तेव्हा H-1B व्हिसाची प्रक्रिया आणखी सोपे करण्याबाबतच्या प्रक्रियेवर काम सुरू होते. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यादरम्यान या प्रोग्रामची औपचारिक घोषणा करण्यात आली होती.
कसा होणार रिन्यू व्हिसा?
H-1B व्हिसा गैर-अप्रवासी व्हिसा आहे. हा व्हिसा अमेरिकेतील कंपन्यांना परदेशी कामगारांना नियुक्ती करण्यासाठी परवानगी देतो. जेव्हा एखादी व्यक्ती अमेरिकन कंपनीत नोकरी करत असते तेव्हा त्यांना H-1B व्हिसा जारी केला जातो. आतापर्यंत असे होत होते की जर एखाद्या व्यक्तीचा H-1B व्हिसा एक्सपायर झाला तर तो रिन्यू करण्यासाठी आपल्या देशात परतावे लागत होते. मात्र आता रिन्यू प्रक्रियेसाठी त्यांना आपल्या देशात परतावे लागणार नाही.
अमेरिकेत राहून ते आपला व्हिसा मेल करू शकतात आणि त्यानंतर हा रिन्यू केला जाईल. रिन्यूअल प्रक्रियेदरम्यान व्यक्तीला अमेरिकेच्या बाहेर जाण्याची गरज नाही.